प्रशासन आणि ठेकेदारांच्या ‘संगनमताने’ शहर जलमय होण्याची भीती? पालिकेची ‘नालेसफाई’ की ‘तिजोरीची’ सफाई?; नैसर्गिक प्रवाहाचा गळा घोटण्याचा प्रकार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
विकासाच्या नावाखाली कामांच्या याद्या काढून त्यातून माया लाटण्याचे प्रकार संगमनेर पालिकेत नवीन नाहीत. मात्र, आता चक्क पावसाळ्याच्या तोंडावरच ‘नालेसफाईच्या आईचा घोऽ’ करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एकीकडे नालेसफाईवर दरवर्षी लाखोंचा चुराडा करायचा आणि दुसरीकडे त्याच नाल्यांमध्ये बांधकामांचा राडारोडा टाकणार्यांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करायची, असा दुहेरी खेळ सध्या शहरात सुरु आहे. म्हाळुंगी आणि प्रवरेच्या कुशीत वसलेल्या या शहराचे नैसर्गिक जलस्त्रोत असलेल्या नाल्यांचे अस्तित्वच त्यामुळे धोक्यात आले असून, प्रशासनाच्या या मेहेरबानीमुळे आगामी पावसाळ्यात शहर पुन्हा एकदा ‘तुंबण्याची’ दाट शक्यता आहे.

संगमनेर शहराचा भौगोलिक विचार करता, प्रवरा आणि म्हाळुंगी या नद्यांच्या काठावर शहर विस्तारलेले आहे. शहराच्या पोटातून वाहणारे म्हानुटी, नाटकी आणि लेंडी हे तीन मोठे नाले म्हणजे एकेकाळच्या जिवंत नद्याच होत्या. जुन्या सरकारी दस्ताऐवजांमध्ये आजही त्यांचा उल्लेख ‘नदी’ असाच आढळतो. मात्र, काळाच्या ओघात पर्जन्यमान घटले आणि मानवी अतिक्रमणाने या नद्यांचे रुपांतर ओढ्यात आणि पुढे सांडपाणी वाहून नेणार्या नाल्यांत झाले.

शहरात बंदिस्त गटारांची व्यवस्था कागदावर असली, तरी सांडपाण्याच्या शास्त्रोक्त विल्हेवाटीचा अभाव असल्याने शहरातील संपूर्ण अस्वच्छता याच नाल्यांतून म्हाळुंगी आणि पुढे प्रवरेच्या पात्रात मिसळते. गेल्या काही दशकांत शहराच्या कक्षा रुंदावल्या, पण नाल्यांचे प्रवाह मात्र संकुचित होत गेले. नैसर्गिक प्रवाहात सातत्याने भर घालून ते अरुंद करण्यात आल्याने नवीन नगररोड, दत्त मंदिर आणि बसस्थानक परिसरातील रस्ते पावसाळ्यात नद्यांचे रुप धारण करतात.

संगमनेर नगरपालिकेचा नालेसफाईचा कारभार म्हणजे ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशातलाच प्रकार आहे. गेल्या महिन्यातच तांबे हॉस्पिटलच्या बाजूने देवाच्या मळ्यातून म्हाळुंगीला मिळणार्या ‘म्हानुटी’ नाल्याची सफाई करण्यात आली होती. त्यासाठी पालिकेने 10 ते 12 लाख रुपयांचा खर्च केल्याची चर्चा आहे. ही सफाई होऊन महिनाही उलटत नाही, तोच याच नाल्याच्या पात्रात आणि काठावर शेजारीच सुरु असलेल्या बांधकामासह शहरातील मोठ्या बांधकामांचा राडारोडा राजरोसपणे टाकला जात आहे.

जाजू पंपापासून स्वामी समर्थ मंदिर आणि चंद्रशेखर चौक ते संगमनेर खुर्दला जोडणार्या रिंगरोडच्या बाजूने म्हाळुंगी पात्रातही अशाचप्रकारे बांधकामांची माती, जुन्या वाड्यांच्या पाडकामातील दगड-विटांचा चुरा ओतला जात आहे. विशेष म्हणजे, ज्या नाल्यांची सफाई करण्यासाठी जनतेचा पैसा खर्च होतो, त्याच नाल्यात पुन्हा अडथळे निर्माण केले जात असताना पालिका प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याने शंका निर्माण झाल्या आहेत.

नवीन नगररोडवरील नाटकी नाल्याची अवस्था तर अत्यंत दयनीय आहे. या नाल्यातून पावसाळ्यात थेट गटाराचे पाणी ओसंडून बाहेर पडते. दरवर्षी या भागातील विविध आस्थापना, कार्यालये आणि दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान होते. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळील सखल भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्गच उरलेला नाही. नैसर्गिक नाले शहराची ‘फुफ्फुसे’ असतात, ती अशाप्रकारे राडारोड्याने भरुन काढली जावू लागली तर त्याचे दुष्परिणाम दिसणारच हा नैसर्गिक नियम आहे.

या प्रकारातून शहरातील काही ठराविक बांधकाम ठेकेदारांना पालिकेचे अभय असल्याचे बोलले जाते. त्यातूनच पाया खोदताना निघालेली माती, पाडकामातील टाकावू साहीत्य टाकायचे कुठे, हा प्रश्न सोडवण्यासाठी या ठेकेदारांनी चक्क नाल्यांचा वापर सुरु केला आहे. दिवसाढवळ्या या नाल्याच्या उरावर ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टर खाली केले जात असताना पालिकेचा आरोग्य, बांधकाम आणि अतिक्रमण विभाग मात्र डोळे बंद करुन मूग गिळून बसला आहे. त्यामुळे शहरातील अशा विकृतींसोबत पालिकेतील काहींचे हितसंबंध तर नाही अशी शंकाही अधिक गडद झाली आहे. केवळ टेंडर काढून सफाईचे सोपस्कार पूर्ण करणे म्हणजे नालेसफाई नव्हे. नाल्यात भराव टाकणार्यांवर जोपर्यंत कठोर फौजदारी कारवाई होत नाही, तोपर्यंत हे प्रकार थांबणार नाहीत याचा पालिकेला गांभीर्याने विचार करावा लागेल.

संगमनेर शहरातून वाहणार्या प्रमुख नाल्यांवर झालेले बेसुमार अतिक्रमण काढावे अशी मागणी रोजच सुरु असते, मात्र पालिकेतील सत्ताधार्यांना कारवाईतून मतपेढी दुखावण्याचीच अधिक भीती असल्याने एकीकडे नालेसफाईच्या नावाने लाखोंची उधळपट्टी करायची आणि दुसरीकडे त्याच नाल्यात अतिक्रमण करणार्यांकडे दुर्लक्ष करायचे अशी नीती पालिकेने स्वीकारली आहे. त्याचाच परिणाम दरवर्षी नवीन नगररोड, बसस्थानकाचा परिसर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा भाग आणि अशोक चौक यासारख्या शहराच्या अर्थकारणाचा जीव असलेल्या भागात नाले तुंबून त्याचा फटका आसपासच्या नागरीक, व्यापारी व आस्थापनांना सोसावा लागतो. मात्र त्याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याप्रमाणे पालिका दळतेय आणि कूत्री पिठं खाऊन चाललीत असे दुर्दैवी चित्र गेली वर्षोनुवर्ष संगमनेरकरांना बघावे लागत आहे.

