संगमनेर तालुक्यात बालविवाहाचा पर्दाफाश! डिजिटल युगातील सामाजिक कलंक; नवरदेवासह सहा जणांवर गुन्हा दाखल..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकीकडे आपण एकविसाव्या शतकात डिजिटल क्रांतीच्या गप्पा मारत आहोत, तर दुसरीकडे ग्रामीण भागात अद्यापही ‘बालविवाह’ नावाचा सामाजिक कलंक पुसला गेला नसल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागात अवघ्या 14 वर्षीय बालिकेचा विवाह लावून तिचे बालपण करपवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी घारगाव पोलिसांनी मोठी आणि धाडसी कारवाई केली आहे. या प्रकरणात नवरदेव, मुलीचे आई-वडील, सासू-सासरे आणि मामा अशा एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, यामुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे बालविवाह हा केवळ घरगुती विषय नसून तो एक गंभीर फौजदारी गुन्हा आहे, असा कठोर संदेश प्रशासनाने दिला आहे.


सदरची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील पठार भागात असलेल्या एका गावात गेल्या 5 मार्च रोजी घडली होती. एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह गुपचूप आणि अत्यंत साध्या पद्धतीने लावून देण्यात आला होता. मात्र, या अनिष्ट प्रथेची माहिती मिळताच अहिल्यानगर येथील ‘स्नेहालय’ संस्थेच्या ‘उडान’ प्रकल्पाने तातडीने सूत्रे हलवली. स्थानिक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, ग्रामपंचायत प्रशासन आणि अंगणवाडी सेविकांच्या मदतीने गुप्तपणे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली.


गावचे पोलीस पाटील आणि स्थानिक बाल संरक्षण समितीने या प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावली. चौकशीदरम्यान मुलीचे वय लग्नासाठी कायदेशीररीत्या अपात्र असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कोणत्याही दबावाला बळी न पडता, स्नेहालयच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनाने घारगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन सरकारी फिर्याद नोंदवली. विशेष म्हणजे, पीडित मुलीची ओळख गोपनीय राखून ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.


या प्रकरणाचा तपास सुरु असताना तपास यंत्रणा आणि तक्रारदार अधिकार्‍यांवर विविध माध्यमातून राजकीय व सामाजिक दबाव टाकण्याचे प्रयत्न झाले. बालविवाहाची जुनी परंपरा असल्याचे सांगून प्रकरण दडपण्याचाही प्रयत्न झाला, परंतु प्रशासकीय अधिकार्‍यांनी कायद्याची अंमलबजावणी करण्यास प्राधान्य दिले. घारगाव पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या कलम 9, 10 आणि 11 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र, ही कारवाई इथेच थांबणारी नाही. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने, या प्रकरणाच्या पुढील तपासात ‘पॉक्सो’ कायद्याची कलमे लावण्यात येण्याची दाट शक्यता आहे. जर पॉक्सोतंर्गत कारवाई झाली, तर संबंधित आरोपींच्या अडचणीत मोठी वाढ होणार असून त्यांना कठोर कारावासाची शिक्षा होऊ शकते. या कारवाईने बालविवाहात सहभागी होणारे भटजी, आचारी, वाजंत्री आणि नातेवाईक या सर्वांनाच आता कायद्याचा सामना करावा लागणार आहे.

Visits: 2 Today: 2 Total: 1608019

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *