‘राजकीय वनवास’ संपणार की ‘हिंदुत्वा’च्या उंबरठ्यावरच अडकणार? भाजप प्रवेशासाठी सत्यजीत तांबेंचा ‘जय श्रीराम’; भूतकाळातील ‘तो’ डाग पुसण्याचाही प्रयत्न..


श्याम तिवारी, संगमनेर
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या मुशीत घडलेले आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय छायेत मोठे झालेले नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे सध्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि निर्णायक वळणावर उभे आहेत. गेल्या पंचवीस वर्षांपासून काँग्रेसच्या विचारसरणीचा डोस पाजणारे तांबे आज चक्क ‘हिंदुत्वा’च्या लाटेवर स्वार होताना दिसत आहेत. काल संगमनेरात पार पडलेल्या श्रीराम नवमीच्या मिरवणुकीत त्यांनी घेतलेला सहभाग आणि चक्क बजरंग दलाचा ध्वज हाती घेऊन केलेले नृत्य, केवळ भक्तीचे प्रतीक नसून, त्यामागे दडलेली राजकीय महत्त्वाकांक्षा आता उघड झाली आहे. आपल्या मामांपासून निर्माण झालेले वैचारिक अंतर कमी करण्याऐवजी, त्यांनी आता हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या जवळ जाण्यासाठी कंबर कसली आहे.


आमदार सत्यजीत तांबे यांचा गेल्या तीन वर्षांचा प्रवास पाहिला तर त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काँग्रेसपासून स्वतःला दूर नेले आहे. विधानसभेत बाळासाहेब थोरात यांचा अनपेक्षित पराभव झाल्यानंतर, संगमनेर नगरपालिकेतील साडेतीन दशकांची सत्ता टिकवण्यासाठी त्यांनी काँग्रेसचे नाव आणि चिन्हाचा त्याग केला. त्यांचे हे धाडस केवळ स्थानिक राजकारणासाठी नव्हते, तर ते भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे आपली ‘उपयुक्तता’ सिद्ध करण्यासाठी होते. नगरपालिकेच्या निकालानंतर घवघवीत यश मिळालेले असतानाही, तांबेंनी नूतन नगरसेवकांना घेऊन काँग्रेसच्या मुख्यालयाकडे न जाता थेट विधानभवनाची पायरी चढणे पसंत केले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेली गुप्तगु आणि भाजप नेते विनोद तावडे यांच्याशी झालेली कथित ‘गुप्त खलबतं’ तांबे यांच्या भविष्यातील राजकीय दिशा स्पष्ट करणारी होती.


पदवीधरच्या निवडणुकीनंतर गेल्या तीन वर्षांत आमदार सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसच्या एकाही अधिकृत कार्यक्रमाला हजेरी लावलेली नाही किंवा एकाही बड्या नेत्याची भेटही घेतलेली नाही. याउलट, त्यांनी महायुतीमधील नेत्यांशी जवळीक वाढवण्यावर अधिक भर दिला. मात्र, त्यांचा भाजप प्रवेश अद्यापही ‘प्रतीक्षेत’ आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला काळे फासण्याची केलेली कृती. ती घटना भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मनात आजही जिवंत आहे. गेल्या आठवड्यात भाजपच्या वरिष्ठ प्रतिनिधींनी स्थानिक पातळीवर घेतलेल्या आढावा बैठकीतही कार्यकर्त्यांनी तांबेंच्या प्रवेशाला कडाडून विरोध दर्शवला होता अशी चर्चा आहे. हीच नाराजी दूर करण्यासाठी आता त्यांनी ‘मी देखील कट्टर हिंदू आहे’ हे ओरडून सांगण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.


एकेकाळी सत्यजीत तांबे यांच्याकडे बाळासाहेब थोरात यांचे राजकीय वारसदार म्हणून पाहिले जात असे. मात्र, थोरातांनी आपली कन्या डॉ.जयश्री थोरात यांना सक्रिय राजकारणात उतरवल्याने तांबेंना स्वतःचा वेगळा रस्ता शोधावा लागला. याच कारणास्तव त्यांनी भाजपच्या धोरणांवर थेट टीका करणे टाळले असून, राज्य व केंद्र सरकारच्या योजनांचे समर्थन करण्यास सुरुवात केली आहे. कालच्या मिरवणुकीत चक्क सय्यदबाबा चौकात भगवा ध्वज हाती घेऊन त्यांनी केलेले नृत्य हे त्यांच्या या ‘मेकओव्हर’चाच भाग आहे. मात्र, इतके प्रयत्न करुनही भाजपच्या अंतर्गत गोटातून मिळणारी मूक संमती आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा उघड विरोध, यात तांबेंची मोठी कोंडी झाली आहे.


आमदार सत्यजीत तांबे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करण्याची तीव्र इच्छा असल्याचे त्यांच्या प्रत्येक कृतीतून स्पष्ट होते. मात्र, ‘काँग्रेसची प्रतिमा’ पुसून काढण्याचा त्यांचा हा प्रयत्न आजही यशस्वी झालेला नाही, हे वास्तव आहे. श्रीराम नवमीचा मुहूर्त साधून त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला खरा, पण यामुळे भाजपमधील निष्ठावंतांचे मन वळवण्यात त्यांना यश मिळणार का? की हा केवळ सत्तेसाठी केलेला एक तात्पुरता बदल म्हणून पाहिला जाईल? हे येणारा काळच सांगेल. मात्र, तांबे यांच्या या प्रवासाने संगमनेरच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे, हे मात्र निश्चित.


आमदार सत्यजीत तांबे सध्या एका अशा त्रिशंकू अवस्थेत आहेत, जिथे मागे वळून पाहण्याची सोय नाही आणि पुढे जाणारा मार्ग काट्याकुट्यांचा आहे. नगरपालिकेतील सत्तेसाठी पक्षाचा त्याग करणे आणि निकालानंतर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी हजेरी लावणे, यातून त्यांची सत्तेची ओढ स्पष्ट झाली आहे. मात्र, भाजपमधील ‘निष्ठावंतांची फळी’ आजही त्यांच्या विरोधात ठाम आहे. श्रीराम नवमीच्या मिरवणुकीत त्यांनी चढवलेला ‘हिंदुत्वाचा रंग’ त्यांना सत्तेच्या खुर्चीपर्यंत नेणार की हा प्रवास ‘अपक्ष’ म्हणूनच संपणार, याची चर्चा आता संपूर्ण राज्यात रंगली आहे.

Visits: 5 Today: 5 Total: 1618444

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *