योगासनांचा महाराष्ट्राच्या प्रमुख खेळांत समावेश करणार : केदार राष्ट्रीय योगासन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविणार्या महाराष्ट्र संघाचा सन्मान सोहळा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
ओडिशात झालेल्या योगासनांच्या पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने मिळविलेल्या दैदीप्यमान यशाने महाराष्ट्राचे भूषण वाढले आहे. राज्याचे प्रतिनिधीत्व करतांना महाराष्ट्राकडून खेळणार्या 54 खेळाडूंनी 69 पदकांची लयलूट करुन राज्याच्या क्रीडा क्षेत्रात नवा विक्रमही प्रस्थापित केला आहे. या खेळात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेवून महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मागणीनुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात योगासन अकॅडेमी सुरू करण्याबाबत शासनस्तरावरुन आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिले.
राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनने गेल्या आठवड्यात भुवनेश्वर (ओडिशा) येथे आयोजित केलेल्या योगासनांच्या पहिल्या राष्ट्रीय चॅम्पियनशीप स्पर्धेचा किताब महाराष्ट्राच्या संघाने पटकाविला होता. या राष्ट्रीय स्पर्धेत उत्तुंग कामगिरी करणार्या या सर्व खेळाडूंचा महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्यावतीने मंगळवारी (ता.23) संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूल येथे सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून दूरदृष्य प्रणालीद्वारा उपस्थित असलेल्या मंत्री केदार यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशनचे महासचिव डॉ.जयदीप आर्य, महाराष्ट्र स्पोर्ट योगासन असोसिएशनचे अध्यक्ष बापू पाडळकर, सचिव डॉ.संजय मालपाणी, रामकुमार राठी आदींसह विजेते स्पर्धक, त्यांचे पालक, प्रशिक्षक व योगप्रेमी नागरिक ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना मंत्री केदार म्हणाले की, एखाद्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत खेळताना त्या स्पर्धेसाठी असलेली सर्वच्या सर्व सुवर्ण पदके पटकाविण्याचा महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातील हा बहुधा पहिलाच प्रसंग असेल. या स्पर्धेत राज्यातील योगासनांच्या विद्यार्थ्यांनी जे उज्ज्वल यश प्राप्त केले आहे त्याचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे. या खेळाचा अधिक प्रचार आणि प्रसार होण्यासाठी राज्य सरकारच्या पातळीवरुन आवश्यक ते प्रयत्न करण्यासोबतच महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनने मागणी केल्यानुसार या खेळातील ग्रामीणभागात असलेली प्रतिभा समोर आणण्यासाठी योगासनांचा राज्याच्या प्रमुख खेळांमध्ये समावेश करण्यासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
विजयी स्पर्धकांचे कौतुक करताना राष्ट्रीय योगासन फेडरेशनचे महासचिव डॉ.जयदीप आर्य यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गौरवशाली परंपरा असलेल्या महाराष्ट्राच्या योगासन संघाने मिळविलेले हे यश सुवर्णाक्षरांनी लिहावे इतके झळाळणारे असल्याचे सांगितले. योगासनांना खेळाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर राष्ट्रीय पातळीवर ही पहिलीच स्पर्धा होती. या स्पर्धेतील महाराष्ट्र संघाचे सादरीकरण पाहता हा संघ विश्व विजेता बनण्याची क्षमता असलेल्या योगास्टार खेळाडूंचा असल्याची देशाला खात्री पटल्याचे ते म्हणाले. गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्र संघातील सर्व खेळाडूंकडून आवश्यक ती तयारी करवून घेण्यासह त्यांच्या खाण्या-पिण्याच्या आणि आरोग्याच्या बारीकसारीक गोष्टींची अगदी पालक होवून जबाबदारी पार पाडणार्या डॉ.संजय मालपाणी यांना सह्याद्रीसारखा पाठीराखा अशी उपाधी देत त्यांनी कौतुक केले.
महाराष्ट्राच्या संघासोबतच भुवनेश्वरला उपस्थित असलेल्या डॉ.मालपाणी यांनी या स्पर्धेच्या तयारीसह भुवनेश्वरच्या प्रवासात योगासन खेळाडूंनी केलेली धमाल उपस्थितांना सांगितली. या स्पर्धेच्या शुभारंभाला महाराष्ट्र संघातील मुलींनी सादर केलेल्या योगनृत्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडल्याचे सांगताना ओडिशा सरकारने या नृत्याचा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन जगभर प्रसारित करण्यासह भुवनेश्वरच्या आसपासच्या विविध प्राचीन मंदिरांच्या प्रांगणात राज्याच्या खेळाडूंकडून योगासनांचे सादरीकरण करवून त्याचे व्हिडिओ चित्रिकरण केल्याचा अभिमानस्पद प्रसंगही त्यांनी यावेळी सांगितला. ठाणे येथील योगपटू व संगीत विशारद राजेश पवार यांनी सादर केलेल्या प्रार्थनेने या सन्मान सोहळ्याला सुरुवात झाली. महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष बापू पाडळकर यांनी सर्वांचे स्वागत केले. डॉ.सुनंदा राठी यांनी या स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळणार्या प्रत्येक खेळाडूने केलेली कामगिरी उपस्थितांना सांगितली. सतीश मोहगावकर यांनी आभार मानले.
भुवनेश्वर येथे झालेल्या या स्पर्धेचे वर्णन करताना महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे सचिव डॉ.संजय मालपाणी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार्या योगासन क्रीडा स्पर्धा महाराष्ट्रात व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर तत्काळ प्रतिसाद देत राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी होकार देत योगासनांच्या प्रचार व प्रसारासाठी शासनस्तरावर आवश्यक ती मदत करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.