‘आयपीएस’ सुदर्शन मुम्मका जिल्ह्याचे नवे अधीक्षक! शिस्तबद्ध कार्यशैलीचा अधिकारी; चंद्रपूरात प्रभावी कारकीर्द ..

नायक वृत्तसेवा, अहिल्यानगर
राज्याच्या गृह विभागाने पोलीस दलात मोठे फेरबदल केले असून, चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांची आता अहिल्यानगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या धाडसी निर्णयांसाठी आणि धडाडीच्या कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे मुम्मका यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे.

सुदर्शन मुम्मका यांनी यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात अत्यंत प्रभावी कामगिरी बजावली आहे. विशेषतः कोळसा माफिया, अवैध दारु तस्करी आणि वाळू उपशाविरुद्ध त्यांनी उघडलेली मोहीम प्रचंड चर्चेत राहिली होती. केवळ गुन्हेगारांवरच नव्हे, तर पोलीस दलातील कामात कसूर करणार्या कर्मचार्यांवरही त्यांनी वेळोवेळी कठोर कारवाई केल्याने त्यांची ओळख एक ‘शिस्तप्रिय अधिकारी’ म्हणून निर्माण झाली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार आणि वाढती गुन्हेगारी पाहता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल. गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासोबतच प्रलंबित गुन्ह्यांचा तपास लावणे आणि सायबर गुन्हेगारीला लगाम घालणे याकडे त्यांचा प्रामुख्याने कल राहण्याची शक्यता आहे.

मुम्मका यांच्या नियुक्तिमुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांमधून सकारात्मक प्रतिक्रिया उमटत असून, त्यांच्या ‘अॅक्शन मोड’ कार्यशैलीमुळे पोलीस प्रशासनाला नवीन दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आज (ता.2) सायंकाळपर्यंत ते सोमनाथ घार्गे यांच्याकडून पदाचा अधिकृत पदभार स्वीकारणार असून त्यानंतर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध काय पावले उचलली जातात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

मुळचे तेलंगणातील असलेले सुदर्शन मुम्मका 2023 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी पुणे पोलीस दलात उपायुक्तपदावर काम करताना पुण्याच्या जटील वाहतूक व्यवस्थेला रेषेत आणण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या दोन वर्षांपासूनच ते चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी गुन्हेगारांविरोधात धडक कारवायांसह पोलीस दलातील बेशिस्तीलाही लगाम लावण्याचे काम केले. त्यांचा तेथील कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची बदली क्रमप्राप्त होती, मात्र विद्यमान पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची मुदतपूर्व बदली झाल्याने सुदर्शन मुम्मका यांच्यासारख्या धडाकेबाज अधिकार्याच्या नियुक्तीपेक्षा घार्गे यांच्या बदलीचीच अधिक चर्चा रंगली आहे.

