यंदाची कवी अनंत फंदी व्याख्यानमाला ‘ऑनलाईन’ श्रवण्याची संधी! तीन दिवसीय व्याख्यानमालेत राज्यातील दिग्गज साहित्यिकांची लाभणार उपस्थिती

नायक वृत्तसेवा, संगमनेर
42 वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या संगमनेरच्या वैचारिक चळवळीला यंदा कोविडचे ग्रहण लागले खरे, मात्र त्यावर प्रभावी पर्याय शोधीत आयोजकांनी विचारांचे आदान-प्रदान करणारी व्याख्यानांची ही श्रृंखला अव्याहत राखण्याचाच चंग बांधला आहे. त्यामुळे ‘बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको..’ असा अजरामर फटका लिहून इतिहासाच्या पानांत अमर झालेल्या कवी अनंत फंदींच्या नावाने सुरु झालेला विचारांचा हा वसा यंदाही संगमनेरकर रसिकांना विचारमुग्ध करणारा ठरणार आहे. येत्या 3 ते 5 डिसेंबर या कालावधीत ‘ऑनलाईन’ प्रणालीद्वारा राज्यातील तीन दिग्गज साहित्यिक संगमनेरकर रसिकांवर विचारांच्या सुवर्ण शब्दांची उधळण करणार आहेत, सालाबादप्रमाणे यंदाही सादर होणार्‍या या वैचारिक चळवळीत संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन आयोजनकर्त्या कवी अनंत फंदी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अ‍ॅड.ज्योती मालपाणी यांनी केले आहे.

संगमनेर शहराला पौराणिक, ऐतिहासिक संदर्भांसह प्रगल्भ साहित्यिक वारसाही लाभला आहे. दुसर्‍या बाजीरावांचे दरबारी असलेल्या कवी अनंत फंदी यांची कवणं तर संसारी माणसाला घराच्या चौकटीची मर्यादा सांगणारे फटके म्हणूनच नावारुपाला आले आणि इतिहासाच्या पानात अजरामर झाले. हा समृद्ध वारसा पुढे नेण्याच्या विचारातून 1977 साली कवी अंनत फंदी प्रतिष्ठानच्या माध्यमातून संगमनेरात वैचारिक चळवळीची बीजं रोवली गेली. आज या चळवळीला 43 वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र यंदा कोविड महामारीने जगाला एकत्र येण्यापासून रोखल्याने या वैचारिक परंपरेत यंदा खंड पडण्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. मात्र अशा अडथळ्यांमध्ये अडकेल तो कवी अनंत फंदींच्या विचारांचा पाईक कसा?


त्यामुळे 42 वर्षांची अखंड परंपरा लाभलेली संगमनेरची ‘कवी अनंत फंदी व्याख्यानमाला’ यंदा ऑनलाईन घेण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आणि त्याला राज्यातील तिघा दिग्गज साहित्यिकांनी होकार देत प्रतिसादही दिला. खरेतर मराठीतील आद्य कवी समजल्या जाणार्‍या अनंत फंदींच्या नावाने होणार्‍या या व्याख्यानमालेचे आमंत्रण मिळणं हे राज्याच्या साहित्यिकांमध्ये अत्यंत सन्मानाचे प्रतीक समजले जाते. गेल्या चार दशकांमध्ये एकाहून एक दिग्गजांची हजेरी आणि त्यांनी केलेली विचारांची उधळण हेच सांगून जाते. यावर्षीही हा शब्दरुपी अनुभव संगमनेरकरांना मिळणार आहे, मात्र त्याचे स्वरुप वेगळे असेल.

येत्या गुरुवारी (ता.3) या ऐतिहासिक चळवळीचे पहिले पुष्प अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.अरुणा ढेरे गुंफणार आहेत. कथा, कविता, कांदबरी, ललित साहित्य, लोकसाहित्य, सामाजिक, इतिहासपर, कुमार व किशोरवयीन लेखण, अनुवाद आणि समिक्षा अशा सगळ्याच क्षेत्रात त्यांनी प्रचंड लिखाण केले आहे. त्यांचे तिसाहून अधिक वैचारिक ग्रंथ, अकराहून अधिक कविता संग्रह व बारा कथासंग्रह आजवर प्रकाशित झाले असून ‘विस्मृती चित्रे’ हा त्यांचा अत्यंत गाजलेला ग्रंथ ठरला आहे. विचारांचा समृद्ध वारसा लाभलेल्या या ज्येष्ठ साहित्यिकेला श्रवण करण्याची संधी संगमनेरकर रसिकांना मिळणार आहे.

शुक्रवारी (ता.4) ज्येष्ठ पत्रकार दिवाकर देशपांडे संगमनेरकरांना विचारमुग्ध करणार आहेत. गेल्या चार दशकांपासून भारतीय संरक्षण दलांविषयी विपूल लिखाण केलेले साहित्यिक म्हणूनही त्यांची वेगळी आणि ठळक ओळख आहे. सद्यस्थितीत लडाख आणि पेंग्वॉन तलावावरुन चीनसोबत ताणलेल्या संबंधावर प्रकाश टाकण्यासोबतच चीन्यांचे आव्हान कसे पेलायचे यावर ते भाष्य करणार आहेत.

शनिवारी (ता.5) व्याख्यानमालेचा समारोप प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक देशपांडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ व ‘नेकजात मराठा’ या नाटकातून मराठी रंगभूमीवर बालकलाकार म्हणून पाऊल ठेवणार्‍या देशपांडे यांनी नितीन मंत्री यांच्या ‘निशमा’ या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून कलाक्षेत्रात पाऊल ठेवले. सध्या सोनी वाहिनीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेचेे दिग्दर्शन ते करीत आहेत.

दादा कोंडके यांचा ‘ह्योच नवरा पाहिजे’ व जब्बार पटेल यांच्या ‘उंबरठा’, ‘सुभा’ व ‘मुसाफिर’ या चित्रपटांचे त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. 1996 सालापासून विनय आपटेंसह त्यांनी दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांसाठी दिग्दर्शन सुरु केले. ‘आभाळमाया’, ‘ऋणानुबंध’, ‘बंधन’, ‘क्राईम डायरी’, ‘जय मल्हार’, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’, ‘एक संधी अजूनी’, ‘कहानी घर घर की’ आणि ‘क्यो की सांस भी कभी बहु थी’ या त्यांच्या काही गाजलेल्या मालिका आहेत. एक प्रयोगशील आणि कल्पक दिग्दर्शक म्हणून राज्याला परिचित असलेल्या या ज्येष्ठ दिग्दर्शकाचा गेल्या चाडेचार दशकांचा प्रवास अनुभवण्याची संधी संगमनेरकरांना मिळणार आहे.


‘कवी अनंत फंदी प्रतिष्ठान’च्या फेसबुक पेजवरुन व झुम अ‍ॅपवरुन या तीन दिवसीय व्याख्यानमालेचा आनंद संगमनेरकरांना घेता येणार आहे. अधिकाधिक श्रोत्यांनी 3 ते 5 डिसेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी 7 ते 9 ही वेळ या ऐतिहासिक व्याख्यानमालेसाठी राखून ठेवावी असे आवाहन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अ‍ॅड. ज्योती मालपाणी, उपाध्यक्ष प्रा.ओंंकार बिहाणी, सचिव अरुण ताजणे, खजिनदार ओमप्रकाश आसावा, सहसचिव पापय्या सिरसुल्ला, कार्यकारी सदस्य प्रदीप मालाणी, सुनील चांडक व सदस्यांनी केले आहे.

सुमारे साडेचार दशकांची प्रगल्भ परंपरा लाभलेल्या ‘कवी अनंत फंदी व्याख्यान मालेवर’ यंदा कोविडचे सावट आहे. मात्र विचारांची ही चळवळ अव्याहत रहावी, संगमनेरकर रसिकांची विचारांची भूक शमविता यावी यासाठी प्रतिष्ठानने रसिकांसाठी ‘ऑनलाईन’ची व्यवस्था केली आहे. यंदा सात दिवसांऐवजी तीन दिवस होणार्‍या या व्याख्यानमालेतून राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ पत्रकार आणि ज्येष्ठ दिग्दर्शकांना ऐकण्याची सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे.

Visits: 16 Today: 1 Total: 118890

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *