अहमदनगर जिल्ह्यात लसीकरण मोहीम व्यापकपणे राबवा ः मुश्रीफ अकोले विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांचे उद्घाटन

नायक वृत्तसेवा, अकोले
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. दररोज 15 हजार लोकांच्या कोविड चाचण्या होत आहेत. मात्र असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. आजही जिल्ह्यात लसीचे 1 लाख 17 हजार डोस शिल्लक आहेत. तेव्हा जिल्ह्यात लसीकरण मोहीम व्यापकपणे राबविण्याची गरज आहे. यासाठी गावपातळीवरील ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य कर्मचारी यांनी सातत्यपूर्ण काम करावे, अशा सूचना राज्याचे ग्रामविकास, कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या.

अकोले विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामे, अकोले नगरपंचायत हद्दीतील 12 कोटी 12 लाख रुपयांचे कामांचे व अकोले बाजारतळ सुशोभीकरणाच्या 4 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. त्यानंतर अकोले येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, पंचायत समिती सभापती ऊर्मिला राऊत, संगमनेर प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे, तहसीलदार सतीश थिटे, तसेच तालुक्यातील आरोग्य अधिकारी, पंचायती समितीच्या सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, एक काळ असा होता बाधितांच्या संख्येमध्ये अहमदनगर जिल्हा देशात पहिला होता. 61 गावांमध्ये संपूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आला. आज मात्र प्रशासनाच्या सुयोग्य व्यवस्थापनामुळे रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. तरीही आपणास गाफील राहून चालणार नाही. तिसर्‍या लाटेच्या शक्यतेला सर्वांनी गांभीर्याने घेतले पाहीजे. यासाठी प्रशासन सज्ज आहे. तिसर्‍या लाटेचा अटकाव करण्यासाठी जनतेने शारीरिक अंतर ठेवणे, मुखपट्टीचा वापर करणे व हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचा कायम वापर केला पाहिजे. यासाठी आरोग्य विभागाने जागृती करावी, अशा सूचनाही मुश्रीफ यांनी दिल्या.

देशात 100 कोटी लसीकरणाच्या टप्पा ओलांडला गेला आहे. अहमदनगर जिल्ह्यातही 32 लाख 56 हजार डोसचे लसीकरण झाले आहे. यात दुसरा डोस 8 लाख 44 हजार लोकांनीच घेतला आहे, असे नमूद करून ते म्हणाले, दुसरा डोस घेणारे लोकांची संख्या वाढली पाहिजे यासाठी गावपातळीवरील शासकीय सेवक, सरपंच व लोकप्रतिनिधींनी लोकांमध्ये जाऊन त्यांना कोविड लसीकरणासाठी प्रवृत्त करावे, लोकांचे समुपदेशन करावे, अशा सूचना करून त्यांनी शासन राबवित असलेल्या मिशन कवच कुंडले व युवा स्वास्थ्य मोहिमेविषयी माहिती दिली. तसेच अकोले येथे उपजिल्हा रुग्णालय निर्माण करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांनी सादर करावा अशा सूचनाही शेवटी त्यांनी केल्या.

भाजप सूडाचे राजकारण करत आहे…
विरोधकांकडे आता काहीच मुद्दे राहिले नाही. राज्यात महाविकास आघाडी अभेद्य राहणार हे लक्षात आल्याने भाजपने सूडाचे राजकारण सुरू केले आहे. परंतु आघाडी सरकार अभेद्य आहे. सरकारची काळजी करू नये. वेगवेगळ्या चौकशा लावून भाजप सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला.

Visits: 99 Today: 1 Total: 1101286

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *