महामानवाच्या जयंती उत्सवात रंगली राजकीय वर्चस्वाची लढाई! आमदार अमोल खताळ यांचा ‘रोखठोक’ वार; तर, आमदार सत्यजीत तांबे यांचा ‘धडाकेबाज’ पलटवार..


श्याम तिवारी, संगमनेर
विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमादरम्यान सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगल्याचे चित्र आज संगमनेरात बघायला मिळाले. अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांच्या उपस्थितीत आंबेडकरी विचारांच्या समूहाने आयोजित केलेल्या व्याख्यानाला सुरुवात होत असतानाच महायुतीचे आमदार अमोल खताळ यांची स्मारकस्थळी ‘एन्ट्री’ झाली. त्यामुळे उत्साहीत झालेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी आधीच सुरु असलेल्या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करीत मोठ्या आवाजात डीजे लावल्याने गोंधळ उडाला. मात्र त्यामुळे विचलित न होता आमदार तांबे यांनी ‘ज्यांना विचारांची लढाई विचाराने लढता येत नाही ते अशा आवाजाचा आधार घेतात’ अशा शब्दात तोफ डागली. तर, आमदार खताळ यांनी चार दशकांच्या सत्तेचा संदर्भ देत ‘महामानवाच्या स्मारकामागे दारुबंदीचे कार्यालय’ या संदर्भाने माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला. काही मिनिटांच्या या राजकीय वर्चस्वाच्या लढाईने परिसरातील वातावरण मात्र धीरगंभीर बनले होते, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने दोन्ही बाजू समोरासमोर असूनही अनर्थ मात्र टळला.


संगमनेरच्या राजकीय मैदानात सध्या ‘नायक’ आणि ‘प्रति-नायक’ असा अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे. विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवासाठी संगमनेरातील आंबेडकर स्मारकस्थळी आलेल्या आमदार सत्यजीत तांबे यांचे भाषण सुरु असतानाच आमदार अमोल खताळ यांच्या समर्थकांनी मोठ्या आवाजात डीजे लावल्याने त्यात व्यत्यय आला. मात्र, त्यामुळे विचलित न होता आमदार तांबे यांनी याच डीजेच्या तालावर नाव न घेता आमदार खताळांचा खरपूस समाचार घेतला. ज्यांना विचारांची लढाई विचाराने लढता येत नाही, तेच लोक आवाजाचा आधार घेतात, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा ‘गेम’ उलटवला.


भर सभेत बोलताना आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, राजकारण हे बुद्धीने आणि कष्टाने करायचे असते, केवळ गाणी वाजवून किंवा गोंधळ घालून कोणी लोकनेता होत नाही. आम्ही विकासकामांची शिदोरी घेऊन जनतेसमोर आलो आहोत, तर काही लोक केवळ ‘इव्हेंट’ करुन प्रसिद्धी मिळवू पाहत आहेत. डीजेचा आवाज जसजसा वाढत होता, तसतसा तांबेंचा वारही अधिक धारदार होत गेला. यावेळी त्यांनी संगमनेरची जनता सुज्ञ आहे; तिला विकास करणारा ‘नायक’ हवा आहे की, केवळ गोंधळ घालणारा ‘खलनायक’, हे लवकरच स्पष्ट होईल असे सांगत एकप्रकारे त्यांनी थेट खताळ यांच्यावर निशाणा साधला. 

या प्रसंगामुळे संगमनेरमधील खताळ विरुद्ध थोरात-तांबे हा राजकीय संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. आमदार अमोल खताळ यांनी स्मारकाचा मुद्दा उपस्थित करुन भावनिक साद घातली असतानाच, आमदार तांबे यांनी त्यांच्या कार्यशैलीवर आणि ‘स्टंटबाजी’वर बोट ठेवून त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. एवढा आवाज करुनही जर तुमचे विचार लोकांपर्यंत पोहोचत नसतील, तर समजून जा की तुमचा पाया कच्चा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.


यावेळी डॉ.आंबेडकर यांना अभिवादन करुन माध्यमांसमोर आलेल्या आमदार अमोल खताळ यांनी ज्या महामानवाने देशाला संविधान दिले, ज्यांच्यामुळे आज आपल्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता आमदार म्हणून उभा राहू शकला, त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची विटंबना करण्याचे पाप संगमनेरच्या माजी नेतृत्वाने केल्याचा घणाघात केला. विश्‍वरत्न बाबासाहेबांच्या स्मारकाच्या अगदी मागे दारुबंदीचे कार्यालय सुरु करणे संगमनेरकरांचे सर्वात मोठे दुर्दैव असल्याची जळजळीत टीकाही त्यांनी केली. यावेळी अधिक आक्रमक पवित्रा घेत त्यांनी माजी सत्ताधार्‍यांच्या धोरणांचा जाहीर निषेधही केला.


गेल्या चाळीस वर्षांपासून संगमनेरमध्ये सत्तेचा ताम्रपट घेऊन मिरवणार्‍यांनी केवळ मतांचे राजकारण केल्याची जळजळीत टीका करताना त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा विषय छेडून विश्वरत्न बाबासाहेबांची प्रतिष्ठा राखण्याऐवजी, तिथे दारुबंदी विभागाशी संबंधित कार्यालय थाटून त्यांनी आंबेडकरी जनतेच्या भावनांचा खेळ केल्याचा गंभीर आरोपही केला. ‘हे कसले पुरोगामी नेतृत्व?’ असा सवाल विचारीत महापुरुषांच्या नावाचा केवळ भाषणांमध्ये वापर करायचा आणि कृती मात्र त्यांच्या विचारांच्या विरोधात करायची, हीच या नेत्यांची खरी ओळख असल्याची टीकाही त्यांनी केली..


विरोधकांवर केवळ टीका करुन न थांबता, आ.खताळ यांनी संगमनेरच्या विकासाचा नवा ‘रोडमॅप’ मांडला. ते म्हणाले की, आम्ही केवळ टेंडर काढण्याचे राजकारण करत नाही, तर महापुरुषांचे विचार कृतीत आणण्याचे काम करत आहोत. संगमनेरमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्णाकृती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ स्मारक उभारण्यासाठी महायुती सरकारने निधी मंजूर केल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. ज्यांनी स्मारकांचा अपमान केला, त्यांना जनता नक्कीच धडा शिकवेल अशी राजकीय कडी जोडण्यासही आमदार खताळ विसरले नाही. त्यांच्या या टीकेने एकीकडे उन्हाचा पारा चढत असताना त्यात राजकीय उष्णतेचीही भर पडली.


  • विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवीर रंगलेल्या या कलगीतुर्‍यातून नाशिक पदवीधरचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे आणि संगमनेरचे लोकप्रतिनिधी आमदार अमोल खताळ यांच्यात एकमेकां विरोधात जाहीर वाकयुद्ध रंगल्याने स्मारकाभोवतीच्या परिसरात काहीकाळ राजकीय तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत दोन्ही गटांना एकमेकांपासून दूर ठेवण्यास यश मिळवल्याने ऐन उत्सवात निर्माण झालेला तणाव निवळला, मात्र या प्रकरणाची चर्चा संपूर्ण तालुक्यात वार्‍याच्या वेगाने पसरली.आणि पारा पारावर त्यावर गप्पाही रंगल्याचे चित्र दिवसभर बघायला मिळत होते.

Visits: 66 Today: 9 Total: 1720582

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *