‘आधार’च्या मदतीने नागेशला मिळाली कंपनीत नोकरी! फाटक्या संसाराला हातभार लागणार असल्याने आईला आनंद..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील अनेक निराधार, गरजू मुलांना ‘आधार’ ठरलेल्या आधार फौंडेशनच्या आधार शैक्षणिक दत्तक पालक योजनेंतर्गत शिक्षण घेत असलेला नागेश कदारे यास नुकतीच पुणे येथील अल्ट्रा कॉर्पोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत नोकरी लागली आहे. यामुळे आधारसह त्याच्या कुटंबियांना मोठा आनंद झाला आहे.
नागेशचे वडील कायमच दारु पिऊन झिंगलेले असायचे. आईलाही कायम शिव्यांची लाखोली वाहत मारहाण करायचे. वडिलांनी दुसरा घरोबा केल्याने आईवडील दहा वर्षांपासून अलिप्त आहेत. भाड्याने खोली घेऊन आईने धुणीभांडीचे काम करुन दोघा भावडांना शिकवलं. पण बहिणीचा व नागेशच्या शिक्षणाचा खर्च आईला पेलवत नव्हता. जेथे शेर-पावशेर धान्य घ्यायला आई जायची त्या कॉर्नर किराणाचे राजू अभंग यांच्या माध्यमातून तिसरीला असताना आधारविषयी माहिती मिळाली. त्यानंतर आधारचे समन्वयक सोमनाथ मदने यांच्याशी भेट झाली. तेव्हापासून ‘आधार’ मिळाला आणि नागेशच्या शिक्षणाची वाट सुकर झाली.
या कालावधीत आधारचे समन्वयक सुखदेव इल्हे यांनी वेळोवेळी वैयक्तिक मार्गदर्शन केले. त्यातून भविष्यात काय करायचे याची इत्यंभूत माहिती मिळाली. त्यानुसार नागेशने आयटीआय करण्याचा निर्णय घेतला. आधारने लोकपंचायत संस्थेच्या आयटीआय शिक्षणाचा संपूर्ण खर्च केला. आधार शैक्षणिक दत्तक पालक योजनेतून नागेशला शिकवले. नागेशनेही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अपार कष्ट करत आयटीआयमध्ये उत्तम गुण मिळवले. त्यामुळेच त्याची पुणे येथील अल्ट्रा कॉर्पोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत 25 हजार रुपयांच्या पगारावर निवड झाली आहे. याचा आधारसह त्याच्या कुटुंबियांना मोठा आनंद झाला आहे. याबद्दल आधारने त्याचा व आईचा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे ‘मिशन इंडिया’ पुस्तक देऊन सन्मान केला. नागेशने पुन्हा दुसर्या अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. त्याला पदवीचे शिक्षणही पूर्ण करायचे आहे. याचबरोबर स्वतःच्या पायावर उभा राहिल्याने पुढचे शिक्षण स्वखर्चाने करुन थोडी परिस्थिती स्थिरावल्यावर एका गरजू मुलाचा खर्चही तो उचलणार असल्याचे सांगितले.
गेल्या वर्षी नागेश कदारे ‘वर्ल्ड स्कील कॉम्पिटिशन’ स्पर्धेत राज्यात तिसरा आला होता. त्याला राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते पाच हजाराचे बक्षीस मिळाले होते. यावर्षी पुन्हा याच स्पर्धेची तयारी करत आहे. यासाठी त्याला लॅपटॉपची गरज असून, समाजातील दानशूरांनी मदतीचा हात द्यावा.
माझ्या फाटक्या संसाराला हातभार लागावा म्हणून मुलाला फिटर करायचे होते. अशातच ‘आधार’च्या मदतीमुळे नागेश चांगला शिकला. आता मोठ्या कंपनीत नोकरीला लागला असून, याचा खूप आनंद होत आहे.
– मीनाक्षी कदारे (नागेशची आई)