‘अगस्ति’ कारखाना बंद पाडण्याचे षडयंत्र हाणून पाडू ः डॉ. लहामटे शेतकरी समृद्धी मंडळाने पत्रकार परिषदेतून विरोधकांवर केली टीका

नायक वृत्तसेवा, अकोले
समाजातील कोणताच माणूस पिचडांनी मोठा होवू दिला नाही. अगस्तिमध्ये देखील तेच केले. अगस्ति चालू ठेवण्यासाठी शेतकरी समृद्धी मंडळ कटिबद्ध असून, कारखाना बंद पाडण्याचे विरोधकांचे षडयंत्र हाणून पाडू, असा इशारा आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिला आहे.

अकोले येथील शासकीय विश्रामगृहामध्ये बुधवारी (ता.20) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेस कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर, अशोक भांगरे, मधुकर नवले, डॉ. अजित नवले, अमित भांगरे, महेश नवले, विजय वाकचौरे, डॉ. संदीप कडलग, वसंत मनकर, मारुती मेंगाळ आदी उपस्थित होते.

अगस्ति कारखान्याची दशरथ सावंत बदनामी करत असताना अध्यक्ष टाळ्या वाजवत होते. निवडणुकीचे काहीही होवू द्या, कारखाना चालू ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. विशेष म्हणजे जळालेल्या ऊसाला देखील सावंत हेच जबाबदार असून, कारखाना सुरू करण्याबाबत अध्यक्ष पिचडांनी एकदाही बैठक बोलावली नसल्याचा आरोप करत गारव्याचे खरे जनक माजी मंत्री मधुकर पिचड असल्याचा घणाघात उपाध्यक्ष सीताराम गायकर यांनी केला. तालुक्याच्या विकासासाठी शांतता फार महत्त्वाची असून कोण कारखाना चालवू शकतो हे पहिले तपासा, असे आवाहन डॉ. नवले यांनी केले. अशोक भांगरे, महेश नवले, विजय वाकचौरे यांनीही विरोधकांवर सडकून टीका केली.
