‘पद्मश्री’च्या झगमगाटातही लोककलावंताला मातीची आठवण! नाशिक-पुणे ‘सेमी-हायस्पीड’ रेल्वेमार्गाचा विषय; थेट गृहमंत्र्यांनाच लक्ष घालण्याचे साकडे..

श्याम तिवारी, संगमनेर
कलाविश्वातील सर्वोच्च योगदानाबद्दल देशाचा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘पद्मश्री’ पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारायचा आणि त्या सर्वोच्च आनंदाच्या क्षणीही आपल्या कर्मभूमीच्या, आपल्या मातीच्या उरात रुतून बसलेली रेल्वेची प्रतीक्षा दिल्लीच्या तख्तासमोर मांडायची हा प्रसंग केवळ दुर्मीळच नाही, तर लोकप्रतिनिधींनाही अंतर्मुख करायला लावणारा आहे. लोकनाट्य तमाशा क्षेत्रातील महामेरु, संगमनेरचे कर्मयोगी पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर नेमके हेच केले. हातात नुकताच मिळालेला ‘पद्मश्री’ असताना, खेडकरांनी वैयक्तिक कौतुकापेक्षा ‘नाशिक-संगमनेर-पुणे’ या सेमी-हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा रखडलेला विषय गृहमंत्र्यांच्या पटलावर ठेवला. तांत्रिक कारणांचे गारुड आणि राजकीय अनास्थेमुळे खोळंबलेल्या या प्रकल्पाची कोंडी फोडावी, अशी आर्त हाक त्यांनी या भेटीतून दिली. एखाद्या कलावंताने आपल्या यशाच्या शिखरावर असतानाही, मातीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी घेतलेली ही भूमिका संगमनेरकरांच्या आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला सुखावणारी आहे.

‘नाशिक-संगमनेर-पुणे’ हा रेल्वेमार्ग केवळ दोन शहरांना जोडणारा रुळ नाही, तर या संपूर्ण पट्ट्यातील हजारों शेतकरी, नोकरदार, व्यापारी, उद्योजक आणि विद्यार्थ्यांच्या विकासाचा विषय आहे. दशकांपासून रेल्वेची शिट्टी ऐकण्यासाठी आसुसलेल्या या भागाला मध्यंतरी ‘सेमी-हायस्पीड’ रेल्वेचे स्वप्नं दाखवले गेले. जमिनीच्या मोजण्या झाल्या, घोषणांचा पाऊस पडला, पण पुढे हा प्रकल्प लालफिती आणि तांत्रिक वादाच्या गर्तेत अडकला. नारायणगाव परिसरातील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’च्या (जीएमआरटी) लहरींना या प्रकल्पामुळे अडथळा निर्माण होईल, असे तांत्रिक कारण पुढे करत रेल्वे मंत्रालयाने या रेल्वेमार्गाला ब्रेक लावला. तेव्हापासून हा मार्ग पुन्हा एकदा अनिश्चिततेच्या टांगला गेला आहे. तांत्रिक अडथळे सुटू शकणारे असतात, पण त्यासाठी लागणारी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती या प्रकल्पाच्या बाबतीत मात्र कमी पडल्याचेच वास्तव आहे.

या रेल्वेमार्गाचा आजवरचा प्रवास पाहिला तर, त्यात राजकीय श्रेयवादाची आणि आंदोलनांची मोठी मालिका दिसते. प्रकल्प जाहीर झाला तेव्हा त्याचे श्रेय घेण्यासाठी स्थानिक पुढार्यांमध्ये चढाओढ लागली होती. मात्र, नारायणगावच्या ‘टेलिस्कोप’चे कारण पुढे करुन रेल्वे मंत्रालयाने मार्ग बदलण्याच्या हालचाली सुरु केल्या, तेव्हा शेतकरी आणि जनता रस्त्यावर उतरली. जमिनीच्या अधिग्रहणावरुन, मोबदल्यावरुन आणि रेल्वेच्या बदलत्या नकाशांमुळे अनेकदा आंदोलने झाली. रेल्वे हवीच, पण ती शेतकर्यांना उध्वस्त करुन नको ते मूळ आराखड्यानुसार संगमनेर-सिन्नर सारखा हक्काचा भाग डावलून तर अजिबात नको, अशी रोकडी भूमिका या भागातील जनतेने सातत्याने लावून धरली आहे. मात्र, राजकीय नेत्यांनी निवडणुकांपुरता या विषयाचा वापर केला आणि नंतर सोयीस्कर मौन बाळगले, हेच या प्रकल्पाचे सर्वात मोठे दुर्दैव आहे.

