आरोग्य अधिकार्यानंतर आता तालुका पोलीस निरीक्षकही संशयात! निमगाव भोजापूरमधील ‘मुन्नाभाई’चा दवाखाना; दुसर्यांदा गुन्हा घडूनही अटकेपासून संरक्षण..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
निलंबित तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश घोलप यांच्या एकाच ठिकाणच्या प्रदीर्घ सेवेतून संगमनेर तालुक्यात बोगस वैद्यकीय व्यावसायिकांचा सुळसुळाट झाला असून त्याचे दृष्य परिणाम आजही समोर येत आहेत. दोनच दिवसांपूर्वी थेट छत्रपती संभाजीनगरमधून निमोणच्या मारुती मंदिरात येवून रुग्णांवर उपचार करणार्या ‘निसर्गोपचार’ तज्ञाचा भंडाफोड झाल्यानंतर आता ‘विधानसभे’च्या सुरक्षा व्यवस्थेलाच आव्हान देणार्या दत्तात्रय गुंजाळ याच्या निमगाव भोजापूरमधूनही तसाच प्रकार उजेडात आला आहे. धक्कादायक म्हणजे या घटनेत आंतररुग्ण विभाग चालवण्याचा परवाना नसतानाही सुरु असलेल्या एका बेकायदा रुग्णालयाच्या दर्शनीभागात पाच वर्षांपूर्वी ‘बोगस’ म्हणून कारवाई झालेला आणि त्यानंतर ‘सूचीवेध चिकित्से’चा कोर्स करुन चक्क त्या प्रमाणपत्राच्या आधारावर पुन्हा डॉक्टर म्हणून मिरवत आपल्या घरात अॅलोपॅथीची औषधे व इंजेक्शन बाळगणार्या शैलेश किसनराव कडलग या मुन्नाभाईसह बेकायदा आंतररुग्ण विभाग चालवणार्या डॉ.प्रवीण गंगाधर कवडे या दोघांवर वैद्यकीय व्यवसायी, राष्ट्रीय चिकित्सा आयोग व मुंबई सुश्रुषा गृह नोंदणी अधिनियमातंर्गत गुन्हा दाखल झाला आहे. धक्कादायक म्हणजे कोविड संक्रमणाच्या कालावधीतही मुन्नाभाई कडलगचा कारनामा उघड होवून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता, त्यानंतर शनिवारी पुन्हा तो त्याच गुन्ह्यात आढळल्याने कायद्यातील तरतुदींचा विचार करता पोलिसांनी त्याला गजाआड घालण्याची गरज होती. मात्र डॉ.घोलप यांच्याप्रमाणेच नियुक्तिपासूनच वादग्रस्त ठरलेल्या तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी कायद्यालाच फाट्यावर हाणल्याने दुसर्यांदा गुन्हा दाखल होवूनही हा बोगस डॉक्टर आजही मुक्तपणे उधळत आहे.

याबाबत पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.कामेश टावरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तालुक्यातील निमगाव भोजापूरमध्ये कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना काहीजण रुग्णांवर थेट उपचार करीत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्याची शहनिशा करण्यासाठी त्यांनी गेल्या शनिवारी (ता.4) आरोग्यसेवक अरविंद काळे व आरोग्य साहाय्यक अर्जुन मंडलीक यांच्यासह निमगाव भोजापूरमधील ‘साईलीला रिहॅबीलेटेशन सेंटर’ या ठिकाणावर छापा घातला. त्यावेळी सदरील ठिकाणी कोणताही डॉक्टर हजर नव्हता, मात्र डॉ.प्रवीण कवडे यांच्या नावाने तेथे आंतररुग्ण व बाह्यरुग्ण विभाग सुरु असल्याचे व तेथे मुदत संपलेल्या औषधांचा साठाही पथकाला दिसला. विशेष म्हणजे याच ठिकाणी मुन्नाभाई शैलेश कडलग याच्या बाह्यविभागाचा (ओपीडी) फलक असल्याचे व त्यावर त्याच्या नावापुढे ‘डॉक्टर‘ अशी उपाधी लावल्याचेही पथकाला दिसले.

सदरील आंतररुग्ण व बाह्यरुग्ण विभागात पथकाला रुग्ण नोंदवही अथवा डॉक्टरांच्या चिठ्ठ्या (प्रिस्क्रिप्शन) आढळल्या नाहीत, मात्र आतील बाजूस एक रुग्ण उपचारार्थ दाखल असल्याचे व तेथील महिला कर्मचारी त्याच्यावर सलाईन लावण्यासह अन्य उपचार करीत असल्याचे चित्र मात्र बघायला मिळाले. त्याचवेळी सदर ठिकाणी मुन्नाभाईचा प्रवेश झाला असता चौकशी पथकाने त्याला त्याची ओळख विचारली. त्याने आपले नाव ‘शैलेश किसनराव कडलग’ असे सांगितल्यानंतर बाह्यरुग्ण विभागाचा फलक याच महाशयांच्या नावाने असल्याची खात्री पथकाला पटली. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे वैद्यकीय व्यावसायिक असल्याची कागदपत्रे मागितली असता या बोगस मुन्नाभाईने चक्क ‘महाराष्ट्र कौंसिल ऑफ अॅक्यूपंक्चर’चे प्रमाणपत्र दाखवले.

त्यातून तो बोगस असल्याचे स्पष्ट झाल्याने पथकाने त्याच्यासह त्याच्या घरावर छापा घातला. यावेळी त्याच्या घरातून अॅलोपॅथी उपचारासाठी वापरली जाणारी विविध औषधे, इंजेक्शन, गोळ्या व सिरपचा मोठा साठा आढळला. या सर्वांचा पंचासमक्ष पंचनामा करुन वैद्यकीय पथकाने सदरचा मुद्देमाल जप्त करीत त्याच दिवशी रात्री उशिराने वैद्यकीय उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही आर्हता नसतानाही ‘सूचीवेध चिकित्सा’ अभ्यासक्रमाच्या प्रमाणपत्रावर शैलेश किसनराव कडलग हा मुन्नाभाई स्वतःला डॉक्टर भासवून रुग्णांवर अॅलोपॅथी पद्धतीचे उपचार करीत असल्याबद्दल व आंतररुग्ण विभाग चालवण्याची परवानगी नसतानाही तो चालवल्याबद्दल डॉ.प्रवीण गंगाधर कवडे या दोघांवर वैद्यकीय व्यवसायी अधिनियमाच्या कलम 33, राष्ट्रीय चिकित्सा आयोग अधिनियमाच्या कलम 35 व मुंबई सुश्रुषा गृह नोंदणी अधिनियमाच्या कलम 15 प्रमाणे गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.

मागील आठवड्यातच तालुक्यातील निमोण येथे थेट छत्रपती संभाजीनगरमधून येवून कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना अनेक रुग्णांवर उपचार करणार्या वसंत सांडू लांडगे या बोगस डॉक्टरसह त्याच्या तिघा साथीदारांवर अशाचप्रकारची कारवाई झाली होती. त्या प्रकरणातही निसर्गोपचाराचा कोर्स करुन मिळवलेल्या प्रमाणपत्राचा वापर करुन चक्क आर्हता नसतानाही रुग्णांवर उपचार करणार्या टोळीचा पर्दाफार्श झाला होता, त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत विधानभवनाच्या सुरक्षा व्यवस्थेलाच आव्हान देत अवघ्या राज्यात चर्चेत आलेल्या दत्तात्रय केशव गुंजाळ याच्या निमगाव भोजापूरमधूनही एका बोगस डॉक्टरवर दुसर्यांदा कारवाई करण्यासह बेकायदा दवाखान्याचाही (आंतररुग्ण विभाग) भंडाफोड झाल्याने संगमनेरच्या आरोग्य विभागातील अनागोंदी आता चव्हाट्यावर आली असून नियुक्तिपासून निलंबनापर्यंत तब्बल 25 वर्ष एकाच तालुक्यात ठाण मांडून पदोन्नती घेणार्या निलंबित तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश घोलप यांचा आणखी एक प्रताप उघड झाला आहे.

महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 च्या कलम 33 प्रमाणे आवश्यक नोंदणी नसताना वैद्यकीय व्यवसाय करताना पहिल्यांदा कारवाई झाल्यास त्याला 2 ते 5 वर्षांचा कारावास आणि अडीच ते दहा हजार रुपयांचा दंड होवू शकतो. तर, त्याच व्यक्तिकडून पुन्हा या कायद्याचे उल्लंघन झाल्यास, म्हणजे तशाच प्रकारची कारवाई दुसर्यांदा झाल्यास आरोपीला 10 वर्षांची शिक्षा आणि आर्थिक दंडाची स्पष्ट तरतूद आहे. शिवाय राज्य सरकारने या कायद्यात सुधारणा करुन अशाप्रकारच्या गुन्ह्यांना ‘दखलपात्र’ आणि ‘अजामिनपात्र’ श्रेणीत समावीष्ट केले आहे. त्यामुळे निमगाव भोजापूर प्रकरणातील ‘मुन्नाभाई’ शैलेश किसनराव कडलग याला गुन्हा दाखल होताच तालुका पोलिसांकडून अटक होण्याची गरज होती. मात्र 25 वर्ष एकाच तालुक्यात ठाण मांडून तालुका वैद्यकीय अधिकारी झालेल्या आणि आपल्या असंख्य भ्रष्टाचारी उद्योगातून अखेर निलंबन झालेल्या डॉ.सुरेश घोलप यांच्या पावलावर पाऊल ठेवीत दीड दशकांपूर्वी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा अनुभव घेणारे विद्यमान तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी मात्र राज्य सरकारच्या या प्रयत्नांना फाट्यावर मारले असून कारवाईनंतरही पुन्हा गुन्हा करण्यास धजावणार्या मुन्नाभाईला चक्क ‘सर्वोच्च’च्या तरतुदींचा दाखला देत अटकेपासून संरक्षण दिले आहे. त्यांची ही कृती सध्या चर्चेत आली असून त्यातून तालुका पोलीस ठाण्यातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

