वर्षश्राद्धानिमित्त केले वाचनालय सुरू

वर्षश्राद्धानिमित्त केले वाचनालय सुरू
पठारावरील पाटील कुटुंबाचा सामाजिक उपक्रम
नायक वृत्तसेवा, घारगाव
वडीलांच्या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाला फाटा देत मुलांनी हिवरगाव पठार (ता. संगमनेर) गावच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात वाचनालय सुरू करून पाटील कुटुंबाने नवा आदर्श समाजापुढे उभा केला आहे. त्यांच्या या सामाजिक दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पठारभागातील हिवरगाव पठार येथे वाचनालय नसल्याने विद्यार्थ्यांना साकूरला जावे लागत होते. याची दखल घेत ग्रामसेवक विजय आहेर यांनी गावातीलच सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पाटील यांंच्या वर्षश्राद्धानिमित्त आपण ग्रामपंचायत कार्यालयात वाचनालय सुरू करून वेगळा पायंडा पाडू शकतो असा विचार मुले किशोर पाटील व रवी पाटील यांच्याकडे मांडला. त्यावर त्यांनी सकारात्मक दुजोरा देत होकार दर्शविला. जर ग्रामपंचायत कार्यालयात वाचनालय सुरू झाले तर येथील विद्यार्थ्यांना साकूरला जावे लागणार नाही. त्यानंतर पाटील बंधूंनी लगेचच कामाला सुरुवात केली व त्यांनी ही गोष्ट त्यांच्या मित्रमंडळींनाही सांगितली. त्या माध्यमातून पुस्तके जमवायलाही सुरुवात केली अशी एकूण पाचशे विविध पुस्तके जमा केली. आणि वर्षश्राद्धाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालयात वाचनालय सुरू केले. या वाचनालयाचे उद्घाटन सुरेखा ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी संतोष डोळझाके, दत्तू वनवे, नितीन डोळझाके, अमोल जाधव, प्रकाश मिसाळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, जिथे जिथे प्रशासकीय अधिकारी सेवाकार्यानिमित्त जातील तिथे तिथे अशी ग्रंथालये उभारावीत; अन् अशा कामात विजय आहेर यांच्यासारखे ग्रामसेवक व किशोर पाटील यांच्यासारखे गावकरी जर सोबत असले तर त्या गावातील तरूण पिढी नक्कीच पुढे गेल्याशिवाय राहणार नाही, अशी चर्चा यावेळी नागरिकांत कुतूहलाने होत होती.

Visits: 97 Today: 1 Total: 1104961

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *