आजच्या राजकीय चर्चेचा दर्जा अतिशय लाजीरवाणा! माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची खंत; महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी वक्तव्य..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशातील जनतेचे असंख्य प्रश्न आज आऽ वासून उभे आहेत. विशेषतः गेल्याकाही कालावधीत पडलेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याकडे लक्ष्य देवून कोलमडलेल्या शेतकर्याला उभारी देण्याची गरज असतांना दुर्दैवाने त्यावर चर्चा होत नाही. बेरोजगार तरुण गावोगावी हिंडतोय त्यावर न बोलता आज ‘आम्ही’ अनावश्यक गोष्टींवर मात्र खूप चर्चा करतोय. त्यातून भाषेचा स्तर इतका खालावलाय की आजच्या राजकीय चर्चा पाहून अक्षरशः लाज वाटत असल्याची खंत राज्याचे माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज संगमनेरात व्यक्त केली.
संगमनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी आज मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. त्यावेळी मतदान केंद्रावर आलेल्या माजीमंत्री थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना वरील खंत व्यक्त केली. यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, अवकाळीने झालेले नुकसान, प्रचंड वाढलेली महागाई, बेरोजगारी अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या सामान्य माणसांच्या निगडीत आहेत. मात्र त्याबाबत आज चर्चा होत नाही, तर ज्या गोष्टी अनावश्यक आहेत त्यावर मात्र प्रदीर्घ चर्चा होतांना दिसते. हा दोष कोणा एकाचा नसून त्यात आपल्यासह सगळ्याच राजकारण्यांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.
अनावश्यक चर्चांमधून अलिकडच्या काळात राजकारण्यांच्या बोलण्याचा स्तर अत्यंत खालावला असून त्याचा दर्जा पाहून अक्षरशः लाज वाटावी अशी स्थिती निर्माण झाल्याचे सांगतांना त्यांनी काय चाललंय?, आपण बोलतोय काय?, आपल्या बोलण्याची पातळी काय?, आपली भाषा काय? याचा कोणी विचार करीत नसल्याची खंत व्यक्त करीत या गोष्टी महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणार्या नसल्याचेही परखडपणे सांगितले.
बाजार समित्यांच्या निवडणुका राज्यात अनेक ठिकाणी होत असतांना संगमनेरची चर्चा होत असल्याच्या प्रश्नावर प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या पद्धतीने राजकारण करीत असतो असे ते म्हणाले. राज्यात मोठ्या कालावधीनंतर सार्वत्रिक निवडणूका होत आहेत आणि पुढील काळातही विविध निवडणूका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर बाजार समित्यांच्या निवडणुकांना महत्त्व आल्याचे त्यांनी सांगितले. राजकारण हा त्याचाच भाग आहे. त्यामुळे स्वतःचा मतदार संघ, जिल्हा म्हणून या गोष्टी सांभाळाव्या लागत असल्याने ही निवडणूक अतितटीची लढाई असणं गैर नसल्याचे ते म्हणाले.
बाजार समितीच्या निवडणूका पक्षीय पातळीवर होत नाहीत. मात्र महाविकास आघाडी म्हणून राज्यातील अनेक ठिकाणी आम्ही एकत्रितपणे या निवडणूका लढत आहोत. जनतेतूनही महाविकास आघाडीला मोठा प्रतिसाद मिळतोय असेही त्यांनी सांगितले. शेतकर्यांचा शेतीमाल विकण्याची व्यवस्था म्हणून यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून कृषी उत्पन्न बाजार समित्यांची रचना झाली आणि नंतर ती देशभर यशस्वीपणे राबविली गेली. मध्यंतरीच्या काळात ही व्यवस्था मोडण्याचाही प्रयत्न झाल्याचे सांगत थोरात यांनी त्या विरोधात पंजाब व हरयाणाच्या शेतकर्यांनी केलेल्या आंदोलनाचाही दाखला दिला.
गुरुवारी लोणीच्या दिशेने निघालेला शेतकर्यांचा लाँगमार्च तिघा मंत्र्यांच्या आश्वासनानंतर संगमनेरात स्थगित झाल्याच्या विषयावर भाष्य करतांना थोरात यांनी दिलेली आश्वासने ठरलेल्या मुदतीत पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली. सत्तेत असतांना आपल्यासमोर आलेल्या काही मागण्या आपण सोडवल्या, तर काही मागण्या प्रलंबित होत्या. त्या सोडवल्या जाव्यात या मताचे आपण असल्याचेही थोरात म्हणाले. शेतकरी आंदोलनाला सामोरे जावून केवळ आश्वासने देवून भागत नाही तर त्यांचे प्रश्नही सोडवावे लागतात अशी कोपरखळीही त्यांनी दिली.
बर्याचवेळा अशा आंदोलनातून सरकारची पळापळ होते, मंत्री येवून आंदोलकांना भेटतात, बैठकाही होतात, त्यातून आश्वासने दिली जातात. त्यानंतर आंदोलक आपापल्या घरी जातात, मंत्री त्यांच्या कामात व्यस्त होतात आणि दिलेली आश्वासने आणि समोर आलेल्या प्रश्नांचा त्यांना विसर पडतो. गुरुवारी मोर्चेकर्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांना जी आश्वासने दिली गेली आहेत, त्यासाठी जो कालावधी ठरवला गेला आहे त्यातच त्यांचे प्रश्न सोडवावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली.