टपाल कर्मचार्यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी सामाजिक बांधिलकी जपली ः घाटगे संगमनेरातील यशस्वी फाउंडेशनच्यावतीने टपाल विभागातील कर्मचार्यांचा सन्मान
नायक वृत्तसेवा, संगमनेर
टपाल खातं म्हटलं की, पत्राची वाट पाहावी लागत असे. त्या वाट पाहण्यात एक वेगळाच आनंद होता. तोच आनंद संगमनेर टपाल कार्यालयातील कर्मचारी व डाकसेवकांनी सार्थ करून दाखवत रविवारी सुट्टीच्या दिवशी सुद्धा बहिणीने भावासाठी पाठविलेल्या राख्या भावापर्यंत पोहोचवून खर्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे गौरवोद्गार यशस्वी फाउंडेशनचे अध्यक्ष आदित्य घाटगे यांनी काढले.
संगमनेर टपाल कार्यालयातील कर्मचारी व डाकसेवकांचा सन्मान करताना ते बोलत होते. यावेळी यशस्वी फाउंडेशनचे सचिव अनिल भोसले, आशा घाटगे, सबपोस्ट मास्तर तान्हाजी शिंदे, अमोल गवांदे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना अध्यक्ष घाटगे म्हणाले, रविवारचा हक्काचा सुट्टीचा दिवस व रक्षाबंधनासारखा पवित्र दिवस असताना देखील आपल्या बहिणीकडून राखी बांधून घ्यावी या आनंदाला तिलांजली देऊन दुसर्यांच्या आनंदात आपला आनंद असतो ही भावना मनात ठेवून सुट्टीच्या दिवशीही आपली प्रामाणिक सेवा करून बहीण-भावाचं नातं अधिक घट्ट करून आपला आनंद व्यक्त केला. पोस्टमामांनी जी सेवा दिली त्याबद्दल यशस्वी फाउंडेशनच्यावतीने त्यांचा सन्मान करायचा असल्याची भावना कार्यालयातील अमोल गवांदे यांना बोलून दाखवताच कार्यालयातील उपस्थित कर्मचारी व डाकसेवक भावनावश झाल्याचे पहावयास मिळाले.
यशस्वी फाउंडेशनच्यावतीने बाळू सदगीर, रावसाहेब खरात, हरिभाऊ वर्पे, अमोल मरळ, कैलास गायकवाड, सुदर्शन मेश्राम, विशाल हळकुंडे, ज्ञानेश्वर करकटे, बबन वाडेकर, जयराम मोटे, प्रवीण सोनकांबळे यांचा मिठाई व वृक्षाचे रूप देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान आम्हांला नक्कीच जीवनात प्रेरणा व ऊर्जा देणारा असल्याची भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली. शेवटी अनिल भोसले यांनी यशस्वी फाउंडेशन व विविध समाज समन्वय समितीच्यावतीने आभार मानले.