अल्पवयीन मुलींना पळवून नेणार्‍या आरोपींना २४ तासांत अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; राहुरी व कोपरगाव येथील मुली


नायक वृत्तसेवा, राहुरी
येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याबाबत तसेच कोपरगाव येथील अल्पवयीन मुलीस अनोळखी आरोपीने अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेल्याबाबत राहुरी व कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. या दोन्ही गुन्ह्यांचा समांतर तपास करून अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवत दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना २४ तासांत अटक केली आहे.

सदर दोन्ही घटना अत्यंत संवेदनशील असल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून पीडित अल्पवयीन मुलींच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. या आदेशान्वये पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोहेकॉ. बबन मखरे, शरद बुधवंत, पोना. रवींद्र कर्डिले, संतोष लोंढे, संदीप दरदंले, सचिन आडबल, फुरकान शेख, पोकॉ. बाळू खेडकर, रणजीत जाधव, शिवाजी ढाकणे, रोहित मिसाळ, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, मपोना. भाग्यश्री भिटे, मपोकॉ. ज्योती शिंदे, चापोहेकॉ. चंद्रकांत कुसळकर व चापोकॉ. अरुण मोरे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांची दोन वेगवेगळी पथके नेमून पीडित अल्पवयीन मुलगी व दोन्ही आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना देवून पथकास तत्काळ रवाना केले.

पथक प्रथम राहुरी येथे दाखल गुन्ह्यातील आरोपी शाहनवाज शेख याचा शोध घेत असताना तो बीड येथे असल्याबाबत माहिती मिळाल्याने पथकाने बीड येथे नेमणुकीस असलेले पोना. मनोज वाघ यांना मदतीस घेवून आरोपीच्या ठावठिकाणाबाबत माहिती प्राप्त करुन शाहनवाज असीफ शेख (रा. वांबोरी, ता. राहुरी) हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून पुढील तपास कामी राहुरी पोलिसांत हजर केले. दुसरे पथक कोपरगाव शहर येथे दाखल गुन्ह्यातील अनोळखी आरोपीचा शोध घेत असताना गुन्ह्यातील पीडित अल्पवयीन मुलगी व आरोपी यांचा प्रथम पुणे, लोणावळा येथे शोध घेतला. परंतु ते नवी मुंबई येथील वाशी येथे असल्याबाबत माहिती प्राप्त होताच पथकाने वाशी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नीलेश बारसे यांना मदतीस घेवून पीडित व आरोपीच्या वास्तव्याबाबत माहिती प्राप्त करुन मुलीसह आरोपी तौफिक मिटू पठाण (रा. बोधेगाव, ता. शेवगाव) हे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवून पुढील तपासाकामी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात हजर केले.

Visits: 97 Today: 1 Total: 1098643

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *