रक्ताळलेल्या ऊसपट्ट्याला ‘बिबट रेस्क्यू पथका’चा दिलासा! आमदार अमोल खताळ यांचा पाठपुरावा; आधुनिक यंत्रसामग्रीसह 24 तास तैनाती..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या, मुळा-प्रवरा नद्यांच्या पाण्याने समृद्ध झालेल्या आणि सहकाराचे नंदनवन मानल्या जाणार्या अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याला अलिकडच्या काळात बिबट्यांचे वाढते साम्राज्य आणि रक्ताळलेल्या संघर्षामुळे दहशतीने विळखा घातला आहे. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या भूमीत मानवी जीव आणि हिंस्त्र श्वापद यांच्यातील संघर्ष आता टोकाच्या पातळीवर पोहोचला असून, मागील दोन वर्षांत संगमनेर तालुक्याच्या विविध भागांत बिबट्यांच्या प्राणघातक हल्ल्यात तब्बल आठ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या नरभक्षी हल्ल्यांमुळे ग्रामीण भागातील शेतशिवार रक्ताने माखले आहेत. यातून निर्माण झालेला नागरी आक्रोश ऐकून अखेर प्रशासकीय पातळीवर मोठी हालचाल झाली आहे. आमदार अमोल खताळ यांनी वनमंत्र्यांकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून संगमनेर तालुक्यासाठी स्वतंत्र, चोवीस तास कार्यरत राहणार्या विशेष ‘बिबट रेस्क्यू पथकाची’ स्थापना करण्यात आली आहे. या पथकासाठी पदनिर्मिती करुन त्याला प्रत्यक्ष मंजुरीही मिळाली असून उपवनसंरक्षक कार्यालयाच्या आदेशानुसार रविवारपासून (ता.31) या पथकाचे कामही सुरु होणार आहे. आधुनिक यंत्रसामग्री आणि विशेष वाहनांनी सज्ज असलेल्या या पथकामुळे संगमनेर तालुक्यातील बिबट प्रवण भागातील भयग्रस्त नागरीकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या डाव्या-उजव्या कालव्यांनी आसपासच्या संपूर्ण परिसरात सिंचनाची मोठी क्रांती घडवून आणल्यामुळे संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ऊसपट्टे तयार झाले आहेत. मात्र, हाच हिरवागार अथांग ऊस आता स्थानिक नागरिकांच्या जीवावर उठला असून, तो बिबट्यांसाठी सर्वात सुरक्षित आणि हक्काचे नैसर्गिक आश्रयस्थान बनला आहे. वास्तविक पाहता, वनक्षेत्र आणि अभयारण्यांच्या अंतर्गत भागात रानडुकरांची संख्या कमालीची वाढली असून, आता त्यांच्याकडून संघटीतपणे बिबट्यांवरच प्रतिहल्ला होवू लागल्याचे धक्कादायक वास्तवही समोर आले आहे.

अभयारण्यातील या अंतर्गत संघर्षामुळे आणि जंगलात भक्ष्याची कमतरता निर्माण झाल्याने, बिबट्यांनी मोठ्या संख्येने नद्यांच्या खोर्यांकडे आणि मानवी वस्त्यांकडे स्थलांतर केले आहे. या मैदानी वस्त्यांमध्ये आल्यानंतर बिबट्यांना दिवसभर लपण्यासाठी ऊसाचे घनदाट मळे, पिण्यासाठी मुबलक पाणी आणि रात्रीच्या वेळी शिकार करण्यासाठी मानवी वस्त्यांवरील पाळीव जनावरे, शेळ्या, मेंढ्या तसेच पाळीव कुत्री सहज उपलब्ध होत असल्याने त्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, ऊसाचे फड बिबट्यांच्या प्रजननासाठीही अत्यंत अनुकूल ठरत आहे. बिबट्यांची मादी एकावेळी दोन ते तब्बल सहा पिलांना जन्माला घालते. उसाच्या फडात ही पिल्ले वेगाने मोठी होत असल्याने तालुक्यात बिबट्यांची संख्या भौमितिक पद्धतीने वाढली असून, त्यामुळेच शहराच्या उपनगरांपर्यंत बिबट्यांचा मुक्त वावर सुरु झाला आहे.

मागील काही वर्षात संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकर्यांना रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यास जाणे म्हणजे मृत्यूच्या सापळ्यात पाऊल ठेवण्यासारखे झाले आहे. दिवसाढवळ्या शेतात काम करणार्या महिलांवर, घराबाहेर खेळणार्या लहान मुलांवर आणि रस्त्याने जाणार्या दुचाकीस्वारांवर बिबट्यांचे लपून हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. अवघ्या दोन वर्षात तालुक्यातील विविध भागात आठजणांचा मृत्यू झाल्याने नागरीकांमध्ये भीती, आक्रोश आणि वन विभागाविरोधात संताप होता. ग्रामीण भागात निर्माण झालेल्या या दहशतीची दखल घेत संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी वनमंत्र्यांकडे विशेष आपत्कालीन निधी आणि स्वतंत्र रेस्क्यू पथकाची मागणी लावून धरली होती, त्याला अखेर मंजुरी मिळाली आहे.

वनविभागाकडून नव्याने स्थापन करण्यात आलेले ‘बिबट रेस्क्यू पथक’ मानवी वस्तीतील बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि मानव-वन्यजीव यांच्यात होणारा संघर्ष न्यूनतम पातळीवर आणण्यासाठी काम करणार आहे. या पथकाला लवकरच अद्ययावत वाहन उपलब्ध केले जाणार आहे, ज्यामध्ये रेस्क्यू ऑपरेशनसाठी आवश्यक असणारी बेशुद्धीचे इंजेक्शन देणारी बंदूक, आधुनिक जाळे, पिंजरे, थर्मल कॅमेरे आणि रात्रीच्या वेळी शोध घेण्यासाठी हाय-टेक सर्चलाईट्स यासारखी आधुनिक यंत्रसामग्री असणार आहे. हे पथक केवळ बिबट्याला पकडण्याचे काम करणार नाही, तर तालुक्यातील संवेदनशील क्षेत्रांमध्ये 24 तास गस्त घालून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आणि बिबट्या आढळल्यास तत्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम करेल. नागरिकांच्या सोयीसाठी वनविभागाचा मध्यवर्ती आपत्कालीन टोल फ्री क्रमांक 1926 चोवीस तास कार्यरत ठेवण्यात आला असून, कोणत्याही नागरिकाला आपल्या परिसरात बिबट्याचा वावर किंवा हल्ला झाल्याची शंका आल्यास या क्रमांकावर संपर्क साधून मदत मिळवता येईल.

संगमनेर तालुक्यातील या पहिल्याच विशेष ‘बिबट रेस्क्यू पथका’ची प्रशासकीय रचना आणि जबाबदार्या निश्चितीही झाली आहे. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक प्रत्यक्ष जमिनीवर काम करणार आहे. सहाय्यक उपवनसंरक्षक अमरजीत पवार यांच्या नेतृत्वाखाली वन परिक्षेत्र अधिकारी (भाग 2) श्रीमती नम्रता हिरे, वनरक्षक दुर्गादास पाटील, सुजाता टेमरे आणि महेश सदगीर या वनकर्मचार्यांचा या पथकात समावेश करण्यात आला असून, या सर्वांना 31 मे 2026 पर्यंत तात्काळ नव्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ऊसपट्ट्यात वाढत्या बिबट्यांच्या संख्येमुळे मानवाशी त्यांचा संघर्ष वाढल्याने बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. डोंगरी तालुका म्हणून ओळख असलेल्या संगमनेर तालुक्याला त्याचा मोठा फटका बसला असून बिबट्यांना सुरक्षित आश्रय, पाणी आणि सहज शिकार उपलब्ध होत असल्याने त्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यातून मानवावरील हल्लेही वाढले असून गेल्या दोन ते तीन वर्षाच्या काळात संगमनेर तालुक्याच्या विविध भागातील आठजणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकारांची गंभीर दखल घेत संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी वनमंत्र्यांकडे सातत्यापूर्ण पाठपुरावा करुन जिल्ह्यासाठी नव्याने ‘बिबट रेस्क्यू पथका’ची निर्मिती करण्यास भाग पाडले असून संगमनेर व राहुरी येथे ही पथके उद्यापासून (ता.31) कार्यरत होणार आहेत. या पथकांसाठी स्वतंत्र पदनिर्मितीही करण्यात आली असून लवकरच आधुनिक यंत्रसाम्रगीने सज्ज असलेले वाहनही दिले जाणार आहे. वनविभागाच्या या निर्णयाने बिबट्यांच्या दहशतीखाली राहणार्या नागरीकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

संगमनेर तालुक्यात बिबट्यांच्या नरभक्षी हल्ल्यांमुळे निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत भयावह असून, नागरिकांचे जगणे खरोखरच सुळावर आले आहे. या पार्श्वभूमीवर, मी वनमंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे
तालुक्यासाठी 24 तास सज्ज असणारे विशेष ‘बिबट रेस्क्यू पथक’ मंजूर झाले आहे. आधुनिक यंत्रसामग्री, ट्रँक्युलाईझर गन आणि थर्मल कॅमेर्यांनी सज्ज असलेले हे पथक उद्यापासूनच (ता.31) प्रत्यक्ष ‘ऑन-फील्ड’ तैनात होत आहे. वनविभागाचे चपळ वनरक्षक आणि अनुभवी अधिकारी या मोहिमेचे नेतृत्व करत असून, या प्रशासकीय कवचामुळे संगमनेर तालुक्यातील बिबट्यांची दहशत कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. नागरीकांनी आपल्या परिसरात बिबट्या दिसल्यास अथवा त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास वनविभागाच्या 1926 या टोल क्रमांकावर संपर्क करुन रेस्क्यू पथकाची मदत मिळवावी.
– आमदार अमोल खताळ
सदस्य, महाराष्ट्र विधानसभा, संगमनेर

