मुंबई पोलिसांनी चौकशी केलेला ‘तो’ गांजा तस्कर सहीसलामत! चौकशीचा ओघळ येवूनही संगमनेरातील ‘रामराज्य’ मात्र राहिले अबाधित

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मुंबईच्या गुन्हे शाखेने उघड केलेल्या महानगरातील गांजा तस्करीचा तपास शनिवारी संगमनेर शहरापर्यंत येवून पोहोचला होता. मात्र त्यातून काय निष्पन्न झाले हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात एकाचवेळी मुंबई आणि पुण्याच्या गुन्हे शाखेने थेट संगमनेर शहरात येवून एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि नंतर सोडूनही दिले. पण त्याच्याकडून नेमके काय मिळविले अथवा त्याचा मुंबईतील ‘त्या’ प्रकरणाशी काय संबंध याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होत नसल्याने या दोन्ही पथकांबाबत संशय निर्माण झाला आहे. त्यातही कहर म्हणजे दोन महानगरांचे पोलीस पथक शहरात येवूनही त्याबाबतची कोणतीही ठोस माहिती येथील पोलिसांना नसावी याबाबतही आता आश्चर्य व्यक्त होत आहे.

गेल्या शुक्रवारी (ता.12) मुंबईतील पूर्वद्रुतगती महामार्गावरील विक्रोळीजवळ मुंबईच्या गुन्हे शाखेने ओडिशामधून मुंबईत दाखल झालेला एक टेम्पो पकडला होता. वरकरणी शहाळे वाहतूक करणारे वाहन असे भासविण्यात आलेल्या या टेम्पोत पोलिसांना तब्बल 1 हजार 800 किलो गांजा आढळून आला. त्यामुळे अलिकडच्या काळात संपूर्ण राज्यात झालेली ही कारवाई सर्वात मोठी समजली गेल्याने अवघ्या राज्याचे लक्ष्य त्याकडे वेधले गेले. विशेष म्हणजे मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार महिन्यातून दोनवेळा अशाच पद्धतीने शहाळ्याखाली दडवून प्रत्येकी पाच टन (पाच हजार किलो) गांजा राज्यात आणला जातो. मात्र कारवाई करतेवेळी पोलिसांना अवघा अठराशे किलोच गांजा सापडला. त्यामुळे मुंबईत पोहोचेपर्यंत त्यातील 3 हजार 200 किलो गांजा वितरित झाल्याचे उघड होते आणि त्याचा तपास होणेही महत्त्वाचे होते.

त्यानुसार दुसर्‍याच दिवशी मुंबई आणि पुणे येथील गुन्हे शाखेची स्वतंत्र पथके संगमनेरात पोहोचली. त्यांनी शहराच्या पूर्वेकडील एका वसाहतीतून गांजाची विक्री करणार्‍या एकाला ताब्यात घेतले. त्याची सुमारे दोन तास कसून चौकशीही करण्यात आली. या चौकशीत त्याच्याकडे काही प्रमाणात गांजा सापडल्याचीही चर्चा आहे, मात्र मुंबई प्रकरणाशी त्याचा कोणताही संबंध नसल्याने समोर आल्याने दोन्ही ठिकाणच्या पथकाने त्याला अटक करण्याचे टाळीत चौकशीअंती त्याला सोडून दिले.

गांजातस्कर म्हणून आधीच कुप्रसिद्ध असलेल्या कोण्या व्यक्तिला केवळ चौकशी करुन सोडतील ते पोलीस कसे? या उक्तीप्रमाणे संबंधिताचा त्या प्रकरणाशी जरी संबंध नव्हता तरीही तो गांजा तस्करच असल्याने या दोन्ही पथकांनी वाहत्या गंगेत हात धुवून घेतल्याची चर्चा आता परिसरात सुरु आहे. याच व्यवसायात नामचीन असलेल्या एकाने नाव न सांगण्याच्या अटीवर त्या तस्कराला सहज सोडून देताना मोठी तडजोड झाल्याचे अगदी ठामपणे सांगितले. विशेष म्हणजे अन्य पोलीस ठाण्याचे पथक जेव्हा एखाद्या प्रकरणाच्या तपासासाठी दुसर्‍या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जातात तेव्हा तेथील पोलीस ठाण्याच्या डायरीत तशी नोंद करुन आवश्यकता असल्याचा स्थानिक पोलिसांची मदत घेतात.

