दुष्काळी संकटात जनतेच्या मदतीला प्राधान्य द्या ः थोरात संगमनेरात टंचाई आढावा बैठक; अधिकार्यांच्या अनुपस्थितीवर नाराजी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
यावर्षी राज्यात विविध ठिकाणी व संगमनेर तालुक्यात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. यामुळे येणारे वर्ष हे मोठे संकटाचे व दुष्काळाचे असून विविध गावांना टँकरने पिण्याचे पाणी पुरविणे, रोजगार हमीचे कामे उपलब्ध करून देणे व आगामी काळात जनावरांसाठी चारा उपलब्ध करणे प्रशासनाचे मोठे काम आहे. या कामात कोणीही राजकारण व हलगर्जीपणा करू नका असे सांगताना दुष्काळी संकटात जनतेच्या मदतीला प्राधान्य द्या अशा सूचना माजी मंत्री तथा विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
संगमनेरातील प्रांताधिकारी कार्यालय येथे झालेल्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी समवेत शंकर खेमनर, इंद्रजीत थोरात, मिलिंद कानवडे, रामहरी कातोरे, मीरा शेटे, अजय फटांगरे, सीताराम राऊत, नवनाथ अरगडे, अशोक सातपुते, अविनाश सोनवणे, सुभाष सांगळे, बी. आर. चकोर, प्रभाकर कांदळकर यांचेसह विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले, अल निनोचाच्या प्रभावामुळे यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाला आहे. तालुक्यात अवघा ३९ टक्के पाऊस झाला असून येणारे वर्ष हे मोठे संकटाचे आहे. याकाळात प्रशासनाने जनतेच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे. पिण्याच्या पाण्याच्या टँकरचा प्रस्ताव आल्यानंतर तातडीने टँकर द्या. ज्या गावांमध्ये दहा मजूर असतील तेथे रोजगार हमीचे कामे सुरू करा व तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुधन असल्याने पशुधनासाठीही चारा उपलब्ध होण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे.
दुष्काळात जनतेच्या पाठिशी उभे राहणे हे सरकारचे काम आहे. अधिकार्यांनी टंचाई आढावा बैठकीला हजर राहणे अनिवार्य आहे. मात्र मंत्री यांच्याकडे जाण्याकरीता टंचाई आढावा बैठकीला अनुपस्थित राहणे हे अत्यंत गैर आहे. पालकमंत्र्यांची भूमिका ही पालकाची असते त्रास देण्याची नसते असे सांगताना आपल्या काळात सुरू केलेल्या ई-पीक पाहणीचा प्रकल्प हा राज्यासाठी व देशासाठी दिशादर्शक आहे. मात्र सध्याच्या सरकारला त्याचे गांभीर्य नाही. आपण तालुक्यातील विविध गावांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी जलजीवनमधून ८०० कोटींचा निधी मिळवला आहे. या योजना सुरळीतपणे चालवणे त्या गावांची जबाबदारी आहे. विजेच्या बाबत तालुक्यातील अनेक नागरिकांच्या मोठ्या तक्रारी असून थकीत बिलावर आकारले जाणारे १८ टक्के व्याजही सावकारी दराच्या पुढे आहे हे अत्यंत चुकीचे आहे.
दुष्काळ निवारण कामांमध्ये गाव पातळीवरील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक यांचेसह सर्व अधिकार्यांनी अत्यंत जबाबदारीने मदतीची भूमिका घ्यावी. याचबरोबर तालुक्यातील पाण्याचे नियोजन करताना एप्रिल-मे महिन्याचे संकट डोळ्यासमोर ठेवून प्रशासनाने काम करावे. याशिवाय खरीप पिके पूर्णपणे वाया गेली आहे. त्यामुळे पीकविमा योजनेमधून तातडीने सर्व शेतकर्यांना मोठी मदत मिळावी अशी मागणीही सरकारकडे केली आहे. यावेळी गटविकास अधिकारी अनिल नागणे, कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांसह विविध विभागांचे अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक आदी उपस्थित होते.
प्रांताधिकारी व तहसीलदार अनुपस्थित…
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर टंचाई आढावा बैठक अत्यंत महत्त्वाची असून या महत्त्वाच्या बैठकीकरीता प्रांताधिकारी व तहसीलदारही अनुपस्थित राहिल्याने माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. इकडे महत्त्वाची बैठक आहे. हे मंत्र्यांना सांगता आले नाही का असे सांगताना प्रशासनाचे असे वागणे बरोबर नाही, आपणही अनेक वर्ष महसूल, कृषी यांसारखे महत्त्वाचे विभाग सांभाळले आहे. मात्र याकाळात जनतेच्या मदतीसाठी प्रशासनाने काम करावे. याबाबत आपण काळजी घेतली हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे असेही ते म्हणाले.