संगमनेरात कोविडचा ‘कभी धुप तो कभी छाँव’चा खेळ! प्रशासनाकडून चाचण्यांमध्ये सातत्य नसल्याने अचानक वाढते रुग्णसंख्या..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
दिवाळीच्या दिवसापासून चढाला लागलेली रुग्णगती गेल्या दोन दिवसांत काहीशी मंदावल्याने रुग्णवाढीला ब्रेक लागला होता. मात्र मंगळवारी पुन्हा एकदा महिन्यातील तिसरी उच्चांकी रुग्णसंख्या समोर आल्याने दुसर्या लाटेची दाहकताही स्पष्ट झाली. त्यानंतर कालच्या बुधवारी पुन्हा रुग्णसंख्येला ब्रेक लागला. मात्र यामागे चाचण्यांची संख्या आणि बदललेली कार्यपद्धती याचा मोठा वाटा असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळेच बुधवारी रुग्णसंख्येत घट झाली. बुधवारी रात्री उशीराने शहरातील आठ जणांसह एकूण 23 जणांचे स्राव चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे रुग्णसंख्या पुढे सरकत आता 5 हजार 31 वर पोहोचली आहे.
नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून रिव्हर्स गिअर टाकणार्या कोविडने 15 नोव्हेंबरपर्यंत संगमनेरकरांना दिलासा दिला होता. मात्र त्यानंतर अचानक टप्प्याटप्प्याने रुग्णसंख्येत भर पडू लागल्याने तालुक्याची कोविड स्थिती आणखी चिंताजनक होत गेली. 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत तालुक्यातील एकूण रुग्णसंख्येत सरासरी दररोज 22.47 रुग्णगतीने 337 रुग्णांची तर 16 ते 25 नोव्हेंबर या अवघ्या दहा दिवसांत 40.60 या गतीने तालुक्याच्या रुग्णसंख्येत तब्बल 406 रुग्ण अशा या महिन्यात आत्तापर्यंत 743 रुग्णांची (30 रुग्ण दररोज) भर पडली आहे.
डिसेंबरमध्ये कोविड संक्रमणाची दुसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी वर्तविली होती. मात्र तत्पूर्वीच आलेल्या हिंदु धर्मियांच्या दिवाळी सणाने जाणकारांचा अंदाज चुकवला आणि तब्बल पंधरा दिवसांआधीच कोविडने संगमनेरात खळबळ उडवून दिली. अचानकच्या या कोविड धाडीने काहीसं सुस्त झालेलं प्रशासन खडबडून जागं झालं. मात्र त्यांच्याकडूनही आता केवळ दाखल रुग्णांना उपचार कसे मिळतील आणि वरिष्ठांना दररोजचा ‘अपडेट’ अहवाल कसा देता येईल यावरच अधिक ‘फोकस‘ असल्याने बाधित आढळलेल्या व्यक्तिच्या शेजारच्यांनाही आपल्या बाजूलाच रुग्ण आढळल्याचे समजेनासे झालंय.
पूर्वी एखादा रुग्ण आढळला तरीही संपूर्ण परिसर ‘सील’ केला जायचा. पालिकेचे आरोग्य कर्मचारी त्यासाठी अत्यंत तत्पर असतं. नंतर नियम बदलले आणि प्रतिबंधित क्षेत्राची मर्यादा गल्ली-चौकापर्यंत आली. कालांतराने त्यातही बदल झाले आणि बाधित आढळून आलेली रहिवासी इमारतच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याचा नियम आला. पुढच्या टप्प्यात फक्त बाधिताचे घर प्रतिबंधित केले जावू लागले. आतातर ते देखील बंद झाल्याने परिसरात आढळलेला रुग्ण कोण हे देखील त्या रुग्णाच्या शेजार्यांना समजत नाही.
यापूर्वी कोविडवर नियंत्रण मिळविण्यासाठी रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा कसोशीने शोध घेतला जात व त्यांना विलगीकरणात जावे लागत. आता विलगीकरण ही व्याख्याच बदलली आहे. खुद्द रुग्णालाच स्वतः होवून आपलीच चाचणी करण्यासाठी चाचणी केंद्रावर जावे लागते, मग तेथे संपर्कातील व्यक्तिंची काय गणती आहे?. त्यामुळे सगळंकाही आलंबेल सुरु असल्याचीच स्थिती आहे. चाचणी केंद्रांवर होणार्या चाचण्यांही कमी-जास्त होत असल्याने रुग्णसंख्येत चढउतार बघायला मिळत आहे. त्यामुळे या लाटेचा नेमका अंदाज बांधता येणंही अवघड झालं आहे. संगमनेरातील रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेडस्ची संख्या पाहून चाचण्यांचा वेग ठरवला जातोय की काय अशी शंका घेण्यासही येथे वाव आहे.
बुधवारी (ता.25) रॅपिड अँटीजेनच्या अवघ्या 120 चाचण्या करण्यात आल्या, त्यातून केवळ दहा रुग्ण समोर आले. मात्र प्रशासनाने जाहीर केलेल्या यादीत त्यातीलही केवळ सात रुग्णांची नोंद दिसते. उर्वरीत सोळा अहवाल खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेले आहेत. या अहवालातून शहरातील सात जणांसह एकूण 23 रुग्ण समोर आले असून त्यात शहरातील विद्यानगर परिसरातील 54 वर्षीय इसम, साईबन वसाहतीतील 70 वर्षीय महिला, आंबेडकर नगरमधील 35 वर्षीय महिलेसह आठ वर्षीय बालक, कोष्टी गल्लीतील 21 वर्षीय तरुण, भारतनगरमधील 42 वर्षीय तरुण, शिवाजीनगर मधील 28 वर्षीय महिला व सावतामाळी नगरमधील 50 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
ग्रामीणभागातील धांदरफळ खुर्द येथील 36 वर्षीय महिला, चिखली येथील 61 व 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, साकूर येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निमगाव जाळी येथील 25 वर्षीय तरुण, उंबरी बाळापूर येथील 51 वर्षीय इसमासह 50 वर्षीय महिला, घुलेवाडी शिवारातील विधी महाविद्यालयाजवळील 29 वर्षीय महिलेसह घुलेवाडीतील 21 वर्षीय तरुण, काकडवाडीतील 80 वर्षीय वयोवृद्ध नागरिक, मेंढवण येथील 47 वर्षीय महिला, दाढ बु. येथील 40 वर्षीय तरुण, रहाणेमळा (गुंजाळवाडी) येथील 44 वर्षीय तरुण, मंगळापूर येथील 73 वर्षीय महिला व सुकेवाडी येथील 35 वर्षीय तरुण अशा एकूण 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्याची रुग्णसंख्या आता 5 हजार 31 वर पोहोचली आहे.
प्रशासनाकडून रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या संख्येत सतत बदल केले जात असल्याने रुग्णसमोर येण्याच्या संख्येत चढ-उतार दिसून येतो. यामागे शहरातील रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेडस्चे गणितं तर पाहीले जात नाही ना? अशी शंकाही आता त्या निमित्ताने सुरु झाली आहे. आधीच रुग्णाचा संपर्क शोधण्यात झालेले बदल आणि त्यात आता चाचण्यांचा हा खेळ यामुळे तालुक्यात कोविडचा ‘कभी धुप तो कभी छाँव’चा खेळ सुरु असल्याचेच चित्र दिसत आहे.