वास्तविक पाहता, या प्रकल्पामुळे या भागाचा औद्योगिक आणि कृषी विकास होणार आहे. संगमनेर तालुका दूध, भाजीपाला आणि डाळिंब उत्पादनात अग्रेसर आहे. इथला शेतमाल मुंबई-पुण्यासारख्या बाजारपेठेत वेळेत पोहोचण्यासाठी रेल्वेचा पर्याय सर्वात स्वस्त आणि वेगवान ठरणार आहे. नाशिक आणि पुणे ही दोन औद्योगिक शहरे एकमेकांना रेल्वेमार्गाने जोडली गेल्यास संगमनेर आणि सिन्नरच्या औद्योगिक वसाहतींना सोन्याचे दिवस येतील. आज हजारो तरुणांना रोजगारासाठी पुणे-मुंबईची वारी करावी लागते, जीवघेणा प्रवास करावा लागतो. जर प्रस्तावित मार्गावरुन सेमी-हायस्पीड रेल्वे धावली, तर या भागाचा कायापालट होईल. हा केवळ वाहतुकीचा मार्ग नाही, तर उत्तर महाराष्ट्राच्या समृद्धीची जीवनवाहिनी ठरणार आहे, याचे स्मरण दिल्लीश्वरांना करुन देण्याचे काम एका लोक कलावंताला करावे लागावे, यातच सगळे आले.

पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी गृहमंत्र्यांची भेट घेऊन केवळ रेल्वेचाच प्रश्न मांडला नाही, तर ज्या लोककलेने त्यांना जी उंची दिली, त्या तमाशा क्षेत्रातील वेदनांनाही त्यांनी वाचा फोडली. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा कणा असलेल्या तमाशा कलाकारांवर होणारे वाढते हल्ले, गावपातळीवरील यात्रा-उत्सवांमध्ये पोलीस प्रशासनाकडून मिळणारे अपूर्ण सहकार्य आणि रात्रीच्या सादरीकरणावर येणार्या कायदेशीर अडचणी याकडेही त्यांनी निवेदनाद्वारे गृहमंत्री अमित शाह यांचे लक्ष वेधले. संस्कृती जपणार्या कलावंताला सन्मानाने जगता आले पाहिजे, ही रोखठोक भूमिका त्यांनी मांडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही या दोन्ही विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. आता खेडकरांनी दिल्लीच्या दारात घातलेले हे साकडे केंद्र सरकार किती गांभीर्याने घेते आणि रेल्वेचे रखडलेले चाक पुन्हा कधी गती घेते, याकडे संगमनेरसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.

दिल्लीच्या सर्वोच्च दरबारात सन्मानाचा मुकुट परिधान करत असतानाही, आपल्या मातीची रेल्वेची आस न विसरणारे पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी खर्या अर्थाने लोकभावनेचे प्रतिनिधित्व केले आहे. यशाच्या शिखरावर असतानाही थेट देशाच्या गृहमंत्र्यांकडे नाशिक-पुणे रेल्वेचा प्रश्न मांडणारे खेडकर या मातीचे ऋण फेडणारे जागरुक नागरिक ठरले आहेत. तर, दुसरीकडे केवळ निवडणुकीपुरत्या पोकळ घोषणा करुन नंतर तांत्रिक अडचणींच्या नावाखाली सोयीस्कर मौन बाळगणार्या स्थानिक राजकारण्यांच्या ढोंगीपणावर खेडकरांच्या या भूमिकेने सणसणीत चपराकही पडली आहे. जनतेच्या हक्काचा हा रेल्वेमार्ग राजकीय अनास्थेच्या ‘क्रॉसिंग’वर किती दिवस अडकवून ठेवणार, असा रोकडा सवाल आता एका लोककलावंताने दिल्लीतून विचारला असून, स्थानिक नेत्यांनी आतातरी श्रेयवाद बाजूला ठेवून प्रबळ इच्छाशक्ती दाखवावी अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होत आहे.

