गुटखा वितरकावर तालुका पोलिसांचा छापा! घरालाच केले होते गोदाम; चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात गुटखाबंदी होवून दशकं उलटले असताना आजही खेड्यांपासून महानगरांपर्यंतच्या प्रत्येक पानटपरीवर सर्रास गुटखा उपलब्ध आहे. सरकारच्या नियमांना फाट्यावर सोडून उत्पादक व वाहतुकदाराने यंत्रणांमधील काहींना हाताशी धरुन प्रत्येक जिल्ह्यात आपले ‘नेटवर्क’ उभारले आहे. त्या माध्यमातून अगदी गावखेड्यापर्यंत वितरण साखळी निर्माण झाली असून संगमनेर तालुका पोलिसांनी गुरुवारी दुपारी हिवरगाव पावसा येथे केलेल्या कारवाईतून ही गोष्ट स्पष्टही झाली आहे. गोपनीय माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी छापा घालतांना वरकरणी घर असल्याचे भासवून त्यात मोठ्या प्रमाणात साठवलेला पानमसाला आणि त्यात मिसळण्यासाठीची सुगंधित तंबाखू असा एकूण चाळीस हजारांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी गुटखा वितरक म्हणून समोर आलेल्या आप्पासाहेब जाधव याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची कारवाई गोपनीय माहितीच्या आधारावर करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांना त्यांच्या खबर्यांमार्फत हिवरगाव पावसा येथील आप्पासाहेब माधव जाधव (वय 57) हा इसम घरात गुटख्याची साठवणूक करीत त्याचे वितरण करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहाय्यक फौजदार बी.वाय.टपले यांच्यासह तेथे छापा घातला.

यावेळी घरातच आढळलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळीत मिळालेल्या माहितीची खातरजमा केली असता आंतील भागात दडवून ठेवलेला 36 हजार 600 रुपयांचा हिरा पानमसाला व त्यात मिसळणार्यासाठी वापरल्या जाणार्या सात हजार 680 रुपयांच्या तंबाखूसह एकूण 42 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी अहिल्यानगरचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहितेसह अन्न व सुरक्षा मानके अधिनियमातील विविध तरतुदींचा वापर करुन आरोपीला गजाआड घालण्यात आले आहे.

तरुण पिढीला आकर्षित करणार्या आणि त्याचे व्यसन लागल्यानंतर त्याचे जीवनच उध्वस्त करणार्या गुटख्याचे भयंकर प्रकार समोर येवू लागल्यानंतर राज्य सरकारने महाराष्ट्रात गुटख्याचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्री करण्यास पूर्णतः बंदी घातली आहे. मात्र सरकारच्या या बंदी हुकूमाला दीड दशकांनंतर दरवर्षी मुदतवाढ मिळूनही राज्यासह संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावखेड्यात आजही सर्रास गुटखा उपलब्ध असून उत्पादक, वाहतुकदार व तालुका वितरकाच्या पद्धतशीर साखळीतून यंत्रणा पोखरली गेली आहे. दर महिन्याला प्रत्येक विभागातील ठराविक व्यक्तिपर्यंत मलिदा पोहोचवला जात असल्याने राज्यात उत्पादनालाही बंदी असलेला हा जीवघेणा पदार्थ थेट कर्नाटक आणि गुजरातसारख्या राज्यातून तस्करी करुन आणला जात आहे.

तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत जप्त झालेल्या ‘हिरा’ गुटख्याची संपूर्ण वितरण साखळी खुद्द या गुटख्याचा उत्पादक आणि त्याचा पुण्यातील मेव्हणा स्वतः सांभाळतात. अहिल्यानगर जिल्ह्यात तर कधीकाळी एलसीबीत अधिकार्यांपेक्षा अधिक ‘दरारा’ असलेल्या आणि नंतरचा प्रदीर्घकाळ श्रीरामपूरच्या अप्पर कार्यालयात ठाण मांडलेल्या एका कर्मचार्याकडूनच ही साखळी चालवली जात असल्याचा गंभीर आरोप राज्याचे सर्वोच्च सभागृह मानल्या जाणार्या विधानसभेत झाला होता. चक्क हा विषयही कोणी सामान्य माणसाने नव्हेतर तालुक्याच्या आमदारांनी उपस्थित करुन गृहमंत्र्यांसह आरोग्यमंत्र्यांना कठोर कारवाईचे साकडे घातले होते. मात्र त्याचा कोणताही परिणाम गुटखा वितरणाच्या साखळीवर झालेला नसून आजही सर्वत्र मुबलक प्रमाणात गुटखा उपलब्ध आसल्याचे या कारवाईतूनही सिद्ध झाले आहे.

संगमनेर तालुक्याच्या पूर्वेकडील भागात राहणारा मोठा मासा ‘हिरा’ वितरणाचा सुत्रधार असून यापूर्वी काही गुन्ह्यात त्याच्यावर कारवाई देखील झाली आहे. जिल्ह्यात दोन ते तीनच्या संख्येने असलेल्या अशा मोठ्या माशांकडून शहर व तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येच्या गावांभोवती छोट्या-छोट्या वितरकांची नियुक्ति केली जाते. काहीजण अधिक पैसा कमावण्याच्या नादात बाहेरुन गुटखा आणून स्वतःच त्याची विक्री करण्याचाही प्रयत्न करतात. मात्र खुद्द उत्पादकाकडूनच मुख्य वितरकाच्या गोदामापर्यंतच्या सुरक्षेची हमी घेतली जात असल्याने राज्यातील गुटखाबंदी दीड दशकानंतरही कागदावरच आहे. त्यातून यंत्रणांमधील भ्रष्टाचारही वाढला असून तरुण पिढी मात्र व्यसनाच्या आहारी जावून आपले जीवन उध्वस्थ करुन घेत आहे.

