अहिल्यानगर पोलीस दलाची मान उंचावली! जिल्ह्यातील सहा शिलेदारांना पोलीस महासंचालक पदक जाहीर..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कर्तव्यदक्षता, समर्पित वृत्ती आणि राष्ट्रभावनेतून गुणवत्तापूर्ण सेवा बजावणार्‍या अधिकारी व अंमलदारांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह (पदक) प्रदान करण्यात येते. यावर्षीही राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी सन 2025 या वर्षासाठीचे विशेष सेवा पदक जाहीर केले असून, यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील या सहा शिलेदारांनी आपल्या निष्कलंक आणि धाडसी सेवेच्या जोरावर हे मानाचे पदक पटकावत जिल्ह्याच्या पोलीस दलाची मान उंचावली आहे.


या अत्यंत प्रतिष्ठेच्या सन्मान यादीत जिल्ह्यातील ज्या सहा कर्मचार्‍यांची निवड झाली आहे, त्यामध्ये दक्षिणेत कार्यरत असलेले अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण साळुंखे, पोलीस कल्याण कक्षाचे निरीक्षक मुक्तारखान पठाण, तसेच नुकतीच पोलीस निरीक्षकपदी बढती मिळालेले सहाय्यक निरीक्षक प्रल्हाद गिते, हवालदार गोविंद गोल्हार आणि पोलीस नाईक राजू सुद्रीक यांचा समावेश आहे.


अपर अधीक्षक वैभव कलबुर्मे यांनी यापूर्वी श्रीरामपूर उपविभागातही आपली कर्तबगारी सिद्ध केली असून सध्या ते दक्षिण भागात कार्यरत आहेत. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी आपल्या कारकिर्दीत बजावलेल्या निष्कलंक सेवेची दखल महासंचालकांनी घेतली आहे. तसेच नियंत्रण कक्षातील पोलीस कल्याण विभागात कार्यरत असलेले मुक्तारखान पठाण आणि पदोन्नती मिळालेले प्रल्हाद गिते यांच्यासह अंमलदार गोविंद गोल्हार व राजू सुद्रीक यांच्या गुणवत्तेचा गौरव या पदकामुळे होणार आहे.


पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह महाराष्ट्र पोलीस दलातील अत्यंत आदराचे आणि उच्च श्रेणीचे पदक मानले जाते. हे पदक प्रदान करण्यासाठी शासनाने काही कठोर तांत्रिक निकष निश्चित केले आहेत. प्रामुख्याने गृह विभागाच्या विविध तरतुदींनुसार ज्या अधिकार्‍यांनी गुन्हे तपास, नक्षलविरोधी मोहीम, कायदा व सुव्यवस्था राखणे किंवा प्रशासकीय कामात सलग 15 वर्षे कोणतीही शिक्षा न घेता ‘उत्कृष्ट’ श्रेणीची सेवा दिली आहे, अशा व्यक्तींची निवड केली जाते. यावर्षी संपूर्ण राज्यातून विविध श्रेणींमधील सुमारे 800 पोलीस अधिकारी व अंमलदारांना या बहुमानाने गौरवण्यात येत आहे.


जिल्ह्यातून एकाच वेळी चार वरिष्ठ अधिकार्‍यांसह सहा जणांना हा बहुमान मिळाल्याने जिल्ह्याच्या कार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले आहे. या यशाबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अपर अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सर्व पदक विजेत्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. या पदकामुळे पोलीस दलातील इतर कर्मचार्‍यांनाही अधिक जोमाने आणि प्रामाणिकपणे काम करण्याची प्रेरणा मिळणार आहे.

Visits: 114 Today: 2 Total: 1859447

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *