सहाव्या दिवशी पोलिसांचे चाळीस छापे मात्र हात रिकामेच! महामानवाच्या मिरवणुकीतील धुडगूस; आत्तापर्यंत अवघ्या तिघांनाच झाली अटक..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने निघालेल्या शोभायात्रेत अनाधिकाराने शिरकाव करुन धुडगूस घातल्याप्रकरणी सुमारे सव्वाशे जणांवर विविध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. या घटनेत सहभागी असलेल्या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून एकसारखे छापासत्र सुरु आहे. याच श्रृंखलेत दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी रात्री पोलिसांनी विविध चाळीस ठिकाणी छापे घातले, मात्र अटकेच्या भितीने पसार झालेले आरोपी अजूनही घरी परतण्यास धजावत नसल्याचे त्यातून सिद्ध झाले असून इतक्या मोठ्या प्रमाणात धाडसत्र राबवूनही पोलिसांचे हात रिकामेच आहेत. या प्रकरणात आत्तापर्यंत अवघ्या तिघांना अटक झाली असून आज (ता.20) त्यांच्याही पोलीस कोठडीची मुदत संपत आहे.
गेल्या गुरुवारी (ता.14) महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने शहरातील संघर्ष मंडळाने सायंकाळी शोभायात्रेचे आयोजन केले होते. दिल्लीनाका परिसरातून निघालेली ही शोभायात्रा रात्री आठच्या सुमारास मेनरोडवरील श्रीकृष्ण मंदिराजवळ आली असता आसपासच्या गल्लीबोळातून 25 ते 30 मुस्लीम तरुणांनी या शोभायात्रेत घुसखोरी करीत संबंध नसताना नृत्य करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांच्याकडून शोभायात्रेतील इतरांना कोणताही त्रास न झाल्याने त्यांना विरोध झाला नाही. मात्र तेथून पुढे अवघ्या शंभर मीटर अंतरातच या स्थितीत बदल झाला. मेनरोडवरील श्रीकृष्ण मंदिराच्या पुढच्या भागात एका हिंदुत्त्ववादी संघटनेने महामानवाच्या शोभायात्रेचे स्वागत करण्याची जय्यत तयारी केली होती, त्यासाठी मोठा मंचही उभारण्यात आला होता. सदरची शोभायात्रा या ठिकाणापर्यंत येईपर्यंत त्यात शिरकाव करणार्या मुस्लीम तरुणांची संख्या सव्वाशेहून अधिक झाली होती. विशेष म्हणजे सदरची मिरवणूक अनुसूचित जाती समाजाची आहे हे माहिती असतानाही नंतर घुसलेल्या जवळपास शंभराहून अधिक मुस्लीम तरुणांनी आपल्या हातात चाँदतारा रेखाटलेले हिरवे व लाल झेंडे घेतले होते. त्यामुळे मेनरोडवरील स्वागत कक्षापर्यंत पोहोचता पोहोचता या शोभायात्रेचा नूरच पालटला.
महामानवाची शोभायात्रा मेनरोडवरील ‘त्या’ स्वागतकक्षापर्यंत पोहोचली तोपर्यंत अनाधिकाराने घुसखोरी करणार्या तरुणांचा धुडगूसही वाढला होता. त्यात हिंदुत्त्ववाद्यांचा मंच पाहून त्यातील काहींनी ‘अल्ला हू अकबर’ आणि ‘इस्लाम झिंदाबाद’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केल्याने वातावरणातील तणाव वाढू लागला. यावेळी या धर्मांध मुस्लीम तरुणांतील अनेकांनी अतिशय बिभत्स नृत्य करण्यासह भारतरत्नांची प्रतिमा विराजमान असलेल्या रथासमोर येवून अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केली, तर काहींनी शोभायात्रेत सहभागी असलेल्या महिलांशी लगड करीत त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
हा प्रकार समजताच शोभायात्रेच्या बंदोबस्तात अग्रणी असलेल्या पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी फौजफाट्यासह तेथे धाव घेत बळाचा वापर करुन घुसखोर मुस्लीम तरुणांना शोभायात्रेतून हुसकावून लावले. मात्र या प्रकाराने शोभायात्रेचे आयोजकही संतप्त झाल्याने त्यांनी मेनरोडपासून ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बसस्थानकाजवळील स्मारकापर्यंत वाद्य न वाजवताच मिरवणूक पूर्ण केली. त्यानंतर रात्री उशीराने संघर्ष मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण (रा.दिल्लीनाका) यांनी शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दाखल केली.
त्यानुसार शहर पोलिसांनी फिरोज गुलाब बागवान (रा.मोमीनपुरा), अहमद कामर चौधरी, अमन समीन बागवान, हुजेब इक्बाल बागवान, सोहेल इक्बाल बागवान, अल्ला अजीज खान, हमजा शेख, अरबाज शेख, अब्दुल समद कुरेशी, डॅनियल शेख, आफन शेख, उमेद काझी, फैजान (गफ्फारचा मुलगा), मारुफ अस्लम बागवान या निष्पन्न आरोपींसह शंभर ते सव्वाशे जणांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 295 (अ), 296, 153 (ब), 354 (अ), 143, 147, 120 (ब), 323 सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे (अॅट्रॉसिटी) कलम 3 (1) (यू) (व्ही) (डब्ल्यू), 3 (2) (5, ए) प्रमाणे गुन्हा दाखल करीत त्याच रात्री यातील दोघांना अटक केली तर तिसरा आरोपी घटनेच्या दुसर्या दिवशी पोलिसांच्या हाती लागला. या तिघांनाही न्यायालयाने 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती, त्याची मुदत आज संपत आहे.
या दरम्यान गेल्या गुरुवारपासूनच पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी धाडसत्र राबविण्यास सुरुवात केली. रविवारी (ता.17) पोलीस उपअधीक्षक राहुल मदने बाहेरगावी गेल्याने गेल्या दोन दिवसांपासून ही मोहीम थांबविण्यात आली होती. मंगळवारी ते पुन्हा हजर होताच रात्री पोलिसांनी शहराच्या विविध चाळीस ठिकाणी छापे घातले. मात्र पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे अतिशय गंभीर कलमान्वये असल्याने एकदा कारागृहात गेलो तर काही महिने बाहेर येता येणार नसल्याची जाणीव झाल्याने धर्मांध होवून दहशत माजवणारे शंभराहून अधिकजण गेल्या सहा दिवसांपासून दडून बसले आहेत. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात धरपकड राबवूनही पोलिसांच्या हाती एकही आरोपी लागला नाही. मात्र या प्रकरणात पोलिसांनी सत्तरहून अधिक जणांची ओळख पटविलेली असून त्यांना गजाआड करण्याचा निर्धार केला आहे.
संबंध नसताना दुसर्या समाजाच्या शोभायात्रेत घुसखोरी करुन आपल्या धर्मांचे झेंडे फडकावून आणि हिंदूबहुल भागात धार्मिक घोषणाबाजी करुन दहशत निर्माण करण्याचा हा प्रकार पोलिसांनी अतिशय गांभीर्याने घेतला आहे. त्यामुळे या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेज, काहींनी केलेले मोबाईल चित्रण प्राप्त करुन त्याद्वारे आरोपींची ओळख पटविली असून आत्तापर्यंत हा धुडगूस घालणार्या सत्तरहून अधिक जणांची नावे उघड केली असून अटकेत असलेल्या तिघांकडूनही या प्रकारात सहभागी असलेल्यांची ओळख पटविली जात आहे.