संगमनेरातील ‘दत्तधाम सरकार’च्या भोंदूगिरीचा बाजार उठला! तालुका पोलिसांची धाडसी कारवाई; ‘अंनिस’च्या तक्रारीवरुन पाचजणांवर जादूटोणा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेचा बाजार मांडून गेल्या दशकापासून सामान्य जनतेच्या अगतिकतेचा फायदा घेणार्‍या ‘दत्तधाम सरकार’ या चमत्कारी केंद्राचे पितळ अखेर उघडे पडले आहे. अपर अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशाने संगमनेर तालुका पोलिसांनी वडगाव पान परिसरात मोठी कारवाई करत या केंद्राचा सूत्रधार भोंदू चमत्कारी राजेंद्र बापू गडगे याच्यासह त्याच्या एका सहकार्‍याला बेड्या ठोकल्या आहेत. दैवीशक्तीचा बनाव करुन कॅन्सरसारखेे गंभीर आजार बरे करण्याचा आणि पुत्रप्राप्तीचा दावा करणार्‍या या भोंदूच्या लुटीचा हा खेळ आता कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. अटक केलेल्या दोघांनाही आज न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना गुरुवारपर्यंत (ता.23) पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


गेल्या 10 वर्षांपासून राजेंद्र गडगे याने वडगाव पान परिसरात आपला आश्रम थाटला होता. शरीरात दैवीशक्ती संचारत असल्याचा खोटा आभास निर्माण करून त्याने स्वतःला ‘सरकार’ म्हणवून घेण्यास सुरुवात केली. या केंद्रात कर्करोगापासून ते कौटुंबिक वादापर्यंतच्या सर्व समस्या ‘चुटकीसरशी’ सोडवण्याचे दावे केले जात होते. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील आणि समस्याग्रस्त नागरिकांना जाळ्यात ओढण्यासाठी या भोंदूने सोशल मीडियाचा वापर केला. ‘दत्तधाम सरकार’ नावाच्या यूट्यूब चॅनेलवरून विज्ञानाशी कसलाही संबंध नसलेले व्हिडिओ प्रसारित करुन त्याने हजारो लोकांची फसवणूक केली. प्रत्येक भक्ताकडून 11 हजार ते 51 हजार रुपयांपर्यंतची रक्कम तो बिनदिक्कतपणे उकळत होता.


या आश्रमात केवळ मंत्रतंत्राचा खेळ चालत नव्हता, तर रुग्णांच्या जिवाशीही खेळ खेळला जात होता. कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा रीतसर शिक्षण नसताना या भोंदूच्या सांगण्यावरुन त्याचे पगारी कर्मचारी रुग्णांना पालापाचोळ्यापासून तयार केलेली ‘औषधे’ देत होते. अंधश्रद्धेच्या नावाखाली रुग्णांचे आर्थिक शोषण तर होतच होते, पण त्यांना योग्य वैद्यकीय उपचार मिळण्यापासून रोखून त्यांच्या आयुष्यालाही धोका निर्माण केला जात होता. नाशिकच्या खरात फाईल्स समोर आल्यानंतर संगमनेरातील काही पत्रकारांनी वडगावपानच्या भोंदूचा विषय लावून धरला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्यसचिव रंजना गवांदे यांनीही या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधले आणि पुराव्यानिशी तक्रार दाखल केली.


आपल्या विरोधात तक्रारी सुरु झाल्याचे पाहून गोंधळलेल्या या भोंदूने भयंकर षडयंत्र रचले होते. त्याने स्वतःच्या यूट्यूब चॅनेलवरुन बनावट व्हिडिओ प्रसारित केला. त्यामध्ये तक्रारदार रंजना गवांदे आणि पोलीस अधिकारीच आपल्याकडून खंडणी मागत असल्याचा खोटा आरोप करण्यात आला. धक्कादायक म्हणजे यात वापरण्यात आलेली तक्रारदाराची छबी बनावट असल्याचे स्पष्ट झाल्याने हा बनाव भोंदू गडगेच्या अंगलट आला. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने रचलेला हा षडयंत्राचा खेळ आता त्याला चांगलाच महागात पडला आहे.


रंजना गवांदे यांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे संगमनेर तालुका पोलिसांनी राजेंद्र बापू गडगे, डॉ.मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे, सुरज शिंदे आणि मधुकर शिंदे या पाच जणांवर भारतीय न्यायसंहिता, महाराष्ट्र नरबळी व जादूटोणा विरोधी कायदा, औषधी द्रव्ये व तिलस्मी उपचार प्रतिबंधक कायदा आणि महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसायी अधिनियमातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी (ता.17) रात्रीच पोलिसांनी राजेंद्र गडगे आणि मधुकर शिंदे यांना अटक केली आहे, तर उर्वरित तीन आरोपी सध्या पसार आहेत. अटक केलेल्या दोन्हीही आरोपींना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी पक्षाकडून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता  प्रकरणाच्या तपासासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली. त्यावर बचाव पक्षाने आक्षेप घेतला, दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने भोंदूबाबा व  त्याच्या पंटरला पाच दिवस (23 पर्यंत) पोलीस कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी ही धडाकेबाज कारवाई केली. या भोंदूने आजवर हजारो लोकांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा संशय आहे. केवळ आर्थिक लूटच नाही, तर भाविकांच्या शारीरिक आणि मानसिक शोषणासह सनातन धर्मातील प्रतीकांचा अवमान केल्याचाही आरोप त्याच्यावर आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, या ‘दत्तधाम’च्या काळकोठडीतून अजून किती पीडितांच्या कथा बाहेर येतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Visits: 13 Today: 14 Total: 1726376

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *