मुस्लीम समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्या!
मुस्लीम समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्या!
नेवासा येथील मुस्लीम समाज बांधवांची मागणी
नायक वृत्तसेवा, नेवासा
राज्यातील मुस्लीम समुदायातील शिक्षण आणि शासकीय नोकर्यांमधील मागासलेपण दूर करण्यासाठी मुस्लीम समाजाला लवकरात लवकर घटनात्मक अधिकार असलेले आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी नेवासा येथील मुस्लीम समाज बांधवांनी तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शासकीय नोकर्यांमध्ये सर्व सामाजिक जाती-धर्माचे योग्य प्रतिनिधीत्व सुनिश्चित करणे हे राज्याचे कर्तव्य आहे. देशात व राज्यात मुस्लीम समाजाच्या असलेल्या परिस्थितीने अनेक आयोग नेमण्यात आलेली आहेत. प्रत्येक आयोगाने वेळोवेळी मुस्लीम समाजातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक मागासलेपण शासनाच्या निदर्शनास आणून देणारा अहवाल सादर केला आहे. सदर अहवालामध्ये मुस्लीम समाजाची अवस्था अत्यंत बिकट असून दलितेतर समाजापेक्षाही खालच्या दर्जाचे असल्याचे वेळोवेळी निष्पन्न झालेले आहे. परंतु सदरचे अहवाल हे फक्त कागदोपत्री राहिले असून शासन दरबारी मात्र अनास्था दिसून येत आहे.

महाविकास आघाडी सरकारने देखील आपल्या संयुक्त जाहीरनाम्यामध्ये मुस्लीम समाजाला आरक्षण जाहीर केलेले होते व आहे. नुकत्याच झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा विचार करता यामध्ये मुस्लीम समाजाची टक्केवारी अतिशय कमी म्हणजे एक टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आलेले आहे. तरी घटनात्मक अधिकार असलेले मुस्लीम समाजाला शैक्षणिक व रोजगारामध्ये दहा टक्के आरक्षण लवकरात लवकर देण्यात यावे, राज्यातील मुस्लीम समुदायातील शिक्षण आणि शासकीय नोकर्यांमधील मागासलेपण दूर करण्यासाठी प्रशिक्षण व संशोधन बार्टी आणि सारथीच्या धर्तीवर सुरू करण्यात यावे, जिल्हा पातळीवर मुस्लीम विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा मिळावी, शालेय अभ्यासक्रमात सामाजिक विविधता निर्माण होईल असे पाठ्यक्रम तयार करण्यात यावे, अल्पसंख्यांक शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक भरती तसेच अनुदान देण्यात यावेत अशा मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत. सदर निवेदन देतेवेळी ज्येष्ठ नागरिक रहेमान पिंजारी, अॅड.जावेद इनामदार, असीफ पठाण, आयुब जहागिरदार, शफीक जेटली, मुक्तार शेख, शोएब पठाण उपस्थित होते.

