‘लव्ह ट्रँगल’मधून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न! संगमनेर बसस्थानकावरील धक्कादायक प्रकार; रिक्षाचालकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पुणे जिल्ह्यातील नसरापूरमध्ये घडलेल्या अत्याचार आणि खुनाच्या घटनेने अवघा महाराष्ट्र सुन्न झालेला असताना संगमनेर शहरातूनही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मूळच्या अकोले तालुक्यातील मात्र नोकरीनिमित्त पुण्यात राहणार्या एका तरुणीला ‘लिफ्ट’ देण्याच्या बहाण्याने आपल्या दुचाकीवरुन संगमनेर बसस्थानकात आणून नंतर बळजबरीने रिक्षात बसवून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र आरोपीच्या कृतीतून संशय निर्माण झाल्याने रिक्षाचालकांनी पीडितेकडे चौकशी करीत त्याची यथेच्छ धुलाई केली. या दरम्यान पीडित तरुणीने ‘112’ क्रमांकावर फोन केल्याने पोलिसही घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत ‘लव्ह ट्रँगल’मधून हा प्रकार घडल्याचे समोर आले असून पीडितेच्या मित्राच्या मित्रानेच हा प्रकार केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पीडितेच्या वडिलांना पाचारण करण्यात आले असून त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार आज (ता.4) सकाळी साडेनऊच्या सुमारास संगमनेर बसस्थानकावर घडला. मूळच्या अकोले तालुक्यातील देवठाणमध्ये राहणारी 22 वर्षीय पीडित तरुणी नोकरीनिमित्ताने चाकणमध्ये वास्तव्यास आहे. गेली दोन दिवस सुट्टी असल्याने ती आपल्या घरी आली होती. आज सकाळी ती चाकणला जाण्यासाठी खासगी प्रवासी गाडीने अकोले नाक्यावर उतरली व तेथून बसस्थानकावर जाण्यासाठी निघणार इतक्यात आधीपासूनच मनात कावा घेवून तिच्या पाठीला असलेल्या त्याच गावातील एका 25 वर्षीय तरुणाने आपल्या दुचाकीवरुन तिच्या समोर येत ‘लिफ्ट’ देण्याचा बहाणा केला.

पीडित तरुणीच्या मित्रासोबत कधीतरी पाहिलेला तरुण अचानक भेटल्याने त्याच्यासोबत जाण्यात अडचण नाही अशा सहज विचाराने पीडिता त्याच्या दुचाकीवर बसली. अकोलेनाक्यापासून बसस्थानकापर्यंतच्या अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरातच आरोपीने आपल्या मनातील वासना शमवण्याच्या उद्देशाने तिच्याशी संभाषण सुरु केले. त्यावरुन पीडितेच्या मनात शंकेची पाल चुकचूकली आणि तिने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत त्याला साडेनऊची गाडी सुटेल, लवकर चल असे म्हणत घाई करण्यास सुरुवात केली. तो पर्यंत बसस्थानकही आले आणि पीडितेने त्याच्या दुचाकीवरुन उतरुन लागलीच पुण्याकडे जाणार्या बसकडे जाण्यास सुरुवात केली.

मात्र मनात ‘पाप’ घेवून देवठाणपासून तिच्या मागावर असलेल्या आरोपीने थेट तिचा हात पकडून बळजबरीने तिला रिक्षाथांब्याकडे ओढीत एका रिक्षात बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या या कृतीने रिक्षाचालकांना संशय आल्याने त्यांनी पीडितेकडे चौकशी केली असता आरोपी तिच्या इच्छेविरुद्ध तिला बळजबरीने अज्ञात ठिकाणी घेवून जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या रिक्षाचालकांनी आरोपीची यथेच्छ धुलाई करीत त्याच्या तावडीतून पीडितेची सुटका केली. मात्र या गदारोळात आरोपी आपली दुचाकी तेथेच सोडून पळून गेला. या दरम्यान ‘त्या’ तरुणीने आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी असलेल्या ‘112’ क्रमांकावर फोन करुन पोलिसांची मदत मागितली. त्यानुसार काही वेळातच पोलिसांचे वाहन आणि पालिकेचे सुरक्षादलही बसस्थानकात पोहोचले.

प्राथमिक चौकशीनंतर आरोपीची बजाज-पल्सर दुचाकी (क्र.एम.एच.17/डी.एल.5168) ताब्यात घेत पोलिसांनी त्यावरुन आरोपीचा माग काढला आणि त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणातील पीडितेच्या वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले असून त्यानंतरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

सध्या उन्हाचा पारा आणि त्यातून असह्य उकाडा जाणवत असल्याने रोजची कामे आटोपण्यासाठी सकाळीच मोठी गर्दी असते. त्यातच संगमनेरचा अकोलेनाका (जाजू पेट्रोल पंप) आणि बसस्थानक म्हणजे प्रवाशांच्या वर्दळीचे आगारच. अशा स्थितीतही भूतकाळात पीडितेच्या मित्रासोबत केवळ एकदाच भेट झालेल्या एखाद्या तरुणाने थेट आपल्याच मित्राच्या मैत्रिणीबाबत मनात ‘पाप’ ठेवून थेट तिचे अपहरणच करण्याचा प्रयत्न करणे अतिशय दुर्मीळ घटना असून या प्रकाराने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नोकरी अथवा शिक्षणानिमित्त गावापासून दूर जाणार्या मुलींनी अशा प्रकारातून धडा घेण्याची आवश्यकता असून अनोळखी अथवा केवळ तोंड ओळख असलेल्यांकडून ‘लिफ्ट’ मागताना अथवा घेताना तिनवेळा विचार करण्याची गरज अधोरेखीत झाली आहे.

सदरचे प्रकरण एकाच गावातील तरुण व तरुणीमध्ये घडले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीत पीडित तरुणी देवठाणहून खासगी वाहनाने संगमनेरच्या अकोलेनाक्यावर (जाजू पेट्रोल पंप) आली. तेथून बसस्थानकापर्यंतच्या ‘लिफ्ट’मध्ये आरोपीने पीडितेला आपल्या मनातील कावा सांगून भुलवण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडितेने त्यास नकार दिल्यानंतर त्याने बसस्थानकावरुन तिला बळजबरीने रिक्षात बसवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा मनसुबा उधळला गेला. हा संपूर्ण प्रकार अतिशय वर्दळीच्या ठिकाणांसह रस्त्यावर घडल्याने वेळीच लोकांच्या मदतीने टाळला गेला, मात्र हाच प्रकार एखाद्या निर्मनुष्य रस्त्यावर घडला असता तर?, त्यामुळे महिला, विद्यार्थीनी अथवा नोकरदार तरुणींनी ‘लिफ्ट’ मागताना अथवा स्वीकारताना आपण कोणासोबत चाललोय याचा विचार करुनच निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

