भोंदू खरातबाबाचे ‘काळे साम्राज्य’ आता संगमनेरच्या वेशीवर! लेकीच्या नावे कोट्यवधींचा भूखंड; ‘त्या’ बड्या मध्यस्थाचा शोध सुरु..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
काळ्या विद्येचा अघोरी खेळ, उच्चभ्रू महिलांचे लैंगिक शोषण आणि चिंचोके-मधाच्या नावाखाली कोट्यवधींची लूट करणार्‍या अशोककुमार एकनाथ खरात या भोंदूबाबाच्या पापाचा घडा आता भरला आहे. अहिल्यानगर पोलिसांनी उघडकीस आणलेल्या या प्रकरणाचे धागेदोरे आता संगमनेरपर्यंत येऊन पोहोचले आहेत. संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी शिवारात या भोंदूने आपल्या मुलीच्या नावे तब्बल 17 गुंठे जागा खरेदी केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, या व्यवहारामागील ‘पांढरपेशा’ मध्यस्थ कोण? याची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे.


काही दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात या प्रकरणाची माहिती देताना संगमनेरमधील 11 गुंठे जागेचा उल्लेख केला होता. मात्र, दैनिक नायकच्या हाती आलेल्या अधिकृत सातबार्‍याने या माहितीतील तफावत उघड केली आहे. भोंदू खरातची मुलगी श्रृष्टी अशोककुमार खरात हिच्या नावावर गुंजाळवाडी शिवारात प्रत्यक्षात 17 गुंठे क्षेत्राचा उतारा निघाल्याने खळबळ उडाली आहे. पेनाने लिहिलेला ‘17’ हा आकडा वाचताना प्रशासकीय स्तरावर कदाचित ‘11’ असा समज झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत असली तरी, प्रत्यक्षात मात्र ही मालमत्ता अधिक मोठी आहे.


हा भूखंड संगमनेरमधील अत्यंत उच्चभ्रू समजल्या जाणार्‍या गणेशनगर परिसराजवळ, ऐश्वर्या पेट्रोल पंपाच्या अगदी पाठीमागे आहे. आजच्या बाजारभावानुसार या 17 गुंठे जागेची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. श्रीकिसन राधाकिसन मणियार आणि इतरांकडून ही जागा खरेदी करण्यात आली आहे. नाशिकच्या एका भोंदूला संगमनेरमधील इतकी मोक्याची जागा शोधून देणारा आणि हा व्यवहार पूर्णत्वास नेणारा तो ‘बडा एजंट’ कोण, या प्रश्नाने सध्या शहरात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.


या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा 18 फेब्रुवारी रोजी शिर्डीतील एका महिलेच्या तक्रारीनंतर झाला होता. नीरज जाधव नावाच्या व्यक्तीने भोंदू खरातसोबतचे ‘एआय’द्वारे बनवलेले बनावट व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन एका महिलेकडून खंडणी मागितली होती. पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता, एका साक्षीदाराने पोलिसांच्या हाती 8 महिलांचे 35 धक्कादायक व्हिडिओ सोपवले. तिथूनच खरातच्या वासनांध आणि भ्रष्ट साम्राज्याचा बुरखा फाटायला सुरुवात झाली.


भोंदू खरातने केवळ महिलांचे शारीरिक शोषणच केले नाही, तर ‘काळ्या विद्येचे’ भय दाखवून सर्वसामान्यांपासून बड्या राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनाच बेसुमार लुटले. त्याने आपल्या अघोरी मेंदूचा वापर करुन काचेचे साधे खडे, चिंचोके आणि गावठी मध यांना ‘चमत्कारी’ ठरवून भाबड्या भक्तांकडून लाखो रुपये उकळले. या लुटीच्या पैशातून त्याने नाशिकसह आसपासच्या जिल्ह्यांत शेकडो एकर शेतजमीन आणि व्यावसायिक मालमत्ताही खरेदी केल्या. विशेष तपास पथकाने आतापर्यंत त्याच्या 16 मालमत्तांचा शोध लावला असून, त्यात संगमनेरच्या गुंजाळवाडीतील या भूखंडाचाही समावेश आहे.


नाशिकच्या या भोंदूचे संगमनेर कनेक्शन उघड झाल्याने शहरात आश्चर्याचे वातावरण आहे. खरातच्या ‘काळ्या जादू’ला संगमनेरातील काहीजण बळी तर पडले नाहीत ना? किंवा कुणी राजकीय वरदहस्त तर त्याला लाभला नव्हता ना? अशा शंका आता उपस्थित केल्या जात आहेत. सोशल मीडियापासून ते पारावरच्या गप्पांपर्यंत सध्या या 17 गुंठ्यांच्या मालकिणीची आणि तिच्या भोंदू पित्याचीच चर्चा आहे. या प्रकरणातील ‘त्या’ मध्यस्थ दलालाचे नाव लवकरच समोर येण्याची शक्यता असून, पोलीस आता आर्थिक व्यवहारांच्या मुळाशी जात आहेत.


काळ्या विद्येसह जादुटोण्याच्या धाकाने भोंदूबाबा अशोककुमार एकनाथ खरात (वय 67) याने आजवर शेकडों महिलांचे लैंगिक शोषण केले असून तंत्र-मंत्राचा बाऊ करुन पाच-पन्नास रुपयांचे मूल्य असलेले काचेचे खडे, चक्क चिंचोके आणि मध भारलेले असामान्य असल्याचे भासवून भाविकांकडून त्याबदल्यात कोट्यवधी रुपये उकळल्याचे व त्यातून राज्यात विविध ठिकाणी शेकडों एकर जमिनी आणि मालमत्ता खरेदी केल्याचे आता उघड होत आहे. त्यात आता संगमनेरचाही समावेश झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून नाशिकच्या या भोंदूबाबाच्या चमत्काराला शहरातील कोणी बळी तर पडले नाही? अशा शंका उपस्थित होण्यासह या भोंदूला शहरातील मोक्याची 17 गुंठे जागा मिळवून देणारा ‘दलाल’ कोण? यावरुन सोशल माध्यमांसह पारावरच्या ओट्यांवर गप्पांचे फड रंगू लागले आहेत.

Visits: 8 Today: 8 Total: 1608012

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *