धरण व कालवे पूर्ण केले आता उर्वरित भागाला पाणी देण्यासाठी काम :  थोरात

नायक वृत्तसेवा, तळेगाव दिघे 
देवकौठे गावाने कष्टातून पोल्ट्री व्यवसाय व दूधातून मोठी आर्थिक संपन्नता निर्माण केली आहे. संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून प्रत्येक गावात व वाडी वस्तीवर आपण अनेक विकासाच्या योजना राबवल्या आहेत. निळवंडे धरण व कालव्यांसारखे ऐतिहासिक काम मार्गी लागले आता उर्वरित भागालाही पाणी देण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथे जगदंबा नवरात्र महोत्सवात आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री थोरात बोलत होते. यावेळी  विवेक महाराज केदार, विश्राम महाराज ढमाले, भारत  मुंगसे, इंजि. सुभाष सांगळे, हौशीराम सोनवणे,अविनाश सोनवणे,निलेश केदार, प्रभाकर कांदळकर, राजेंद्र कहांडळ,राजेंद्र मुंगसे,ज्ञानेश्वर मुंगसे, प्रल्हाद मुंगसे, अनिल मुंगसे, प्राचार्य हरिभाऊ दिघे, नामदेव कहांडळ, बापू शेवकर, दत्तू मुंगसे, संजय आरोटे, अशोक मुंगसे, राजाराम मुंगसे, प्रकाश मुंगसे यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, वारकरी संप्रदायाने मानवतेचा मंत्र दिला आहे. तालुक्यातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात आनंद निर्माण होण्यासाठी आपण सातत्याने काम केले. इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करणे हे परमार्थाने शिकवले आहे. संत संप्रदायाला मोठी परंपरा असून जातीभेद नष्ट करत त्यांनी मानवतेचा संदेश दिला आहे. हीच परंपरा आपण कायम जोपासली आहे. चाळीस वर्षे एकही दिवस विश्रांती न घेता गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी काम केले. ऐतिहासिक निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. मोठमोठी विकास कामे मार्गी लावली. राज्यभरात संगमनेरचा लौकिक वाढवला याचे समाधान आहे. निळवंडेचे पाणी सर्वांना मिळावे याकरता पुढील काळात काम होणार असून सर्वांनी वारकरी संप्रदायाचा मानवतेचा विचार जोपासावा असे आवाहन त्यांनी केले.
विवेक महाराज केदार म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंस्कृत,स्थितप्रज्ञ आणि शांत संयमी नेते असलेले बाळासाहेब थोरात हे वारकरी व संत विचारांचे खरेपाईक आहे. स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा असलेल्या माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर, अकोलेचा देशात लौकिक निर्माण केला आहे.जनसामान्यांसाठी काम करणारे राजकारणातील संत बाळासाहेब थोरात असा त्यांनी उल्लेख करताच सर्वांनी टाळ्यांच्या गजर केला. यावेळी सिन्नर व संगमनेर तालुक्यातील अनेक भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.  यावेळी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते जगदंबेची आरती करण्यात आली.

महंत काशिकानंद महाराज यांच्या शिर्डी वरून जाणाऱ्या पायी दिंडीचा खंदरमाळ १९ मैल येथे अपघात झाला, यामध्ये चार वारकऱ्यांचा मृत्यू झाला. ही बातमी कळताच  बाळासाहेब थोरात यांनी आपल्या यशोधन कार्यालय व यंत्रणेला सांगून सर्व वारकऱ्यांना मोठी मदत केली. याचबरोबर या मयत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपये मदत मिळवून दिली.  अकोले-संगमनेर तालुक्यातील वारकऱ्यांसाठी आळंदी येथे आत्ताचा संत सावली हा वारकरी आश्रम सुद्धा उभा करून दिला असे सिन्नर तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष विश्राम महाराज ढमाले यांनी सांगितले.
Visits: 40 Today: 3 Total: 1121114

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *