प्रदीर्घ कालावधीनंतर संगमनेरकरांनी घेतला मोकळा श्वास! भीतीपोटी अतिक्रमणधारक गायब; अचानक वाढलेल्या रस्त्यांची रुंदी आश्चर्यकारक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरालगतच्या जोर्वेनाका परिसरात झालेल्या हाणामारीनंतर संगमनेर शहरासह आसपासच्या दहा ते बारा गावांमध्ये तणावाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर एकीकडे पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली असून दुसरीकडे पालिकेने या घटनेला कारणीभूत ठरलेली जोर्वे नाक्यावरील सर्व अतिक्रमणे हटविली आहेत. याच कारवाईचा धसका घेवून मंगळवारी दुपारपासूनच शहरातील बहुतांशी अतिक्रमणधारक ‘गायब’ झाले आहेत. त्याचा परिणाम महामार्गासह शहरातंर्गत रस्त्यांवर दिसून येत असून प्रदीर्घ कालावधीनंतर संगमनेरकरांनी मोकळा श्वास घेतला आहे. यापुढील कालावधीतही शहरातंर्गत रस्त्यांची स्थिती अशीच रहावी अशा अपेक्षाही यानिमित्ताने सामान्य नागरीकांमधून व्यक्त होत आहेत.

मागील काही वर्षात संगमनेर शहराने मोठी प्रगती केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचे व्यापारी संगमनेरकडे आकर्षित झाले असून सुवर्ण अलंकार, कापडं यासह वेगवेगळ्या उद्योगांच्या माध्यमातून शहराची ऐतिहासिक बाजारपेठ विस्तारली आहे. एकीकडे शहराचा व्यापार समृद्ध होत असताना दुसरीकडे दूरदृष्टीचा अभाव असलेल्या पालिकेकडून रस्त्यांची रुंदी मात्र संकुचित केली जात असल्याने शहरात समृद्धीसोबतच गचाळपणाही त्याच गतीने वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रगत बाजारपेठ असूनही आजही शहराला बेशिस्तीचा डाग मात्र खोडता आलेला नाही. त्यातच आता राजकीय आश्रयाने गावभर बोकाळलेल्या अतिक्रमणांच्या अड्ड्यांमधून गुन्हेगारी कृत्य आणि शहर अशांत करण्याचे षडयंत्रही समोर येवू लागल्याने शहरातील बेसुमार अतिक्रमणांबाबत सर्वसामान्यांच्या मनात संताप खद्खदू लागला आहे.


नाममात्र 20 रुपयांत कोठेही अतिक्रमण करण्याचा सरकारी परवाना आणि अविरत राजकीय आशीर्वाद यामुळे शहराची रया गेलेली असताना रविवारी (ता.28) जोर्वेनाक्यावरील सरकारी जागांमध्ये थाटात वडे, भजे, चिकनच्या गोंडस नावाखाली सुरु असलेल्या दुकानांमधून पोसलेल्या गुंडांनी जवळपास दीडशेहून अधिक लोकांचा जमाव गोळा करुन जोर्वे येथील शेतकरी कुटुंबातील आठ जणांना अमानुषपणे मारहाण केली. या घटनेनंतर पालिकेची पैशांची ‘भूक’ आणि त्यातून रस्त्यारस्त्यावर जन्माला आलेले अतिक्रमणधारक नावाचे ‘गुन्हेगार’ (याला अनेक अपवादही आहेत.) आणि त्यांच्या संघटित हल्ला करण्याच्या वृत्तीने शहरातील अतिक्रमणांचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.


पहिल्यांदाच जोर्वे नाक्यावरील घटना शहरासह लगतच्या दहा ते बारा गावांमध्ये जातीय तणाव निर्माण करणारी ठरल्याने पोलिसांनी स्थानिक दबाव झुगारुन ‘त्या’ दीडशे जणांची ओळख पटविण्यास सुरुवात केली आहे. तर, दुसरीकडे या घटनेला कारणीभूत ठरलेली जोर्वेनाका येथील सर्व अतिक्रमणे हटवून पालिकेनेही आपला खांदा मोकळा करण्याचा खटाटोप केला आहे. ही घटना शहराच्या सामाजिक सौहार्दावरच घाला घालणारी ठरल्याने पालिकेची कारवाई जरी जोर्वे नाक्यावर झाली असली तरीही त्याचे पडसाद मात्र शहरातील सर्वच ठिकाणच्या अतिक्रमणावर पडले आहेत. त्यामुळे मंगळवारी सकाळी दैनिक नायकने जोर्वेनाका अतिक्रमण हटाओ माहीमेचे सर्वप्रथम वृत्त देताच काही वेळातच शहरातील रस्त्यारस्त्यावर टपर्‍या, हातगाड्या, पथार्‍या घेवून बसलेल्यांची पळापळ सुरु झाली.


मंगळवारी (ता.30) रात्री अनेक भागातील पक्क्या टपरीधारकांनी मजूर लावून टपरीखालचे सिमेंट काँक्रिटचे फाऊंडेशन उचकाटून टपर्‍या वाहून नेल्या तर आज (ता.31) सकाळपासून गावभर बोकाळलेले फळ विक्रेते, पथार्‍या मांडून बसणारे, खेळणी-लहान मुलांची कापडं विकणारे, जागो-जागी भाजीपाला घेवून बसणारे अशा सगळ्याच श्रेणीतील अतिक्रमणधारकांनी पालिकेच्या कारवाईचा धसका घेतला आहे. या अतिक्रमणधारकांनी आपल्या राहत्या घरात रस्त्यावर एैसपैस थाटून बसतात तसं दुकान मांडून आपल्या असभ्यपणामुळे सामान्यांना दररोज कसा त्रास होत असेल याचा अनुभव घेण्याचा सल्लाही यानिमित्ताने मोकळा श्वास घेणार्‍या आणि आज सकाळी वाहतुकीच्या कोणत्याही दबावाशिवाय आपली इलेक्ट्रिक मोपेड घेवून देवदर्शनाला निघालेल्या एका 73 वर्षीय आजोबांनी दिला.


जोर्वेनाक्यावरील पालिकेच्या कारवाईचा धसका घेतल्याने सर्वसामान्य संगमनेरकरांना नकोसा वाटणार्‍या चावडी ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, नवीन नगर रस्ता ते भूमी अभिलेख कार्यालय, बसस्थानक व त्याला असलेला फळविक्रेत्यांचा विळखा, साईनाथ चौक ते गवंडीपूरा, बाजारपेठ, रंगारगल्ली, नवीन अकोले रोड, अकोले नाका चौफुली, दिल्ली नाका, तीनबत्ती चौक, नेहरु चौक, बी. एड्. कॉलेज, नाशिक रस्ता अशा शहरातील वर्दळीच्या बहुतेक रस्त्यांवरुन अतिक्रमणधारक ‘गायब’ झाल्याने प्रदीर्घ कालावधीनंतर शहराच्या सगळ्याच रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र दिसत होते. अशीच परिस्थिती यापुढेही कायम राहावी अशी अपेक्षा सर्वसामान्य संगमनेरकर व्यक्त करीत आहेत.


निळवंडे धरणाच्या कालव्यांना पाणी सोडण्याच्या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आज अकोले तालुक्यात असल्याने संगमनेर तालुक्यातील चारही पोलीस ठाण्यांसह जोर्वे घटनेमुळे शहरात आलेला अतिरिक्त बंदोबस्तही अकोल्याकडे पाठविण्यात आला आहे. वरीष्ठ पोलीस अधिकारीही आज बंदोबस्ताच्या कामात असल्याने पालिकेने आजची मोहीम स्थगित केली आहे. मात्र यापुढील काळात धडक कारवाई होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. शिवाय सकाळी पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख आपल्या सहकार्‍यांसह गावात फिरुन अतिक्रमणधारकांना पिटाळीत असल्याचेही दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *