आधीच नाही काम, त्यात संपाने काढताहेत घाम! रात्रीपासून अचानक वीज गायब; संपाचे महत्त्व वाढवण्यासाठी पुरवठा बंद?..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
भ्रष्टाचाराचे कुरण समजल्या जाणार्‍या राज्याच्या वीज कंपनीने पुकारलेल्या संपामुळे राज्यातील जनता हैरान झाली आहे. सध्या उष्णतेने उच्चांक गाठला असून दहावी व बारावीच्या परीक्षाही सुरु असल्याने वीज कर्मचार्‍यांच्या संपातून नागरीकांच्या संतापाचा पाराही चढला आहे. राज्यातील सर्वात भ्रष्ट असलेल्या विभागांमध्ये वीज कंपनी गणली जाते. या विभागात सामान्य माणसाचे कोणतेही काम लाच दिल्याशिवाय होत नाही. त्यातच अनेक अधिकारी व कर्मचारी कामचुकार आहेत, त्याचा फटका थेट कंपनीच्या ग्राहकसेवेवर होत असतांना आता विद्युत कर्मचार्‍यांनी दोन दिवसांचा संप पुकारल्याने ‘आधीच नाही काम, त्यात संपाने काढताहेत घाम’ असे म्हणण्याची वेळ सामान्य वीज ग्राहकावर आली आहे.

राज्यातील विद्युत कंपन्यांचे खासगीकरण होणार असल्याच्या शक्यतेवरुन त्या विरोधात वीज कंपनीच्या अधिकारी, अभियंते व कर्मचार्‍यांनी सोमवारपासून दोन दिवसांचा संप जाहीर केला होता. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी कालच राज्यातील विद्युत कर्मचारी, अधिकारी व अभियंत्यांच्या संघर्ष समितीशी चर्चा करुन संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. या बैठकीतच त्यांनी कोणत्याही परिस्थितीत राज्य विद्युत कंपन्यांचे खासगीकरण होवू देणार नाही असा भरवसाही त्यांना दिला. मात्र संघर्ष समिती अधिकृत करार झाल्याशिवाय माघार घेण्यास तयार नसल्याने राज्यावर ऊर्जा संकट ओढावले आहे. अधिकारी, अभियंते व कर्मचारी संघटनांच्या संयुक्त बैठकीतून मार्ग निघत नसल्याने डॉ.राऊत यांनी आज (ता.29) दुपारी मंत्रालयात होणारी बैठकही तडकाफडकी रद्द केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानाचा पारा वेगाने चढल्याने राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे. त्यातच सध्या इयत्ता दहावी व बारावीच्या शालांत परीक्षाही सुरु असल्याने राज्यात विजेला विक्रमी मागणी आहे. अशातच हा संप सुरु झाल्याने नागरीकांच्या संतापाचा पाराही चढत आहे. वीज कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपाच्या ज्वाळात आपण पोळून निघू नये यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत अधिक आक्रमक झाले असून त्यांनी या संपाच्या विरोधात जात राज्यात मेस्मा कायदा (महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षा कायदा) लागू केला आहे. त्यातून विद्युत कर्मचार्‍यांना संप करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र त्याचा फारसा परिणाम या संपावर झाल्याचे दिसत नसून संगमनेरसह जिल्ह्यातील बहुतेक सर्वच शहरात वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे.

संपाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास संगमनेर शहराच्या बहुतेक भागातील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. आज (ता.29) सकाळपर्यंत तो सुरळीत न झाल्याने निवासी संकुलात राहणार्‍या नागरिकांना पिण्याचे पाणीही मिळाले नाही. त्यामुळे विद्युत कंपनीच्या संपाची थेट झळ सामान्य नागरिकांना बसल्याने संगमनेरात संतापाचे वातावरण तयार झाले आहे. संगमनेरचा विद्युत विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण समजला जातो. या विभागातकडून कोणतेही काम करुन घेण्यासाठी सर्वसामान्य माणसाला लाचच द्यावी लागते, त्याशिवाय काम होवूच शकत नाही.

विशेष म्हणजे दर शनिवारी विद्युत कंपनीकडून ‘मेंटेनन्स’च्या नावाखाली दिवसभर विद्यत पुरवठा खंडीत असतो. मात्र त्यानंतर किरकोळ वादळ-वार्‍यानेही त्यात खंड पडत असल्याने कंपनीकडून केवळ परंपरा म्हणून शनिवार ‘ऑफ’ घेतला जातो, प्रत्यक्षात कर्मचारी कोणतेही काम करीत नसल्याचे आरोपही यापूर्वी वेळोवेळी झालेले आहेत. पुणे-नाशिक महामार्गाची नव्याने उभारणी झाल्यानंतर जून्या महामार्गावरील विद्युतवाहिन्या नव्या महामार्गावर नेण्याच्या कामात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला होता. या प्रकरणात नाशिक विभागातील काही अधिकार्‍यांवर ठपकाही ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे या भ्रष्टाचारात संगमनेरच्या विद्युत कंपनीत कार्यरत असलेल्या काही अधिकार्‍यांचाही ‘सिंहाचा’ वाटा असल्याचे त्यावेळी समोर आलेल्या चर्चेतून स्पष्ट झाले होते. यावरुन विद्युत कंपनी म्हणजे भ्रष्टाचाराचे मोठे कुरण असल्याचेही सिद्ध झाले होते.

ग्राहकांच्या मीटरचे रिडींग असो अथवा नव्या जोडणीचा अहवाल अशी कामेही खासगी ठेकेदारामार्फतच केली जातात. त्यातून ठेकेदार आणि कंपनीचे अधिकारी संगनमताने सर्वसामान्यांची पिळवणूक करुन मोठ्या रकमा उकळीत असल्याचे मागील अनेक घटनांमधून समोर आलेले आहे. ठेकेदारांना पोसण्यात आणि सामान्यांची पिळवणूक करण्यात सतत आघाडीवर असलेल्या या विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांबाबत सर्वसामान्य माणसांच्या मनात कोणतीही सहानुभूती नसल्याचेही वेळोवेळी समोर आले आहे. या संपाच्या माध्यमातून ही बाब अधिक स्पष्टपणे समोर आली आहे.

प्रचंड उष्णतेत व परीक्षांच्या कालावधीत विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास नागरी उद्रेक होईल व त्यातून राज्य सरकारवर दबाव टाकता येईल या हेतूने पुकारण्यात आलेल्या संपातून नागरीकांच्या मनात राज्य सरकारऐवजी विद्युत कंपन्यातील कामचुकार आणि भ्रष्टाचारी अधिकार्‍यांविरोधातच संताप खदखदू लागला असून अधिकारी व कर्मचारी आपल्या संपाचे महत्त्व वाढवण्यासाठी कोणताही तांत्रिक दोष नसतांना जाणीवपूर्वक शहराच्या वेगवेगळ्या भागाचा विद्युत पुरवठा खंडीत करीत आहेत. त्याचा परिणाम नागरी संतापाचा आगडोंब उसळण्यात होत असल्याचे दिसू लागले आहे. त्यातूनच ‘आधीच नाही काम, त्यात संप करुन काढताहेत घाम’ अशा संतप्त प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत.


संगमनेरची वीज वितरण कंपनी अतिशय कामचुकार असल्याचे नागरिक मानतात. राज्याच्या सत्ताकारणात संगमनेरचा मोठा दबदबा असूनही त्याचा कोणताही परिणाम या कंपनीतील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कार्यशैलीवर झालेला नाही. शहरातील एक अती व्हीआयपी भागातील फिडर वगळता उर्वरीत भागात दररोज पूर्ण 24 तास अखंडीत वीज देण्यातही येथील विद्युत कंपनी यशस्वी झालेली नाही, यावरुन या कंपनीत गेली वर्षोनुवर्ष वतनदारी करणार्‍यांची मुजोरीही अगदी ठळकपणे दिसून येते.

Visits: 20 Today: 1 Total: 115612

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *