राहुरीमध्ये चोरट्यांचे व लुटारुंचे सत्र सुरू
नायक वृत्तसेवा, राहुरी
शहरात व तालुक्यात पुन्हा चोर्या व लुटारुंचे सत्र सुरू झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. राहुरी फॅक्टरीजवळ दोघा ट्रकचालकांवर तिघा लुटारूंनी हल्ला करून त्यांच्याकडील 17 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. तर उंबरे येथे दूध संकलन केंद्र फोडून चोरट्यांनी 47 हजार रुपयांचे सहित्य चोरून नेले.
पहिल्या घटनेत राहुरी फॅक्टरीजवळील ढाब्याजवळ लघुशंकेसाठी दोन ट्रकचालक थांबले असता तिघा लुटारुंनी संधीचा फायदा घेत हल्ला करून त्यांच्याकडील 17 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात संतोष बाबासाहेब कटारे (वय 30, रा.हिलालपूर, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे हे करत आहेत. तर दुसरी घटना तालुक्यातील उंबरे येथे घडली आहे. येथील दूध संकलन केंद्र चोरट्यांनी फोडून 47 हजार रुपयांचे सहित्य चोरून नेले. 22 ते 23 जानेवारी दरम्यान या दोन्ही घटना घडल्या आहेत. याप्रकरणी सुनील अण्णासाहेब ढोकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे.