कळसूबाई शिखरावर 55 दिव्यांग तरुणांची यशस्वी चढाई राज्याच्या कानाकोपर्‍यातील पर्यटक; सात महिलाही सहभागी

नायक वृत्तसेवा, अकोले
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून प्रसिद्ध असणार्‍या कळसूबाई शिखर नववर्षाच्या स्वागतानिमित्त महाराष्ट्रातील 55 दिव्यांग तरुणांनी सर केले आहे. याबद्दल त्यांच्या जिद्दीचे आणि चिकाटीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दिव्यांगांमध्ये ऊर्जा पेरण्यासाठी शिवुर्जा प्रतिष्ठानकडून दरवर्षी नववर्षानिमित्त राज्यातील दिव्यांगांना घेऊन कळसूबाई शिखर सर केले जाते. यावर्षी मोहिमेचे दहावे वर्ष होते. राज्यातील बीड, पुणे, अकोला, औरंगाबाद, सोलापूर, सांगली, नाशिक, मुंबई, ठाणे, जालना इत्यादी जिल्ह्यांतून 55 दिव्यांग सहभागी झाले होते. यामध्ये सात महिला सहभागी होत्या. 31 डिसेंबरला दुपारी दोन वाजता चढाईला सुरूवात केली. शेतातील पायवाट, काही ठिकाणी बांधलेल्या पायर्‍या व काही ठिकाणी कोरलेल्या पायर्‍या अवघड लोखंडी शिड्या सर करत काठी कुबड्यांचा आधार घेत सारे दिव्यांग रात्री सात वाजता कळसूबाईच्या शिखराजवळील विहिरीपाशी कापडी तंबूत मुक्कामी थांबले. एक जानेवारीचा सूर्योदय होण्यापूर्वीच पहाटे लवकर उठून कळसूबाई शिखरावर जाऊन बसले. सर्वोच्च शिखरावरून नववर्षाच्या सूर्याचे दर्शन सकाळी सव्वासातला झाले. एकमेकांचे अभिनंदन करून सकाळी नऊ वाजता शिखर उतरणीस प्रारंभ झाला.

दुपारी एक वाजता कळसूबाई माची मंदिराजवळ कळसूबाई शिखराची माहिती देणारा फलक लावून त्याचे अनावरण करण्यात आले. शिवुर्जा प्रतिष्ठानकडून लावण्यात आलेल्या माहिती फलकाचे प्रायोजकत्व डॉ. अनिल बारकुल यांचे आहे. सर्व दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटप करून पुरणपोळीच्या जेवणाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावर्षी या मोहिमेत बीड येथून प्रसिद्ध डॉ. अनिल बारकुल, डॉ. सुनीता बारकुल व दुर्ग अभ्यासक कचरू चांभारे सहभागी झाले होते. दिव्यांगांची दहावी कळसूबाई मोहीम शिवुर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वात यशस्वी व सुरक्षितपणे पार पडली. सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी सचिव कचरू चांभारे, जगन्नाथ चौरे, डॉ. अनिल बारकुल, धर्मेंद्र सातव, अंजली प्रधान, सुरेखा ढवळे, जनार्दन पानमंद, केशव भांगरे, मच्छिंद्र थोरात, लक्ष्मण वाघे, सागर बोडखे, जीवन टोपे, सतीश आळकुटे यांनी विशेष सहकार्य केले. या मोहिमेत डॉ. सूरज बटुले, अमोल शिंदे, शबाना पखाली आजाद, काजल कांबळे, तुकाराम कदम, हर्ष बाबर, ओम तारू, पार्थ चौधरी, सचिन मानकर, सुनील वानखेडे हे सामील झाले होते.

Visits: 113 Today: 3 Total: 1106554

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *