कर्तव्य, समर्पण आणि अतुलनीय कामगिरीचा गौरव! गुप्तवार्ताच्या विशाल मेंद्रे यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह..


संगमनेर, प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पोलीस दलात आपल्या कर्तव्याचा ठसा उमटविणार्‍या अधिकार्‍यांचा सन्मान करण्याची परंपरा यंदाही दिमाखात पार पडली. राज्य गुप्तवार्ता विभागात कार्यरत असलेले गुप्तवार्ता अधिकारी विशाल मेंद्रे यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवा आणि समर्पित कर्तव्यनिष्ठेबद्दल राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र’ देऊन गौरवण्यात आले. मुंबईतील पोलीस मुख्यालयात पार पडलेल्या विशेष सोहळ्यात त्यांना सन्मान प्रदान करण्यात आला.


सन 2024 च्या पुरस्कारांसाठी राज्य गुप्तवार्ता विभागातील एकूण 22 अधिकार्‍यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, नाशिक विभागांतर्गत येणार्‍या नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांतून केवळ दोनच अधिकार्‍यांना हा बहुमान मिळाला आहे. त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातून विशाल मेंद्रे हे एकमेव अधिकारी ठरले आहेत. पोलीस दलातील कठीण आव्हाने पेलत असताना त्यांनी दाखवलेली कार्यतत्परता आणि गोपनीय माहिती संकलनातील त्यांचे कौशल्य या पुरस्काराच्या रुपाने अधोरेखित झाले आहे.


विशाल मेंद्रे यांनी महाराष्ट्र पोलीस दलात आतापर्यंत 23 वर्षे प्रदीर्घ सेवा बजावली आहे. या काळात त्यांनी अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील विविध पोलीस ठाणी आणि शाखांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सध्या ते राज्य गुप्तवार्ता विभागात कार्यरत असून, राज्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या या विभागात त्यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे.


मुंबईत पार पडलेल्या या गौरव सोहळ्याप्रसंगी राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, सहआयुक्त रवींद्र शिसवे यांसह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पोलीस महासंचालकांनी यावेळी उपस्थित अधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना राज्यातील परिस्थिती आणि भविष्यातील आव्हाने यावर भाष्य केले. मेंद्रे यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Visits: 109 Today: 2 Total: 1859415

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *