संगमनेर औद्योगिक वसाहतीमध्ये चोरी करणारे आरोपी गजाआड उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या पथकाची कारवाई; मुद्देमाल जप्त
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर उपविभागात चोरीच्या गुन्ह्याचे प्रमाण वाढत असल्याने गुन्हेगारांची माहिती काढून कारवाई करून गुन्हे उघडकीस आणण्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या पथकाने संगमनेर औद्योगिक वसाहतीमध्ये चोरी केलेल्या दोघा आरोपींना पकडून बॅटर्या, लॅपटॉप, एलईडी टीव्ही आणि दुचाकीसह हस्तगत केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, संगमनेर उपविभागात चोर्यांचे गुन्हे अधिक वाढले आहेत. याबाबत वरीष्ठ अधिकार्यांनी उपविभागीय अधिकार्यांना कारवाई करण्याबाबत सूचित केले होते. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकार्यांना संगमनेर औद्योगिक वसाहतीमध्ये चोरी केलेल्या आरोपींबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकातील पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, फुरकान शेख, पोलीस शिपाई अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, गणेश शिंदे यांच्या पथकाने सापळा लावून संदीप उर्फ जब्या संजय वाल्हेकर (रा. अठरापगड, गुंजाळवाडी शिवार, ता. संगमनेर) व सागर बाळू गायकवाड (रा.साठेनगर, घुलेवाडी) यांना दुचाकीसह पकडले.
त्यानंतर त्यांच्या साथीदारासह त्यांनी वरील गुन्हा केला असल्याचे सांगितले. त्यांना विश्वासात घेवून विचारपूस केली असता निखील विजय वाल्हेकर (रा. अठरापगड, गुंजाळवाडी शिवार, संगमनेर), कपील देविदास साठे (वय 19, रा. साठेनगर, घुलेवाडी, ता. संगमनेर), विधीसंघर्षित बालक यांच्याशी संगनमत करुन गुन्हा केल्याचे सांगितले. तसेच चोरी केलेले लॅपटॉप, एल. सी. डी. टी. व्ही. त्यांचा मित्र अक्षय लहानू जाधव (रा. निमज, हल्ली रा. बटवाल मळा, संगमनेर) याच्या मार्फत विक्री केल्याचेही सांगितले. तसेच औद्योगिक वसाहत शिवारातून चोरी केलेल्या बॅटर्यांची कबुली दिली. याचबरोबर दुचाकी (क.एमएच.17, झेड.0662) ही 8 फेब्रुवारी 2022 रोजी संगमनेर शहरातील पेटीट सर्कल येथून चोरी केली असल्याचेही स्पष्ट झाले. त्यांच्यावर चोरीचे एकूण 4 गुन्हे दाखल आहेत. यातील मुख्य आरोपी संदीप उर्फ जब्या वाल्हेकर हा संगमनेर शहर पोलीस ठाणे गुरनं. 515/2021 भा. दं. वि. कलम 457, 380 प्रमाणे दाखल गुन्ह्यात यापूर्वी फरार होता. तसेच निखील वाल्हेकर यास याच पोलीस ठाण्यातील गुरनं.87/2022 भा. दं. वि. कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्यात अटक केलेली आहे. दरम्यान, वरील आरोपींकडून लिनिओ व अॅसुस कंपनीचा लॅपटॉप, टी. सी. एल. कंपनीचा 32 इंची एल. एई. डी. टीव्ही., एच. ओ. एम. कंपनीचा 32 इंची एल. ई. डी. टीव्ही., हिरो होन्डा कंपनीची स्प्लेंडर दुचाकी असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ज्ञानेश्वर सोनवणे हे करीत आहेत.