शुक्रवारी संगमनेरात ‘विराट हिंदू संमेलनाचे’ आयोजन! संघाच्या शताब्दी वर्षात हिंदू एकतेचे दर्शन; सीए सर्वेश मेहेंदळे आणि बाबासाहेब गांगुर्डे यांची उपस्थिती..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गौरवशाली शताब्दी वर्षाचे औचित्य साधून संपूर्ण देशभरात हिंदुत्वाचा जागर केला जात आहे. याच मालिकेचा भाग म्हणून संगमनेर शहरात उद्या, शुक्रवारी (ता.15) ‘विराट हिंदू संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. हिंदू समाजाने आपली मरगळ झटकून ‘एकत्र येऊ, संघटीत होऊ आणि सक्षम समाज घडवू’ हा मंत्र उराशी बाळगून या संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन हिंदू एकता समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


या नियोजित संमेलनाची सविस्तर माहिती देण्यासाठी बुधवारी (ता.13) हिंदू एकता समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समितीचे पदाधिकारी आणि सदस्यांनी संमेलनाचा उद्देश आणि पाच सूत्री कार्यक्रमावर प्रकाश टाकला.


यावेळी बोलताना हिंदू एकता समितीचे अध्यक्ष प्रा.एस.झेड.देशमुख यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासूनच्या ध्येयधोरणांचा आणि कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. ते म्हणाले की, गेल्या शंभर वर्षांपासून संघाने राष्ट्रनिर्मिती आणि समाज परिवर्तनाचे मोठे कार्य केले आहे. आजच्या काळात हिंदू समाजाने जात, पंथ आणि पोटभेद विसरुन एकत्र येणे काळाची गरज आहे. हे संमेलन केवळ एक कार्यक्रम नसून, तो हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी आणि एकसंध समाज घडवण्यासाठी घेतलेला एक संकल्प आहे.


शुक्रवारी (ता.15) सायंकाळी सहा वाजता या संमेलनाला सुरुवात होईल. या संमेलनात प्रख्यात प्रवक्ते सीए सर्वेश मेहेंदळे आणि बाबासाहेब गांगुर्डे (गुरुजी) यांचे ओजस्वी विचार ऐकण्याची संधी संगमनेरकरांना मिळणार आहे. हे दोन्ही वक्ते आपल्या प्रगल्भ विचारांतून हिंदू धर्माची ताकद आणि भविष्यातील आव्हाने यावर सविस्तर भाष्य करणार आहेत.


संघाने आपल्या शताब्दी वर्षानिमित्त अशा संमेलनाच्या माध्यमातून समाजासमोर पाच प्रमुख तत्त्वे (पंचपरिवर्तन) ठेवली आहेत. याविषयी माहिती देताना ज्ञानेश्वर थोरात यांनी सांगितले की, केवळ एकत्र येणे पुरेसे नसून समाजाच्या वर्तनातही बदल होणे आवश्यक आहे. त्यासाठी सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण रक्षण, स्वदेशीचा आग्रह आणि नागरी कर्तव्य या विषयावर स्वयंसेवक काम करणार आहेत.


या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी हिंदू एकता समितीचे उपाध्यक्ष अ‍ॅड.श्रीकांत गोंगे, खजिनदार रमाकांत येडे, भाऊ जाखडी, कमलाकर भालेकर यांच्यासह समितीचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत. संगमनेर तालुक्यातील कानाकोपर्‍यातून हिंदू बांधवांनी या विराट संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. शताब्दी वर्षातील हे संमेलन संगमनेरच्या इतिहासात एक मैलाचा दगड ठरणार असून, शुक्रवारी सायंकाळी शहरात हिंदू संस्कृतीचा आणि एकतेचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळणार आहे.

Visits: 128 Today: 2 Total: 1985040

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *