दैनिक ‘नायक’चा दिवाळी अंक वाचकांची भूक भागवेल ः थोरात पहिल्यावहिल्या दिवाळी अंकाचे दिमाखात प्रकाशन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेली पाच वर्षे सातत्याने गुणवत्तापूर्ण व दर्जेदार दैनिक म्हणून दैनिक नायक वाचकांच्या पसंतीस उतरले आहे. यावर्षी दैनिक नायकने पहिलावहिला दिवाळी अंक प्रकाशित केला आहे. अत्यंत दर्जेदार साहित्यिकांना सोबत घेऊन वाचकांची वैचारिक भूक भागविणार्या लेखांचा यात समावेश आहे. यामुळे नक्कीच हा दिवाळी अंक वाचनीय झाला असून, दिवाळीमध्ये वाचकांना खास मेजवाणी ठरेल असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेरात सोमवारी (ता.1) पार पडलेल्या दिमाखदार प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी विधान परिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे, सीए. कैलास सोमाणी, अनिल राठी, ओंकार बिहाणी, जसपाल डंग, संपादक गोरक्षनाथ मदने, कार्यकारी संपादक श्याम तिवारी, अतिथी संपादक संदीप वाकचौरे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना नामदार थोरात म्हणाले, दिवाळी अंक ही महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. दिवाळीनिमित्ताने फराळासोबत वाचकांची वैचारिक भूक भागविण्यासाठी दिवाळी अंक नेहमीच मदत करतात. नायकच्या दिवाळी अंकातील लेखकांची मांदियाळी पाहिल्यानंतर हा दिवाळी अंक अत्यंत उल्लेखनीय झाला आहे. महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांनी आपल्या साहित्य क्षेत्रातील प्रवासाविषयीचे अनुभव कथन केल्याने वाचकांना ते प्रेरणा देतील. ग्रामीण भागातील अंक असूनही संपादक मंडळाने केलेला प्रयत्न वाखणण्याजोगा असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, नायक परिवाराने अत्यंत संघर्षमय स्वरुपात कार्यरत राहून वेगळेपण जपले आहे. ग्रामीण भागात वाचकांना वैशिष्ट्यपूर्ण बातम्या देऊन समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यावर्षी त्यांनी पहिलाच दिवाळी अंक प्रकाशित करुन नव्याने दिवाळी अंकाच्या परंपरेत भर टाकली आहे. यंदाच्या दिवाळी अंकात नामवंत लेखक लिहिते झाले असले तरी वस्तुतः हा दिवाळी अंक प्रेरणादायी ठरणार आहे. मदने, तिवारी यांनी अत्यंत उत्तम व प्रामाणिकपणाने आपले काम चालू ठेवून साततत्याने नायक प्रकाशित केला आहे. दिवाळी अंकाचे अतिथी संपादक संदीप वाकचौरे यांनी महाराष्ट्रातील उत्तम साहित्यिकांची निवड करुन वाचकांना उत्तम ते देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हा दिवाळी अंक वाचकांची नक्कीच भूक भागवेल, असे मतही व्यक्त केले. तर सीए. कैलास सोमाणी म्हणाले की, ग्रामीण भागात उत्तम दिवाळी अंकाची परंपरा फारसी नसली तरी नायकने आपला पहिलाच दिवाळी अंक अत्यंत गुणवत्तापूर्ण स्वरुपात प्रकाशित केला आहे. त्यामुळे दिवाळीच्या गोडधोड फराळासोबतच वाचकांना मनपसंत साहित्य सफर यानिमित्ताने घडणार आहे.

नायकच्यावतीने यावर्षी पहिला दिवाळी अंक प्रकाशित झाला आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व आपली नाममुद्रा उमटविणारे अनेक नामवंत लोकांनी आपला जीवनप्रवास या अंकात रेखाटलेला आहे. गझलसम्राट श्रीकृष्ण राऊत यांनी आपल्या समग्र गझलप्रवासाचा पट गझलने मला समृद्ध केले या लेखात उमटविला आहे. हा सारा प्रवास वाचकांना थक्क करणारा आहे. तसेच बालभारतीचे भाषा विषय समितीचे अध्यक्ष शिवाजी तांबे यांनी अभ्यासाची श्रीमंती या लेखातून गरिबीवर मात करुन केवळ शिक्षणाच्या द्वारे स्वतःला समृद्ध करता येते हा प्रवास अत्यंत उत्तम रेखाटला आहे. कष्ट होते तरी या लेखात राज्य परीक्षा मंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी पुस्तकांनी त्यांना समृद्ध केले, जीवनाची वाट दाखवली आणि तो सारा प्रवास अत्यंत संघर्षमयरित्या शब्दबद्ध केला आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात आपली नाममुद्रा उमटविणारे रामदास नेहुलकर यांनी पत्रकारितेतील आपले अनुभव आणि नव्याने येऊ पाहणार्या पत्रकारांसाठी नेमक्या काय गुणांची गरज आहे, याची मांडणी केलेली आहे. डॉ. संतोष बोराडे यांनी संगीताच्या माध्यमातून मांडलेला प्रवास संगीताचे महत्त्व विषद करतो. जगभरात अडीच लाखांहून अधिक विद्यार्थी शिकविल्यानंतरही संगीत साधना कशी महत्त्वाची आहे याचे चित्र उभे करते. पंच्च्याहत्तरहून अधिक सिनेमांना गीतलेखन करुन आज सिनेमासृष्टीत सिनेगीतकार म्हणून मान्यता मिळालेल्या बाबासाहेब सौदागर यांनी आयुष्याच्या हिंदोळ्यावर आलेल्या अनुभवांची मांडणी अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणते. संगमनेर येथील नामांकित नाट्यलेखक डॉ.सोमनाथ मुटकुळे यांनी एकाहून एक सरस मराठी नाटके दिली आहेत. त्या प्रवासात आलेले कटू-गोड अनुभवांचे कथन केलेले आहे. शशीकांत शिंदे यांनी आपला काव्यप्रवास तर विद्याधर शुक्ल यांनी विविध भाषेतील अनुवादाचा साहित्य प्रवास रेखाटला आहे. बाळासाहेब थोरात यांच्या यशाचे रहस्य सांगणारा हिरालाल पगडाल यांचा व मोहिनी घालणारे आर.डी.बर्मन यांच्यावरील ज्येष्ठ सिनेपत्रकार व दैनिक केसरीचे वृत्तसंपादक स्वप्नील पोरे यांचे लेख वाचकांच्या पसंतील उतरणार आहे. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते सदानंद देशमुख यांच्या साहित्य विश्वातील अनुभव सिद्धतेची मांडणी करणारा नरेंद्र लांजेवार यांचा लेख वाचनीय झाला आहे. महात्मा गांधींचे मोठेपण आणि त्यांच्या जीवन तत्त्वज्ञानाची मांडणी आजही समाजमनात प्रकाशमान झाल्याचा अनुभव गांधी अभी जिंदा है.. संदीप वाकचौरे यांचा लेख अंकात समाविष्ट आहे. त्यासोबत महाराष्ट्रातील अनेक नामवंत कवी यांच्या कविताही वाचकांना वाचायला मिळणार आहे.

