अहिल्यानगर बनणार देशाच्या संरक्षण साहित्य निर्मितीचे ‘हब’! क्षेपणास्त्र प्रक्षेपक प्रकल्पाची चाचपणी; एक हजार एकर जागेची मागणी..

नायक वृत्तसेवा, अहिल्यानगर
संरक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात देशातील अग्रगण्य संस्था असलेल्या ‘संरक्षण संशोधन व विकास संस्थेने’ (डीआरडीओ) आता अहिल्यानगर जिल्ह्यात आपले पाय अधिक घट्ट रोवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील राहुरी आणि श्रीगोंदा यासारख्या मोक्याच्या ठिकाणी डीआरडीओने क्षेपणास्त्र प्रक्षेपक निर्मितीच्या प्रकल्पासाठी तब्बल एक हजार एकर जागेची मागणी केली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती देताना, अहिल्यानगर जिल्हा भविष्यात ‘संरक्षण साहित्य निर्मितीचे हब’ म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास व्यक्त केला. या प्रकल्पामुळे जिल्ह्यात औद्योगिक विकासाचा सुवर्णकाळ अवतरण्याची चिन्हे आहेत.

अहिल्यानगरमधील एका खासगी कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना पालकमंत्री विखे-पाटील यांनी देशाच्या संरक्षण संशोधन व विकास संस्थेने शिर्डी पाठोपाठ आता राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मालकीची एक हजार एकर जमिनीची मागणी केली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी गणेश राठोड यांनी या जागेची प्राथमिक पाहणी पूर्ण केली असून, त्यासंदर्भातील कागदपत्रांची मागणी करणारे अधिकृत पत्र विद्यापीठ प्रशासनाला पाठवण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या गांभीर्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतही सविस्तर चर्चा झाली असून, शासनस्तरावर कृषी विद्यापीठाची जागा मिळवण्यासाठी कोणतीही अडचण नसल्याचेही त्यांनी सांगितले.

मात्र, राहुरी कृषी विद्यापीठाची जागा मिळवण्यात अडचणी निर्माण झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील सहाशे एकर जागेचा प्रस्तावही विचाराधीन ठेवण्यात आला आहे. बेलवंडीतील ही जागा रेल्वे मार्गालगत असल्याने लॉजिस्टिक आणि वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत सोयीची आहे, त्यामुळे डीआरडीओच्या या महत्त्वकांक्षी प्रकल्पासाठी या जागेचाही विचार होवू शकतो असेही पालकमंत्र्यांनी ‘असोसिएशन ऑफ अहमदनगर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज’च्या बैठकीत बोलताना सांगितले, या बैठकीतच त्यांनी एमआयडीसीच्या अधिकार्यांना बेलवंडीच्या जागेबाबत डीआरडीओशी समन्वय साधण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी बोलताना पालकमंत्री विखे-पाटील यांनी आपल्या कार्यकाळात जिल्ह्यात केवळ प्रस्तावांचे वारे वाहत नसून, प्रत्यक्ष कृतीलाही सुरुवात झाल्याची कोपरखळी हाणताना संरक्षण साहित्य सामग्रीचा जिल्ह्यातील पहिला मोठा प्रकल्प शिर्डी येथे पूर्णत्वास आल्याचे व येत्या महाराष्ट्र दिनी (ता.1 मे) देशाच्या संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. याशिवाय, अहिल्यानगर शहराजवळील नागापूर औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांनी आपल्या विस्तारीकरणासाठी सहाशे एकर जागेची मागणी केली आहे. सदरील वाढीव जागेचा विषय सध्या न्यायप्रविष्ट असला तरी स्थानिक उद्योगांची वाढती भूक लक्षात घेता जिल्ह्याला मोठ्या औद्योगिक विस्ताराची गरज असल्याचे अधोरेखित होत असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जिल्ह्यात संरक्षण साहित्य निर्मिती प्रकल्पांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा दाखला देत पालकमंत्री विखे-पाटील यांनी अहिल्यानगरचा संरक्षण क्षेत्राशी असलेला संबंध दशकांचा असल्याचे सांगितले. ‘वाहन संशोधन व विकास केंद्र’ आणि केव्हलरी टँक म्युझियम यामुळे आपल्या जिल्ह्याची ओळख लष्करी शहर म्हणून यापूर्वीच निर्माण झाल्याकडेही त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. सध्या आपला जिल्हा कृषी आणि उद्योग यांच्या संगमावर उभा आहे. शिर्डी येथील प्रकल्पाचे उद्घाटन आणि डीआरडीओने नव्याने केलेली एक हजार एकर जागेची मागणी यातून प्रशासकीय इच्छाशक्ती आणि भौगोलिक अनुकूलता यांचा सुरेख मेळ बसत असल्याचेही मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले.

आगामी दशकात अहिल्यानगर जिल्हा केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे ‘डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब’ म्हणून उदयास येईल. क्षेपणास्त्र प्रक्षेपक प्रकल्पांमुळे हजारो प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच, अद्ययावत तंत्रज्ञानामुळे स्थानिक उद्योगांनाही जागतिक दर्जाच्या निविदांमध्ये सहभाग घेण्याची संधी मिळेल. सध्या सुरु असलेली औद्योगिक प्रगती जिल्ह्याच्या आर्थिक आणि सामाजिक रचनेत अमुलाग्र बदल घडवणारी ठरेल असे चित्र डीआरडीओच्या एक हजार एकर जागेच्या मागणीतून उभे राहीले आहे.

