भोंदूगिरीचा ‘विषाणू’ की औषधांचा ‘कारखाना’? ‘दत्तधाम’चा मास्टरमाईंड डॉ.मोहन पुरीच; सिन्नरच्या ‘शिवधाम’मधून राज्यभर जाळे..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या संगमनेर तालुक्यातील वडगावपानच्या मातीत ‘कर्करोग निवारण’ आणि ‘पुत्रप्राप्ती’चा खोटा खेळ मांडणार्‍या भोंदू राजेंद्र गडगेच्या ‘दत्तधाम’ साम्राज्याचा बुरखा आता पूर्णपणे फाटला आहे. गेल्या तीन दशकांपासून यंत्रणांच्या डोळ्यात धूळ फेकून हजारो हतबल रुग्णांचे आर्थिक शोषण करणार्‍या या केंद्राचा पडद्यामागचा खरा सूत्रधार, अर्थात ‘मास्टरमाईंड’ तथाकथित आयुर्वेदाचार्य डॉ.मोहन पुरीच असल्याचे आता पोलीस तपासात समोर येत आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊन आठवडा उलटला तरीही पोलीस या मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळू शकलेले नाहीत. पोलिसांचा तपास सध्या केवळ एका भोंदूच्या चौकशीभोवतीच घुटमळताना दिसत असून, औषध निर्मितीचा कारखाना चालवणारा ‘आधुनिक धन्वंतरी’ अद्यापही फरार असल्याने या भोंदूगिरीच्या साखळीतील इतर ‘दुवे’ अद्याप मोकाटच आहेत.


वडगावमधील श्री गुरुदेव दत्तांच्या नावाने सुरु असलेल्या या आश्रमात तथाकथित डॉक्टर मोहन पुरीचा ‘औषधी’ खेळही पोलीस कारवाईतून उघड झाला आहे. या धाडीत आश्रमातून तब्बल 99 विविध कंपन्यांच्या औषधांचा साठा जप्त करण्यात आला होता. विशेष म्हणजे, आश्रमात सेवेकरी म्हणून वावरणारा डॉ.मोहन पुरी हाच या सर्व औषधांचा पुरवठादार आणि बनावट उपचारांचा गाभा असल्याचे समोर आले आहे. पुरी याचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात जायगांव येथे ‘शिवधाम’ नावाचा औषध निर्मितीचा कारखाना आहे. तपासातील धक्कादायक माहितीनुसार, या कारखान्यातून केवळ वडगावपानच नव्हे, तर राज्यातील अनेक भोंदू बाबांच्या आश्रमांना अशाच प्रकारच्या संशयास्पद औषधांचा पुरवठा केला जात होता.


कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराने ग्रासलेले रुग्ण जेव्हा मृत्यूच्या उंबरठ्यावर असतात, तेव्हा त्यांच्या हतबलतेचा फायदा घेण्याचे प्रशिक्षणच जणू या पुरीने गडगेला दिले होते. राजेंद्र गडगे हा केवळ एक चेहरा होता, मात्र त्या चेहर्‍यामागचा खरा मेंदू हा मोहन पुरीच असल्याचा संशय आहे. त्याला अटक झाल्याशिवाय या प्रकरणातील औषध पुरवठ्याचे गूढ आणि राज्यातील इतर भोंदू आश्रमांची माहिती समोर येणे कठीण आहे.


अंनिसच्या बुवाबाजी विरोधी समितीच्या राज्यसचिव रंजना गवांदे यांनी याप्रकरणी दिलेल्या मूळ तक्रारीत अत्यंत गंभीर उल्लेख केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वी तडजोड करण्यासाठी मोहन पुरी आपल्या काही साथीदारांसह मध्यरात्रीच्या सुमारास थेट तक्रारदाराच्या घरी गेला होता. सरकारी यंत्रणा आणि कायद्याचा धाक नसलेल्या या भोंदू टोळीने थेट तक्रारदाराच्या घरात घुसून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला, ही बाब अत्यंत गंभीर आहे. रंजना गवांदे यांनी धैर्याने या दबावाला बळी न पडता गुन्हा दाखल केला, मात्र तरीही पोलिसांना पुरीचा ठावठिकाणा लावता आलेला नाही.


या प्रकरणात केवळ भोंदूगिरीच नाही, तर ‘खंडणी’चा मसालाही मिसळलेला आहे. स्वतःला कार्यकर्ता म्हणवून घेणारा सूरज शिंदे याने तक्रारदार रंजना गवांदे आणि वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या नावाचा वापर करून गडगे कुटुंबाकडून खंडणी मागितल्याचा आरोप आहे. तो देखील सध्या फरार असून पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी झाला आहे. गुरुवारी (ता.23) राजेंद्र गडगेच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे, पण जोपर्यंत मुख्य सूत्रधार पुरी, शिंदे आणि गडगेची मुलगी ज्ञानेश्वरी गजाआड होत नाहीत, तोपर्यंत हा तपास अर्ध्यावरच राहण्याची शक्यता आहे.


राजेंद्र गडगे याची मुलगी ज्ञानेश्वरी हिने आपल्या नावापुढे ‘डॉक्टर’ ही उपाधी लावून रुग्णांची फसवणूक केल्याचेही समोर आले होते. त्याच्या तपासातही धक्कादायक वास्तव समोर आले असून ज्ञानेश्वरीकडे केवळ ‘निसर्गोपचार’ या कोर्सचे प्रमाणपत्र आहे. वैद्यकीय सराव करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नसताना तिने रुग्णांच्या जीवाशी खेळ केला. संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयाने या संदर्भात पंचनामा देखील केला आहे. मात्र, पंचनामा होऊन अनेक दिवस उलटले तरी ग्रामीण रुग्णालयाने अद्याप ज्ञानेश्वरी विरोधात स्वतंत्र फिर्याद दिली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आरोग्य विभागाच्या या ‘थंड’ भूमिकेमुळे भोंदू डॉक्टरांना पाठीशी घातले जात आहे का? असा संतप्त सवालही विचारला जात आहे.


वडगावपानचा हा भोंदूगिरीचा अड्डा केवळ एक केंद्र नसून ते एका संघटित गुन्हेगारीचे जाळे आहे. ज्यामध्ये औषध उत्पादक, बनावट डॉक्टर आणि खंडणीखोर यांचा समावेश आहे. तालुका पोलीस सध्या जंगजंग पछाडून पुरीचा शोध घेत आहेत, मात्र हायटेक यंत्रणांच्या युगातही हे आरोपी पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरत आहेत. ज्याप्रमाणे ‘दत्तधाम’मध्ये कॅन्सर बरे करण्याचा दावा करुन रुग्णांच्या आयुष्याची राखरांगोळी केली गेली, त्याचप्रमाणे या प्रकरणातील मास्टरमाईंड मोकाट राहिल्यास पुन्हा एकदा नव्या नावाने हा ‘विषाणू’ राज्यातील दुसर्‍या एखाद्या कोपर्‍यात डोकं वर काढेल. त्यामुळे आता पोलीस या टोळीचा समूळ नायनाट कधी करणार आणि सिन्नरच्या ‘शिवधाम’मधील पापे बाहेर कधी येणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.


वडगावपान प्रकरणात तालुका पोलिसांकडून कसून तपास सुरु असून पसार असलेल्या आरोपींना गजाआड करण्याचे पहिले लक्ष्य ठेवण्यात आले आहे. दत्तधाम नावाच्या ठिकाणावरुन पोलिसांना अनेक संशयास्पद गोष्टी मिळाल्या असून त्याचीही पडताळणी सुरु आहे. आरोपी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करीत असल्याने त्याचा सखोल शोध सुरु असून त्याने तयार केलेल्या व्हिडिओंचे वैज्ञानिक विश्‍लेषण करुन त्यातून बुवाबाजी, जादूटोणा यासारखे प्रकार घडलेत का याचाही शोध घेतला जात आहे. पसार असलेल्या मोहन पुरीच्या तपासासाठी स्वतंत्र पथके कार्यरत असून लवकरच त्यासर्वांना अटक होईल. दत्तधाम सरकार नावाच्या भोंदूगिरीच्या या ठिकाणावर बोलावून आरोपी राजेंद्र गडगे अथवा त्याच्या साथीदारांकडून कोणत्याही प्रकारचे शोषण झाले असेल अशा नागरिकांनी समोर येवून सहकार्य करावे, तालुक्याच्या बाहेर राहणार्‍यांनी त्यांच्या हद्दितील पोलीस ठाण्यात तक्रार केली तरीही चालू शकेल. लोकांच्या भावनांशी खेळून त्यांचे आर्थिक शोषण करणार्‍या प्रवृत्तींना उघड करण्यासाठी नागरी सहकार्य आवश्यक आहे.
– सोमनाथ वाघचौरे
अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर

Visits: 72 Today: 72 Total: 1750399

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *