… हे केवळ दोघांचेच मंत्रिमंडळ; थोरातांचा शिंदे-फडणवीसांना टोला शिवसेनेने आमच्याशी चर्चा करून भाजपबाबत निर्णय घेण्याचाही केला पुनरुच्चार

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिंदे-फडणवीस सरकारमधील आपसातले वाद मिटत नसल्याने अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. हे केवळ दोघांचेच मंत्रिमंडळ असून त्यांनी किमान निर्णय तरी घ्यायला हवे, असा टोला काँग्रेस नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.

शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊनही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. राज्यात मुसळधार पाऊस, पूर परिस्थिती तसेच अनेक प्रश्न प्रलंबित असताना मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जातोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच सध्या अधिकार्‍यांसोबत बैठका घेऊन विविध निर्णय घेत आहेत. त्यावरूनच बाळासाहेब थोरात यांनी शिंदे-फडणवीसांना टोला लागवत हे दोघांचेच मंत्रिमंडळ असल्याचे म्हटले आहे.


संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राज्य सरकारने पेट्रोल-डिझलचे दर कमी केले. मात्र विजेचे दर 20 टक्क्यांनी वाढवले, हे सांगितले नाही. म्हणजे एकीकडे जनतेची मदत करत असल्याचे दाखवायचे आणि दुसरीकडे परत खिशात हात घालायचा असा हा प्रकार आहे, अशी टीका थोरात यांनी केली. राज्य सरकारमधील आपसातले वाद मिटत नसल्याने अजूनही मंत्रिमंडळ नाही. आता दोघांच्या मंत्रिमंडळाने किमान निर्णय तरी घ्यायला हवेत. महाराष्ट्रात पुरात नव्वदच्यावर बळी गेले. मात्र दुर्दैवाने नव्या सरकारमध्ये जागरूकता दिसत नाही. जनता आशेने बघत असताना मात्र सरकार काहीही करत नाही. शेतकर्‍यांसाठी घेतलेला निर्णय हा तर आघाडी सरकारचाच आहे. त्यात नवीन काहीच नसल्याचे थोरात म्हणाले. घटनाबाह्य पद्धतीने झालेल्या सरकारची सर्वात जास्त झळ शिवसेनेला बसली आहे. तरीही शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रपतीपदाची लढाई राज्यघटना आणि लोकशाही वाचविण्यासाठी आहे. भाजपमुळे लोकशाही धोक्यात आहे, हे ओळखून शिवसेनेने निर्णय घ्यायला हवा होता. कारण आमची लढाई एकत्रपणे सुरू होती. किमान समान कार्यक्रम घेऊन महाविकास आघाडीचे सरकार काम करत होते. अन्यायी पद्धतीने सत्ताबदल झाला तरी आम्ही शिवसेनेला साथ देण्याचं ठरवले. असे असताना शिवसेनेने आमच्याशी चर्चा करून भाजपच्या विरोधात निर्णय घेणं अपेक्षित होते, असा पुनरुच्चार माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.

Visits: 93 Today: 1 Total: 1103899

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *