लग्न समारंभांना शंभर तर अंत्यविधीला पन्नास लोकांच्या उपस्थितीची परवानगी..! अहमदनगर जिल्ह्यात उद्यापासून काय सुरू आणि काय बंद राहणार याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत अहमदनगर जिल्ह्याचा राज्यातील प्रादुर्भाव कमी असलेल्या दहा जिल्ह्यात समावेश झाल्यानंतर गेल्या प्रदीर्घ काळापासून बंद असलेली दुकाने सोमवारपासून खुली होणार आहेत. राज्य शासनाने याबाबत शनिवारी आदेश काढले होते. त्यानंतर आज अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील कोविड स्थिती लक्षात घेता सोमवारपासून कोणत्या गोष्टी सुरू ठेवण्यास परवानगी आहे व त्यासाठी कोणते नियम आहेत याबाबत आदेश काढले आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सीजन खाटांच्या संख्येने मर्यादा ओलांडल्यास जिल्ह्याला पुन्हा कठोर निर्बंधांचा पुन्हा सामना करावा लागू शकतो असा इशाराही या आदेशातून देण्यात आला आहे.

आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. या बैठकीत राज्य शासनाने ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत राज्यातील ज्या जिल्ह्यातील रुग्ण समोर येण्याची टक्केवारी पाच पेक्षा कमी असेल तसेच, जिल्ह्यातील एकूण ऑक्सिजन खाटां पैकी 25 टक्क्याहून कमी खाटांवर रुग्ण असतील अशा जिल्ह्यांचा समावेश पहिल्या श्रेणीत करून तेथील सर्व व्यवहार सोमवारपासून खुले करण्याचा निर्णय घेतला होता. 3 जून रोजी संपलेल्या आठवड्यात अहमदनगर जिल्ह्याचा रुग्ण समोर येण्याचा सरासरी दर 4.5 टक्के इतका तर जिल्ह्यातील एकूण ऑक्सिजन खाटां पैकी 24.48 टक्के खाटांवर रुग्ण असल्याने जिल्ह्याचा समावेशही राज्यातील पहिल्या श्रेणीतील दहा जिल्ह्यांमध्ये झाला. त्यामुळे उद्यापासून जिल्ह्यातील बहुतेक सर्व व्यवहार सुरू होणार आहेत.

त्याबाबत अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आज काढलेल्या आदेशानुसार उद्या सोमवार (ता.7) पासून पुढील आदेश प्राप्त होईस्तोवर अहमदनगर जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यात अत्यावश्यक वस्तूंशी संबंधित सर्व दुकाने व आस्थापना तसेच बिगर अत्यावश्यक वस्तूंशी निगडित सर्व प्रकारची दुकाने व आस्थापना, मल्टीप्लेक्स तसेच सिंगल स्क्रीन असलेल्या चित्रपटगृहांसह शॉपिंग मॉल्स व नाट्यगृह एकूण क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेवर नियमित वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच सर्व रेस्टॉरंट्स, सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, जॉगिंग पार्क आदींवरील वावरही खुला करण्यात आला आहे.
यापूर्वी 15 टक्के क्षमतेवर सुरू असलेली सर्व शासकीय व खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यास सूट देण्यात आली आहे. क्रीडाविषयक क्रियाकल्प, सर्व प्रकारचे चित्रीकरण, बंदिस्त असलेल्या सभागृहांमध्ये आसन क्षमतेच्या 50 टक्के किंवा एकूण शंभर व्यक्ती यापैकी जे कमी असेल त्याला परवानगी दिली जाईल. यापूर्वी या आदेशानुसार जिल्ह्यात विवाह समारंभांना पूर्णतः बंदी घालण्यात आली होती. विवाह सोहळ्यासह अंत्यविधीच्या उपस्थितीवरील निर्बंधही काही प्रमाणात शिथिल करण्यात आले असून यापुढे जास्तीत जास्त पन्नास लोकांच्या उपस्थितीत अंत्यविधी करता येणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यांच्या सर्वसाधारण सभा तसेच, निवडणुकांना यापुढे निर्बंध असणार नाहीत. यापूर्वी निवासी मजूर नसलेल्या बांधकामांना थांबविण्यात आले होते. उद्यापासून मात्र ही सर्व कामे सुरळीतपणे सुरू ठेवता येणार आहेत. याबरोबरच कृषी विषयक सर्व क्रियाकल्प, वस्तू व सेवांचे ई-कॉमर्स व्यवहार सुरू राहतील. व्यायाम शाळा, सलूनची दुकाने, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर आदींना नियमित वेळेत सुरू ठेवता येईल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोणत्याही निर्बंध शिवाय सुरू राहील. सर्व प्रकारची कार्गो वाहतूक चालकासह जास्तीत जास्त तीन व्यक्तींसह सुरू ठेवता येईल. खासगी कार, टॅक्सी, बस अथवा दीर्घ पल्ल्याच्या रेल्वे याद्वारे आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीस मुभा असेल. तथा कोविड निर्बंधस्तर पाच मधील क्षेत्रातून सुटणाऱ्या किंवा अशा क्षेत्रात थांबा असणाऱ्या वाहतुकीदरम्यान सर्व प्रवाशांकडे ई-पास असणे बंधनकारक असेल. यासोबतच सर्व प्रकारची औद्योगिक केंद्रे त्यांच्या नियमित वेळेनुसार सुरू ठेवण्यासही या आदेशान्वये परवानगी देण्यात आली आहे.

या आदेशान्वये सुरू करण्यात आलेल्या सर्व ठिकाणी कोविडचे नियम पालन करणे बंधनकारक असेल. याबाबतच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासंबंधी जबाबदारी प्राधिकारी, स्थानिक प्राधिकारी, पोलीस विभाग व परिवहन विभागाची राहील. शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांची राहील. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा द्वारा उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी कोविड पॉझिटिव्हिटी रेट व ऑक्सीजन बेड वरील रुग्णांचे एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड असलेले प्रमाण याबाबतचा आढावा घेऊन, शासनाकडून वेळोवेळी प्राप्त निर्देशांनुसार या आदेशामध्ये आवश्यक ते बदल केले जातील. या आदेशामध्ये नमूद नसलेल्या इतर बाबीं बाबत यापूर्वीचे आदेश कायम राहतील. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर स्वतंत्ररित्या आदेश निर्गमित करण्यात येतील असेही यात म्हटले आहे.

Visits: 196 Today: 2 Total: 1112110
