‘साहेब ओ साहेब ऽऽ… सांगा आता कसं जगायचं?’

‘साहेब ओ साहेब ऽऽ… सांगा आता कसं जगायचं?’
संगमनेर तालुक्याच्या पठारावरील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी मांडल्या व्यथा
नायक वृत्तसेवा, घारगाव
‘साहेब ओ साहेब ऽऽ… सेंद्री कांद्याच पीक जास्त पाऊस झाल्यामुळे वाया गेलं, वरून सत्तर हजार रुपये खर्चही अंगावर आला. त्यामुळे कोरोनाच्या महामारीत तुम्हीच सांगा आम्ही शेतकर्‍यांनी कसं जगायचं?’ अशा व्यथा संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील हिवरगाव पठार येथील ताराबाई उगले व बाळासाहेब वनवे यांसह शेतकर्‍यांनी मांडल्या आहेत.


हिवरगाव पठारासह परिसरातील अनेक शेतकरी दरवर्षी पावसाळ्यात सेंद्री (लाल) कांद्याचे पीक घेतात. त्यामुळे याही वर्षी ताराबाई उगले यांनी दीड ते दोन महिन्यांपूर्वी आपल्या सव्वाएकर शेतीमध्ये कांदा केला. खते, औषधे, फवारणी, मजुरी असा एकूण सत्तर हजार रूपये खर्च झाला. सुरूवातीला कांद्याचे पीक अतिशय चांगले होते. त्यामुळे यावर्षी आपल्या कांद्याचे चांगले पैसे होतील अशी अपेक्षा महिला शेतकरी उगले यांना होती. परंतु मध्यंतरी झालेल्या दमदार व ढगफुटीसदृश्य पावसाने संपूर्ण कांदा पीक पाण्याखाली गेले. त्यातच या कांद्याला जास्त पाणीही सहन होत नसल्याने कांद्याच्या मुळ्या सडून कांद्याच्या पाथीला पीळ पडला. त्यानंतर पुन्हा कांद्याचे पीक तग धरु शकले नाही. परिणामी आज कांद्याचे संपूर्ण पीक वाया गेले आहे.


साधा खर्चही फिटला नसून उलट सत्तर हजार रूपये अंगाशी आले आहेत. त्यामुळे उगले यांनी डोक्यालाच हात लावला आहे. माझ्यासारखीच परिस्थिती इतर कांदा उत्पादक शेतकर्‍यांचीही झाली आहे. यावर्षी पावसाने काहीच ठेवले नाही अशी दयनीय अवस्था खरीप हंगामाची झाली असताना देखील शासनाने पंचनामे सुद्धा केले नाहीत. आधीच एकामागून संकटांची रांग असताना शेतकरी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीने अक्षरशः बेजार झाला आहे. यामुळे भयावह कोरोना महामारीच्या संकटात ‘जगावं की मरावं’ अशी अवस्था आमच्यासारख्या कांदा उत्पादक शेतकर्‍यांची झाली असल्याची उद्विग्न व्यथा महिला शेतकरी ताराबाई उगले यांनी मांडली आहे.


हिवरगा पठार परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे सेंद्री कांद्याच्या पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. जवळपास एक एकर कांद्यासाठी शेतकर्‍यांचा साठ ते सत्तर हजार रुपये खर्च झाला आहे. त्यात पुन्हा शेतकर्‍यांनी तीन ते चार हजार रुपये किलोने कांद्याचे बी खरेदी करून रोपे टाकली होती. मात्र ती देखील पावसाने वाया गेली आहेत. आज शेतकर्‍यांची खूप वाईट परिस्थिती झाली आहे. वास्तविक पाहता शासनने पंचनामे करणे गरजेचे होते, परंतु अद्यापही केलेले नाहीत.
– बाळासाहेब वनवे (शेतकरी, हिवरगाव पठार)

Visits: 12 Today: 1 Total: 82827

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *