वीरभद्र मंदीर चोरी प्रकरणी चोरटा मुद्देमालासह पोलिसांच्या जाळ्यात
वीरभद्र मंदीर चोरी प्रकरणी चोरटा मुद्देमालासह पोलिसांच्या जाळ्यात
नायक वृत्तसेवा, राहाता
शहराचे ग्रामदैवत वीरभद्र मंदिराच्या मूर्तीचे मुकूट, पादुका व इतर दागिने असा जवळपास 3 लाख 85 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लांबविला होता. अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने चोरट्याला संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला येथील डोंगरावरुन मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंह, श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षिका दीपाली काळे, शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाला गुप्त खबर्याकडून मिळालेल्या माहितीवरुन नियोजनबद्ध पद्धतीने संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला येथील प्रेमगिरीच्या डोंगरावरुन सराईत गुन्हेगार भास्कर खेमजी पथवे (वय 42) यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. यावेळी त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरी केलेला सर्व मुद्देमाल एका शेतामध्ये लपवून ठेवण्यात आला असल्याचे सांगितले. तसेच त्याच्यावर कोरठण खंडोबा मंदीर चोरी प्रकरण आणि पारनेर, संगमनेर, नाशिक येथेही चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख सिंग यांनी दिली. सदर आरोपीला चोरी केलेल्या ठिकाणी आणण्यात आले होते, तर दुसर्या आरोपीचा कसून शोध सुरू आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे वीरभद्र मंदीर देवस्थान व ग्रामस्थांच्यावतीने जोरदार कौतुक होत आहे.