महायुतीच्या नगराध्यक्षपदाचा निर्णय वरीष्ठ पातळीवरुनच होणार! भाजपकडून ‘2-जीं’च्या नावाची चर्चा; जनमत पाहुनच उमेदवाराची निश्चिती..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील विरोधकांनी मतदारयाद्यांमधील ‘गोंधळा’वरुन रान उठवल्यानंतरही निवडणूक आयोगाने त्याकडे दुर्लक्ष करीत मंगळवारी राज्यातील 246 नगरपरिषदांसह 42 नगरपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यामुळे विरोध डावलून आता सत्ताधार्यांसह विरोधकही निवडणुकीच्या तयारीला लागले असून प्रभागनिहाय उमेदवारांच्या चाचपणीसह थेट जनतेला मान्य असलेल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची शोध मोहीम सुरु झाली आहे. महायुतीने समन्वय समितीसह उमेदवारांच्या निवडीसाठी सुकाणू समितीची स्थापना केली असून प्रत्येक ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी प्रभावी ठरणार्या तिघा संभाव्य उमेदवारांची नावे मागवण्यात आली आहेत. त्या नावांकडे स्थानिक मतदार कसे पाहतात याचा सर्व्हे झाल्यानंतरच त्यातील एका नावाची निवड केली जाणार आहे. त्या अनुषंगाने संगमनेरातही महायुतीने थेट जनतेतून निवडून येण्याची क्षमता असलेल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचा शोध सुरु केला असून त्यात ‘2-जी’ नावांनी आघाडी घेतली आहे. महायुतीने उमेदवार निवडीसाठी वापरलेली प्रक्रिया पाहता नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची निश्चिती मुंबईतूनच होण्याची दाट शक्यता आहे.

मतदारयाद्यांमधील प्रचंड गोंधळावरुन राज्यातील विरोधकांनी गेल्या शनिवारी (ता.1) ‘सत्याचा मोर्चा’ काढीत निवडणूक आयोगाविरोधात रान उठवले होते. त्यावेळी झालेल्या आंदोलनात जवळजवळ सर्वच विरोधी पक्षांनी मतदारयाद्या दुरुस्त करुनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घ्याव्यात अशी मागणी केली होती. त्यामुळे दृष्टीपथात दिसत असलेल्या निवडणूका पुन्हा लांबणीवर पडतात की काय? अशी शंका निर्माण झालेली असतानाच मंगळवारी (ता.4) राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करुन विरोधकांना मोठा धक्का दिला. आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार आठवडाभरात उमेदवारी दाखल करण्यास सुरुवात होणार असल्याने मतदारयाद्यांचा विषय बाजूला पडला असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून आता संभाव्य नगरसेवकांसह जनतेवर प्रभाव असलेल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा शोध घेण्यासाठी लगीनघाई सुरु झाली आहे.

संगमनेरातही आमदार अमोल खताळ यांच्या अध्यक्षतेखालील महायुतीच्या सुकाणू समितीने प्रभागनिहाय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु केल्या असून नगराध्यक्षपदासाठी यापूर्वीच तयारी करणार्या आणि त्यातून चर्चेत आलेल्या पाच ते सहा नावांमधून तीन नावे निश्चित करण्याची कवायत सुरु आहे. गेल्या महिनाभरापासून चर्चेत आलेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळावी यासाठी काहींकडून ‘लॉबिंग’ही करण्यात आले होते. मात्र महायुतीने अंतिम निर्णय जनमताचा कौल पाहुनच घेण्याचे ठरवल्याने तूर्त संगमनेरातील महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नाव समोर येण्याची शक्यता मावळली आहे. अर्थात भाजप प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार संगमनेरातून अद्याप सिलबंद लिफाफा पाठवण्यात आलेला नाही, त्यामुळे ऐनवेळी त्यात एखाद्या धक्कादायक नावाचाही समावेश होवू शकतो.

एकीकडे उमेदवार निश्चितीसाठी पक्षीय पातळीवर विविध प्रक्रिया सुरु असताना दुसरीकडे स्थानिक पातळीवरील इच्छुकांनी मात्र वाढदिवस, दहावे, अंत्यविधी, वास्तूशांती व इतर कार्यक्रमांचा शोध घेवून तेथे जमणारी गर्दी गाठण्यास सुरुवात करुन आपले नाव अधिकाधिक चर्चेत ठेवण्यासाठी पराकाष्ठाही सुरु केल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यावेळी थेट जनतेतून निवड होणार्या नगराध्यक्षपदासाठी महायुतीकडून पत्रकार स्मिता गुणे, रेखा गलांडे, उषा नावंदर, सुषमा तवरेज व भाजपच्या शहराध्यक्षा पायल ताजणे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. काही उत्साही कार्यकर्त्यांनी ऑनलाईन सर्व्हेचा वापर करुन या नावांमधील प्रभावी उमेदवाराचा शोध घेण्याचाही खटाटोप केल्याचे बघायला मिळाले असून त्यात संभाव्य उमेदवारांमधील ‘2-जीं’ची नावे सर्वाधीक चर्चेत असल्याचे दिसत आहे.

निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार गुरुवारी (ता.6) जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जारी करणार असून 10 ते 17 नोव्हेंबर या कालावधीतील सुट्टीचे दिवस वगळून उमेदवारीअर्ज दाखल करता येणार आहेत. 18 नोव्हेंबररोजी छाननी प्रक्रिया राबवण्यात येणार असून त्याच दिवशी वैध ठरलेल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाईल. छाननी दरम्यान कोणतीही तक्रार नसलेल्या उमेदवारांना 19 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत आपला अर्ज माघारी घेता येईल. छाननीत आक्षेप असलेल्या व त्या विरोधात अपील करणार्या तक्रारदार उमेदवारांची सुनावणी घेतली जाईल. 26 नोव्हेंबररोजी अंतिम उमेदवारयादी जाहीर करण्यासह उमेदवारांना चिन्हांचे वाटपही होईल. पुढील महिन्यात 2 डिसेंबररोजी मतदान आणि 3 डिसेंबररोजी निवडणूक निकाल घोषीत केले जातील.

राज्यातील बहुतेक सर्वच विरोधी पक्षांनी सदोष मतदारयाद्यांचा विषय समोर करुन गेल्या शनिवारी (ता.1) मुंबईत ‘सत्याचा मोर्चा‘ काढून याद्यांमधील घोळ दुरुस्त केल्यानंतरच निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यामुळे राज्यातील निवडणूका पुन्हा लांबणीवर पडतात की काय अशी स्थिती निर्माण झाली असताना राज्य निवडणूक आयोगाने विरोधकांची मागणी फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाच्या 31 जानेवारी, 2026 पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पूर्ण करण्याच्या आदेशाला महत्त्व देताना विरोधकांच्या मोर्चानंतर अवघ्या दोनच दिवसांत पत्रकार परिषद घेत राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यावरुन आगामी कालावधीत राजकारण तापण्याचीही शक्यता आहे.

