संगमनेरच्या वैभवशाली बसस्थानकाला भिक्षेकर्यांचे ग्रहण! मुख्य प्रवेशद्वारातच चोवीस तास बस्तान; अनैतिक धंदेवाईकांचाही कायम मुक्काम..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यात सर्वाधिक देखणे ठरलेले आणि शहराच्या वैभवात भर घालणारे संगमनेरचे बसस्थानक आता पुर्णतः भिक्षेकरी, भटके आणि अनैतिक व्यावसायिकांच्या गराड्यात सापडले आहे. बसस्थानकात प्रवेश करण्यासाठी उभारण्यात आलेल्या मुख्य प्रवेशद्वारातच या मंडळींनी आपले बस्तान बांधल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच या भिक्षेकर्यांमध्ये काही अनैतिक व्यवसाय करणार्या महिलांचाही समावेश असल्याने संगमनेरचे वैभवशाली बसस्थानक आता अवैध व्यवसायांचे केंद्रही ठरु लागले आहे. प्रवेशद्वारातच कोंडाळे घातलेल्या या मंडळींचा केवळ प्रवाशीच नाही तर, लाखो रुपये देवून येथील गाळे घेणार्या व्यावसायिकांना व त्यांच्या ग्राहकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. संगमनेर आगार प्रमुखांनी या गोष्टींची गांभीर्याने दखल घेण्याची गरज यानिमित्ताने समोर आली आहे.

आपल्या राजकीय कारकीर्दीचा वापर संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी खर्च करणार्या नामदार बाळासाहेब थोरात यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणून संगमनेर बसस्थानकाकडे पाहिले जाते. जिल्ह्याच्या बसस्थानकालाही मागे टाकणारी संगमनेरच्या बसस्थानकाची भव्य-दिव्य वास्तू, व्यापारी संकुल आणि विस्तीर्ण फलाटांमुळे नूतनीकरणानंतर जिल्ह्यात देखण्या आणि संगमनेरसाठी वैभवशाली ठरलेल्या या बसस्थानकाचा ताबा मात्र सध्या असंख्य भिक्षेकरी, भटके व अनैतिक व्यवसाय करणार्या काही महिलांच्या हाती गेल्याचे भयानक चित्र सध्या येथे 24 तास बघायला मिळत आहे.

कोट्यावधींचा खर्च करुन उभ्या राहिलेल्या या वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी अतिशय देखणे आणि विस्तीर्ण प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. सुरुवातीचा काहीकाळ प्रवाशांना बसस्थानकात प्रवेशताना विमानतळाचा ‘फील’ देणार्या या मुख्य प्रवेशद्वारात आता मात्र शंभराहून अधिक भिक्षेकर्यांनी कायमस्वरुपी तळ ठोकला आहे. 24 तास प्रवेशद्वारातच झोपून राहणे अथवा तेथेच वावरणे, आपल्या सामानाचे ओझे तेथेचे जागोजागी ढीग करुन ठेवणे, तेथेच खाणे-पिणे आणि तेथेच अन्य सगळ्या गोष्टी यामुळे बसस्थानकाचा हा परिसर अतिशय घाणेरडा वाटू लागला आहे.

दोन वर्षांपूर्वी देशासह राज्यात झालेल्या कोविड संक्रमणात बंद असलेल्या या बसस्थानकाचा अनेकांना आधार मिळाला. याकाळात शहरातील काही सामाजिक संस्था व संघटनांनी निराधार असलेल्यांची दोनवेळच्या जेवणाची दीर्घकाळ सोय केल्याने येथील भिक्षेकर्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यातच दिवाळीनंतर राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांनी संप पुकारल्याने सुमारे सहा महिने बसस्थानकातून प्रवाशांची ये-जा बंद होती. त्याचा पुरेपूर फायदा घेत गेल्या दोन वर्षात शंभरावर भिक्षेकर्यांनी मुख्य प्रवेशद्वारासह बसची प्रतीक्षा करणार्या प्रवाशांसाठीच्या बाकड्यांवरही आपला मालकी हक्क प्रस्थापित केला आहे.

बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासह स्थानकातील बाकड्यांवर ठाण मांडलेल्या या मंडळीत बहुतेकजण भिक्षेकरी व निराधार आहेत. सुरुवातीपासून त्यांच्या येथील वावराला मानवतावादी दृष्टीकोनातून कोणीही प्रतिबंध न केल्याने आता येथील वास्तव्य त्यांना त्यांचा अधिकार वाटू लागला आहे. याचा फायदा घेत काही अनैतिक व्यवसाय करणार्या महिलांनीही या भिक्षेकर्यांमध्ये बस्तान बांधले असून रात्री दहानंतर त्यांचे अवैध धंदे सुरु होतात. त्यामुळे या परिसरात रात्रीच्या वेळी आंबटशौकीन व तळीरामांचीही मोठी संख्या वाढत असल्याने बाहेरगावाहून आलेल्या व अन्य बसची प्रतीक्षा करणार्या प्रवाशांची सुरक्षाही धोक्यात आली आहे.

दिवसातील चोवीस तास एकाच जागी ठाण मांडून असलेल्या या मंडळींमुळे या परिसरात घाणीसह दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून जिल्ह्यात वैभवशाली ठरलेल्या या बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जाणार्यांना अक्षरशः नाक मुरडूनच जावे लागते. या सर्व मंडळीला येथून अन्यत्र हलवावे अशी मागणी यापूर्वीही वेळोवेळी करण्यात आली आहे. मात्र संगमनेर आगाराचे प्रमुख या ज्वलंत विषयाकडे लक्ष्य देण्यास तयारच नसल्याने लाखो रुपये देवून आसपास व्यवसाय मांडून बसलेल्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची वेळ आली आहे. संबंधितांनी या विषयाची दखल घेवून संगमनेरच्या वैभवात भर घालणारी ही वास्तू भिक्षेकरी मुक्त करावी अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरु लागली आहे.

गेल्या चार दशकांपासून संगमनेरचे लोकप्रतिनिधीत्त्व करणार्या नामदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत शहर व तालुक्याच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यातूनच संगमनेर पंचायत समिती, यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती शासकीय कार्यालय, तहसील कार्यालय, संगमनेर बसस्थानक आणि जिल्हा व सत्र न्यायालयाची देखणी इमारत उभी राहीली. येथील कार्यालये सुरु झाल्यानंतर त्या-त्या इमारतींची देखभाल व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तेथील वरीष्ठ अधिकार्यांची असतांना त्यांना मात्र त्याचा विसर पडल्याचेच चित्र सध्या दिसत आहे. या सर्वांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करुन देण्याची गरजही यानिमित्ताने प्रकर्षाने समोर आली आहे.

