जेथे दिली ‘धमकी’ तेथेच दमदार ‘एन्ट्री’! दोन जेसीबींसह धडक; जोर्वेनाक्यावरील ‘ते’ अतिक्रमण भूईसपाट..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
लखमीपुरा कब्रस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी अतिक्रमण करुन उभारलेल्या गाळ्यांमधील दुकानदाराने गुरुवारी पालिकेच्या मुख्याधिकार्यांसह अतिक्रमण विरोधी पथकाला शिवीगाळ करीत धमक्या दिल्या होत्या. त्यामुळे परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनल्याने पालिकेला आपली मोहीम अर्धवट सोडावी लागली होती. मात्र या उपरांतही मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी माघार न घेता दुसर्याच दिवशी दोन जेसीबी यंत्र, ट्रॅक्टर आणि डझनभर कर्मचार्यांसह पुन्हा जोर्वेनाक्यावर दमदार एन्ट्री करीत सदरचे अतिक्रमण भूईसपाट केले. विशेष म्हणजे आदल्या दिवशी संबंधिताचे नुकसान टाळण्यासाठी त्याला सामान काढून घेण्याची संधी देण्यात आली होती, मात्र यावेळी स्वतःला बाहुबली समजणार्या रफीक एजाजुद्दीन शेख उर्फ रफीक सुन्नी याला घटनास्थळावर फिरकण्यासही मज्जाव करण्यात आला होता. सुमारे तासाभराच्या कारवाईत इंडिया पाटा गॅरेज नावाने सरकारी जागेत थाटण्यात आलेल्या दुकानासह त्यालगतचे दुकानही अतिक्रमण विरोधी पथकाने मुळासकट उपटून नेले.
पालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला विरोध करीत उभ्या राहिलेल्या आंदोलनापासून चर्चेत आलेल्या जोर्वेनाक्यावर गेल्या २८ मे रोजी अतिक्रमणधारकांनी दांडगाई करीत जोर्वे येथील शेतकर्यांच्या निष्पाप मुलांना मारहाण केली होती. त्याच दिवशी रात्री मारहाण झालेल्या मुलांचे मित्र घडल्या प्रकाराबाबत तक्रार दाखल करुन घराकडे परतत असताना पहिल्या प्रकरणातील आरोपींसह सुमारे दीडशे ते दोनशे जणांच्या जमावाने त्यांच्यावर सशस्त्र हल्ला करुन त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र दैव बलवत्तर म्हणून त्यांनी जमावाच्या तावडीतून सुटका करुन घेत तेथून पलायन केल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र या घटनेने संगमनेरातील सामाजिक सौहार्दाच्या वातावरणात मिठाचा खडा पडला आणि त्याचे रुपांतर हजारोंच्या उपस्थितीत ६ जून रोजी हिंदू जनआक्रोश मोर्चा निघण्यात झाले.
या सर्व घटनांमुळे जागे झालेल्या प्रशासनाने ३० मे रोजी शहराला अशांत करण्यास कारणीभूत ठरलेले जोर्वेनाक्यावरील अतिक्रमण मोठ्या बंदोबस्तात जमीनदोस्त केले. मात्र त्यावेळी लखमीपुरा कब्रस्थानाच्या बाह्य बाजूस खुद्द विश्वस्तांनीच अतिक्रमण करुन उभारलेल्या व्यावसायिक गाळ्यांना मात्र अभय मिळाले होते. त्या अतिक्रमणाबाबत परिसरातील जवळपास २५ रहिवाशांनी पालिकेकडे लेखी तक्रार केल्यानंतर सदरील अतिक्रमण हटविण्याबाबत पालिकेकडून नोटिसा बजावण्यास सुरुवात झाली व अखेर गुरुवारी (ता.१४) मुख्याधिकारी राहुल वाघ, नगर अभियंता प्रशांत जुन्नरे, अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुदाम सातपुते व नगर रचनाकार शुभम देसले यांच्यासह पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सदरील अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरु केली.
मात्र त्यावेळी सरकारी जागेवर अतिक्रमण करुन ‘इंडिया पाटा गॅरेज’ नावाचे दुकान थाटणार्या रफीक एजाजुद्दीन शेख उर्फ रफीक सुन्नी याने अचानक आवेशात येवून कारवाईत अडथळे निर्माण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने पालिकेच्या पथकाला शिवीगाळ करीत थेट मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या अंगावर धावून जात आपल्या हातातील कागदांचा गठ्ठा त्यांच्यावर भिरकावून ‘तुझे देख लुंगा, फिर यही दुकान लगाऊंगा..’ अशी एकेरी भाषेत धमकीही भरली. तर, सारीक एजाज शेख उर्फ सर्या याने पालिकेच्या अन्य अधिकार्यांना शिवीगाळ करीत तेथून निघून जाण्याची धमकी भरली. या प्रकाराने परिसरात काहीसा तणाव निर्माण झाल्याने पालिकेने गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आपली मोहीम स्थगित केली.
मात्र ‘त्या’ दोघांनी दिलेल्या धमक्यांना कोणतीही भीक न घालता मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी वरील घटनेच्या दुसर्याच दिवशी दोन जेसीबी यंत्र, ट्रॅक्टर आणि सुमारे डझनभर कर्मचारी सोबत घेत जेथे त्यांच्यासह पालिका पथकाला धमकी देण्यात आली, तेथेच दमदार एन्ट्री करीत इंडिया पाटासह त्यालगत उभारलेले संपूर्ण अतिक्रमण भूईसपाट करुन टाकले. गुरुवारी मुख्याधिकार्यांनी माणुसकीच्या नात्याने संबंधिताला दुकानातील सामान काढून घेण्याची संधी दिली होती, मात्र शुक्रवारच्या कारवाईत अशी कोणतीही संधी ठामपणे नाकारताना त्यांनी आरोपी रफीक शेख उर्फ सुन्नी आणि सारीक शेख उर्फ सर्या या दोघांनाही अतिक्रमण स्थळावर येण्यासही मज्जाव केला. पालिकेने अतिक्रमणधारकाचा दबाव झुगारुन केलेल्या या धडक कारवाईचे परिसरातील कायदाप्रिय नागरिकांसह संगमनेरकरांनी स्वागत केले आहे.