विकासाचा ‘फॉरवर्ड ब्लॉक’ अन् अंमलबजावणीचा ‘रिव्हर्स गिअर’! ‘संगमनेर 2.0’ की केवळ स्वप्नविक्री?; शहरी व्यवस्थेला पुन्हा बेशिस्तीचा विळखा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्याच्या राजकारण आणि सहकार क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणार्या संगमनेर शहराला सध्या जणू व्यवस्थेचे ग्रहण लागले आहे. प्रगत बाजारपेठ, नामांकित शिक्षणसंस्था आणि उद्योगांचे केंद्र असलेल्या या शहराच्या नशिबी सत्तेचे ‘अमरपट्टे’ तर आले, पण ‘विकासाचा वेग’ मात्र हरवला आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या ऐतिहासिक सत्तांतराचे पडसाद स्थानिक पालिकेत उमटू नयेत, यासाठी ‘संगमनेर 2.0’चे स्वप्न दाखवून सत्तेची खुर्ची राखणार्या ‘संगमनेर सेवा समिती’च्या कारभाराचे अवघ्या चार महिन्यांतच धिंडवडे निघाले आहेत. ‘ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक’च्या चिन्हावर निवडणूक लढवून मतदारांना विकासाचा जो ‘मॅजिक शो’ दाखवण्यात आला, तो आता फसला असल्याची भावना सर्वसामान्य संगमनेरकरांमध्ये निर्माण झाली आहे.

गेल्या साडेतीन दशकांपासून संगमनेर नगर पालिकेत एकाच गटाची एकहाती सत्ता आहे. 1991 पासून काँग्रेसच्या माध्यमातून आणि आता ‘फॉरवर्ड ब्लॉक’च्या मुखवट्याआड शहराची सूत्रे एकाच कुटुंबाभोवती फिरत आहेत. वास्तविक, इतक्या प्रदीर्घ काळात शहराचा कायापालट करणे सहज शक्य होते, परंतु राजकीय डावपेचांपुढे नागरी सुविधा नेहमीच दुय्यम ठरल्या आहेत. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पराभवानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरुन काढण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी ‘व्हिजन’चा कागदी वाघ उभा केला होता, तो आता जमिनीवर येताच कोसळला आहे. खड्डेमुक्त रस्ते, शिस्तबद्ध वाहतूक आणि स्वच्छ शहराचे आमिष दाखवून मतदारांची मते तर घेतली, मात्र निवडणुकांचा काळ लोटून चार महिने होवूनही या गोष्टी आजही जैसे थे आहेत.

निवडणुकीपूर्वी ‘संगमनेर 2.0’ नावाने जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता, मात्र त्यातील मुद्दे आता निव्वळ शब्दांचे फुलोरे ठरले आहेत. शहरातील रस्त्यांची अवस्था आज अशी आहे की, खड्ड्यांमुळे वाहनधारकांना पाठीच्या आजारांची धास्ती वाटू लागली आहे. प्रचंड धूळ आणि बेशिस्त वाहतुकीने शहराचा श्वास कोंडला आहे. अतिक्रमणांचा विळखा तर इतका घट्ट आहे की, पादचार्यांनी चालावे कुठे? हा प्रश्न कायम आहे. केवळ ‘फोटोसेशन’पुरती मर्यादित राहिलेली महिला सुरक्षा आता केवळ पालिकेच्या दारात विसावलेली दिसते. 35 लाखांची उधळण करुन बसवलेली सिग्नल व्यवस्था केवळ शोभेच्या ‘बाहुल्या’ बनून राहिली आहे. रस्ते मोकळे करण्याचा जो ‘फार्स’ मार्च महिन्यात राबवण्यात आला, तो सणासुदीचे कारण सांगून गुंडाळला गेल्याने सत्ताधार्यांच्या ‘इच्छाशक्ती’ला ‘मतशक्ती’ आडवी आली की काय अशाही शंका आता उपस्थित होत आहे.

ज्या पक्षाचे संगमनेरात अस्तित्वही नव्हते, त्या ‘ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक’चे नाव आणि चिन्ह वापरुन मतदारांची दिशाभूल करण्यात आली. हा केवळ राजकीय सोयीचा खेळ होता, हे आता उघड होत आहे. 40 वर्षांच्या सत्ताकाळातील अपयश झाकण्यासाठी ‘व्हिजन’चा नवा पडदा टाकण्यात आला, पण त्या पडद्यामागचे सत्य आता उघड्यावर येवू लागले आहे. युवराजांनी दिलेल्या जागेतील बेकायदेशीर रिक्षा थांबे असोत वा भंगारातील रिक्षांतून होणारी जीवघेणी वाहतूक, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. संगमनेरच्या विकासाची गाडी सध्या केवळ आश्वासनांच्या इंधनावर चालवण्याचा प्रयत्न होत आहे, परंतु प्रत्यक्षात ती चिखलात रुतल्याचे वास्तव चित्र सध्या संगमनेरकराला बघावे लागत आहे.

संगमनेरच्या जनतेने विकास, शिस्त आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर आमदार सत्यजीत तांबे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत यापूर्वी कधी नावही ऐकिवात नसलेल्या ‘ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षाला भरभरुन मतदान करीत विकासासाठी सत्ताधार्यांना पुन्हा संधी दिली. मात्र सत्तेची खुर्ची उबवल्यानंतर जनतेचा विसर पडणे हेच या व्यवस्थेचे वैशिष्ट्य ठरले आहे. दैनिक नायकने समाजाशी असलेली आपली बांधिलकी जोपासताना वेळोवेळी या भ्रमाच्या भोपळ्याला टाचणी लावण्याचे काम केले आहे, आता सामान्य संगमनेरकरानेच हे सर्व ‘संगमनेर 2.0’ आहे की ‘स्वप्न विक्रीचा’ जुना खेळ याचा विचार करण्याची गरज आहे.