या प्रकरणात मात्र मुंबई आणि पुणे या दोन महानगरांतील पोलिसांनी संगमनेर शहर पोलिसांना कानोकान खबर लागू न देता थेट ‘त्या’ संशयिताचे घर गाठून त्याची चौकशी केली व परस्पर त्याला ‘त्या’ प्रकरणात क्लिनचीट देवून तडजोड करीत त्याला सोडूनही दिले. तरीही स्थानिक पोलिसांना त्याबाबत फारशी माहिती नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या दोन्ही महानगरांच्या पोलीस पथकांबाबत संशयाचे वलय निर्माण होण्यासह स्थानिक पोलिसांच्या गोपनीय विभागाचे अपयशही ठळकपणे समोर आले आहे.

गेल्या काही वर्षात अन्य अवैध व्यवसायांसह संगमनेर शहर जिल्ह्यातील गांजा विक्रीचे केंद्रही ठरत असल्याचे झालेल्या कारवायांवरुन लक्षात येते. काही वर्षांपूर्वी नगरच्या कोतवाली पोलिसांनी पकडलेल्या अलिशान वाहनातून तब्बल एक कोटी रुपयांचा गांजा हस्तगत करण्यात आला होता. त्यावेळी या तस्करीची मुख्य सूत्रधार म्हणून संगमनेर तालुक्यातील एका महिलेचे नाव समोर आले होते. विशेष म्हणजे गजाआड झालेल्या त्या महिलेच्या जामीनासाठी सहाय्य केले म्हणून कोतवालीच्या तत्कालीन पोलीस निरीक्षकांना निलंबनाच्या कारवाईचाही सामना करावा लागला होता.

गेल्या वर्षी शहरात गांजा विक्रीचा नवाच अड्डाही समोर आला होता. त्याबाबतची अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता मालदाड रोडवरील त्या कारवाईतून समोर आलेल्या आरोपींचा ‘त्या’ महिलेशीच संबंध असल्याचेही समोर आले होते. मात्र तपाशाची चक्रे त्यापुढे गेलीच नसल्याने एकप्रेकारे त्या प्रकरणावर धूळ साचली होती. मुंबईत झालेल्या कारवाईने त्यावरील धूळ काही क्षण उडाली असली तरीही आता सबकुछ आलबेल असल्याची स्थिती असल्याने इतक्या मोठ्या कारवाईनंतर आणि त्याचे ओघळ संगमनेरपर्यंत पोहोचूनही शहरात ‘रामराज्य’ कायम आहे.


काही वर्षांपूर्वी पहाटेच्या सुमारास नगरच्या कोतवाली पोलिसांनी एक अलिशान वाहन पकडले होते. त्या वाहनातून पोलिसांना सुमारे एक कोटी रुपयांचा गांजा सापडला होता. पोलिसांनी त्या प्रकरणात संगमनेरातील एका कुविख्यात गांजातस्कर महिलेसह पाच जणांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून आंध्रप्रदेशातील ‘शंकर’ या व्यक्तीचे नाव समोर आले होते. गेल्यावर्षी स्थानिक पोलिसांनी मालदाड रस्त्यावरील एका वसाहतीत अशीच मोठी कारवाई केली होती, त्यातूनही ‘शंकर’च समोर आला होता. मात्र आजवर या शंकरचे कोणालाही दर्शन झाले नाही आणि ना जिल्ह्यातील गांजा वितरणाचे नेटवर्क उध्वस्त झाले. त्यात आता मुंबई पोलिसांच्या कारवाईचा आणखी एक अध्याय जोडला गेला आहे.

Visits: 11 Today: 1 Total: 119119

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *