वैद्यकीय व्यवसायातील ‘पांढरपेशा’ क्रूरतेचा राहात्यात पर्दाफाश! अपर अधिक्षकांची धडक कारवाई; आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर..


नायक वृत्तसेवा, राहाता
एकीकडे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा दिला जात असताना, दुसरीकडे समाजातील काही सुशिक्षित नराधम चंदनासारख्या कळ्या उमलण्यापूर्वीच खुडण्याचे पाप करत आहेत. श्रीरामपूर आणि राहाता परिसरात सुरु असलेल्या एका मोठ्या बेकायदा गर्भलिंग निदान रॅकेटचा पोलिसांनी थरारक पाठलाग करुन छडा लावला आहे. या कारवाईत एका बी.ए.एम.एस. डॉक्टरसह त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईतून आरोग्य विभागाची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर येण्यासह जिल्ह्यात अद्यापही अशाप्रकारचे दूष्कृत्य सुरुच असल्याचेही स्पष्ट झाले आहे.


याबाबत श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना एका गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ शिवारात, निळवंडे पाटाच्या कडेला एका पत्र्याच्या शेडमध्ये हा गोरखधंदा तेजीत सुरु होता. गर्भवती महिलांकडून प्रत्येकी दहा हजार रुपये घेऊन अतिशय छुप्या पद्धतीने त्यांचे गर्भलिंग निदान केले जात आहे. ही माहिती मिळताच अधीक्षक वाघचौरे यांनी तात्काळ लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक युवराज आठरे यांच्या पथकाला आवश्यक सूचना देत कारवाईचे आदेश दिले. हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याने पोलिसांनी तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुराव्यांची साखळी निर्माण केली. लोणी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.स्वाती पवार आणि तालुका समुचित प्राधिकारी डॉ.गोकूळ घोगरे यांना सोबत घेऊन पोलिसांनी संशयित ठिकाणी बनावट महिला ग्राहकाला पाठवले.


पोलिसांनी पाठवलेल्या ‘त्या’ महिला ग्राहकाने इशारा करताच आसपास सापळा लावून दबा धरलेल्या पोलिसांनी पिंपरी निर्मळ येथील ‘त्या’ दोन खोल्यांच्या घरावर आणि पत्र्याच्या शेडवर चारही बाजूंनी धावा केला. यावेळी आतमध्ये जे दृश्य दिसले ते पाहून पोलीसही चक्रावले. एका बंद खोलीत ‘पोर्टेबल सोनोग्राफी मशीन’च्या साहाय्याने बेकायदा गर्भ तपासणी सुरु होती. पोलिसांनी जागेवरच डॉ.राहुल आबासाहेब भनगे (वय 34, रा.भानसहिवरे, ता.नेवासा) आणि त्याचा सहकारी अभिजीत दिलीप भुसाळ (वय 30, रा.पिंपरी निर्मळ, ता.राहता) या दोघांना ताब्यात घेतले.


छाप्यानंतर सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणार्‍या या नराधमांना जेव्हा पोलिसांनी आपला खाक्या दाखवला तेव्हा त्यांनी आपले गुन्हे कबूल केले. प्रत्येक गर्भवती महिलेकडून 10 हजार रुपये घेवून ते पोटातील गर्भ ‘मुलगा’ आहे की ‘मुलगी’ हे तांत्रिक निदान करुन सांगत असतं. विशेष म्हणजे, यासाठी त्यांनी हस्तकही नेमले होते. अभिजीत भुसाळ हा स्वतः दलाल म्हणून काम करायचा आणि विविध जिल्ह्यांतील महिलांना या बेकायदा गर्भलिंग निदान केंद्रावर घेऊन यायचा.


या कारवाईदरम्यान पोलिसांनी तेथून आठ गर्भवती महिलांना ताब्यात घेतले. धक्कादायक बाब म्हणजे या महिला बीड, संगमनेर, नाशिक, नांदगाव आणि पुणे यांसारख्या लांबच्या ठिकाणांहून आल्या होत्या. यासर्व महिला 3 ते 4 महिन्यांच्या गर्भवती आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे पती आणि नातेवाईकही होते. त्यांना बाभळेश्वर येथे थांबवून ‘इर्टिगा’ आणि ‘वॅगनआर’ कारने या गुप्त अड्ड्यावर आणले जात असत. यावरुन हे रॅकेट किती खोलवर आणि विचारपूर्वक पसरवण्यात आले होते हे स्पष्ट होते.


पोलिसांनी या कारवाईत गुन्ह्यात वापरले जाणारे सर्व साहित्य जप्त केले आहे. लाईफ प्लस कंपनीचे यु.एस.जी., लॅपटॉप, प्रोबमशीन (सोनोग्राफी मशीन), चार मोबाईल फोन आणि रोख 59 हजार रुपये एक सिल्व्हर रंगाची स्विफ्ट कार (एम.एच.12/एच.व्ही.9436), एक पांढर्‍या रंगाची इर्टिगा कार (एम.एच.14/एच.डब्ल्यू.8642) व एक लाल रंगाची वॅगनआर कार (एम.एच.17/सी.आर.4160) असा एकूण 24 लाख नऊ हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.


या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात नऊ आरोपींवर भारतीय दंड विधान संहिता कलम 223 सह ‘महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर अ‍ॅक्ट 1961’ चे कलम 33, 33 (अ), 36 आणि ‘पीसीपीएनडीटी अ‍ॅक्ट 1994’च्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात डॉक्टर आणि एजंटसह एकूण जणांना अटक करण्यात आली असून, लोणी पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


डॉक्टर म्हणजे देवाचे रुप मानले जाते, पण राहुल भनगे सारखे उच्चशिक्षित कसाई केवळ पैशांच्या हव्यासापोटी स्त्री भ्रूणहत्येला खतपाणी घालत आहेत. समाजातील अशा विकृतींना ठेचण्यासाठी केवळ पोलीस कारवाई पुरेशी नाही, तर समाजानेही मुलगा-मुलगी हा भेद सोडणे आवश्यक आहे. पोलिसांनी केलेली ही कारवाई कौतुकास्पद असली, तरी या प्रकरणातील ‘मोठे मासे’ कोण आहेत आणि हे रॅकेट कुठेपर्यंत पसरले आहे, याचा छडा लावणे आवश्यक आहे.


अपर अधिक्षक व लोणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने केलेल्या या धडाकेबाज कारवाईत अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक युवराज आठरे, आशिष चौधरी, कोमल कुमावत, बेबी शिंदे, दादासाहेब लोढे, संदिप दरंदले, सचिन धनाड, अशोक गाडे, राजेंद्र बिरदवडे, असिर सय्यद, साईनाथ राशिनकर, सचिन शेवाळे, भोईटे आणि मनिषा गिरी यांचा समावेश होता.


या घटनेतून अहिल्यानगर जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था सध्या आयसीयूमध्ये असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एका बाजूला बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांच्या घोटाळ्याने जिल्ह्याची अब्रू चव्हाट्यावर आलेली असताना, आता थेट ‘गर्भलिंग निदाना’चे पाप राजरोसपणे सुरु असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, नेवाशातील ‘पांढरपेशा’ डॉक्टर शेजारच्या तालुक्यात येऊन खुलेआम कत्तलखाना चालवतो आणि जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला त्याची साधी भणकही लागत नाही, हे आश्चर्य नसून प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. पोलिसांच्या या कारवाईतून जिल्ह्यातील ‘पीसीपीएनडीटी’ पथके केवळ कागदावरच आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एखाद्या ठिकाणी आठ-आठ जिल्ह्यातील महिला येतात आणि तपासणी करुन जातात तरीही स्थानिक आरोग्य यंत्रणेला त्याचा थांगपत्ता लागू नये यातून संशय निर्माण झाला आहे. या कारवाईने जिल्हा आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली गेली असून, या प्रकरणातील मूळ सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

Visits: 4 Today: 4 Total: 1763397

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *