संगमनेर मर्चन्ट्स बँकेच्या अध्यक्षपदी संजय राठी! रविंद्र पवार यांची उपाध्यक्षपदी निवड; बँकेने ओलांडला एक हजार कोटींचा टप्पा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर मर्चंट्स बँकेची आजवरची प्रगती कोणा एका व्यक्तीचे यश नसून, ते सर्व संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी आणि खातेदारांच्या सांघिक प्रयत्नांचे फळ आहे. या टीमवर्कमुळेच बँकेने एक हजार कोटींच्या मिश्र व्यवसायाचा ऐतिहासिक टप्पा यशस्वीपणे पार केला आहे, असे प्रतिपादन बँकेचे मावळते चेअरमन राजेशजी मालपाणी यांनी केले. बँकेच्या नूतन पदाधिकारी निवडीनंतर आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आगामी आर्थिक वर्षासाठी बँकेच्या अध्यक्षपदी सीए संजय राठी आणि उपाध्यक्षपदी रवींद्र पवार यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.

आपल्या मनोगतात मावळते चेअरमन राजेश मालपाणी यांनी बँकेच्या 35 वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेतला. 1990 मध्ये तत्कालीन चेअरमन स्वर्गीय ओंकारनाथजी मालपाणी (भाऊ) यांच्या काळात बँकेने शंभर कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार केला होता. आता 2026 मध्ये एक हजार कोटींच्या मिश्र व्यवसायाचा नवा विक्रम प्रस्थापित झाल्याचे सांगताना ‘करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है, या ओळींचा आधार घेत त्यांनी याचे संपूर्ण श्रेय सहकारी संचालकांना दिले.

बँकेचे मावळते व्हाईस चेअरमन मधुसूदन नावंदर यांनी राजेश मालपाणी यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. ते म्हणाले की, राजेशजींचे नेतृत्व म्हणजे एका पूर्ण निबंधासारखे आहे. त्यांचे जमिनीवर राहून काम करणे आणि साधेपणा हा सर्वांसाठी प्रेरणादायी गुण आहे. तसेच, नवनियुक्त अध्यक्ष संजय राठी यांचा 2002 पासून बँकेच्या निर्णय प्रक्रियेत मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.

गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांनी नूतन नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, संजय राठी हे एक अनुभवी चार्टर्ड अकौंटंट असून त्यांची आर्थिक विषयांवरील पकड दांडगी आहे. देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि आता बँकेत रवींद्र व संजय यांचे नेतृत्व असल्याने बँकेचा विकास आता झपाट्याने होईल, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. बँकेने छोट्या व्यावसायिकांना कर्ज उपलब्ध करून देऊन संगमनेरला मोठी बाजारपेठ बनवण्यात मोलाचे योगदान दिल्याचेही त्यांनी सांगितले.

माजी चेअरमन संतोष करवा यांनी संजय राठी यांच्या तांत्रिक आणि व्यवस्थापकीय क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. गेल्या 25 वर्षांपासून राठी यांनी बँकेच्या उत्कर्षासाठी घेतलेले कष्ट तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी उपस्थित असलेल्या अनेक मान्यवरांसह बँकेचे सभासद व राठी, पवार यांच्या स्नेहीजनांनी आपल्या मनागतातून नवनियुक्त पदाधिकार्यांचे अभिनंदन केले.

नवनियुक्त अध्यक्ष संजय राठी आणि उपाध्यक्ष रवींद्र पवार यांनी बँकेच्या हितासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी सदैव कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. यावेळी बँकेचे आजी-माजी अध्यक्ष व उपाध्यक्ष, संचालक मंडळ, सभासद आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी झालेल्या हलक्या-फुलक्या विनोदी टिपणांनी सभागृहात हास्य उमटले आणि एका उत्साही वातावरणात नूतन पदाधिकार्यांनी आपला पदभार स्वीकारला.

