कोपरगाव तहसीलमध्ये वाळूचोरांच्या वाहनांचा लिलाव
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
गोदावरीच्या पात्रातून चोरटी वाळू वाहतूक करताना पकडलेल्या वाहनांचा महसूल विभागाने मंगळवारी (ता.2) लिलाव केला. त्यातून तब्बल 12 लाख रुपयांची वसुली झाली. उर्वरित वाहनधारकांनी सात दिवसात दंड न भरल्यास लिलाव करण्याचा इशारा तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिला आहे.
महसूल पथकाने 2016 पासून वाळू उपसा करताना शेकडो वाहने जप्त केली होती. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र, मालकांनी दंड भरला नाही. त्यामुळे 74 लाख 50 हजार रुपये दंडाच्या वसुलीसाठी 29 वाहनांचा तहसील कार्यालयात मंगळवारी लिलाव करण्यात आला. त्यात सात डंपर, दोन जेसीबी, 16 ट्रॅक्टर, दोनट्रक, दोन पिकअपचा समावेश आहे. लिलावात कोपरगावसह वैजापूर, येवला, नाशिक, मालेगाव, श्रीरामपूर येथील नागरिक सहभागी झाले होते. मंगळवारी 29 पैकी सहा वाहनांचा लिलाव झाला. त्यातून 12 लाख रुपयांची वसुली झाली. यापूर्वी गेल्या वर्षी जूनमध्ये 32 वाहनांचा लिलाव करून 82 लाखांचा दंड वसूल केला होता. आणखी 70 वाहने धूळ खात पडून आहेत. उर्वरित वाहनांचा एप्रिलमध्ये लिलाव होणार आहे. वाळूचोरांनी दंड न भरल्यास व वाहनांचा लिलाव न झाल्यास ती भंगारात विकणार असल्याचे तहसीलदार चंद्रे यांनी सांगितले.