दूध आणण्यासाठी गेलेल्या व्यापार्याचा मांजाने चिरला गळा प्रसंगावधान राखल्याने जीव वाचला; कोपरगाव शहरातील घटना

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
मकर संक्रांतनिमित्त पतंगबाजीचा खेळ सर्वत्र मोठ्या प्रमाणात खेळला जातो. परंतु, पतंग उडवण्यासाठी आता नायलॉन मांजाचा उपयोग जास्त होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या नायलॉन मांजामुळे पशुपक्ष्यांना, प्राण्यांना आणि माणसांना देखील जीवाला मोठा धोका आहे. कोपरगाव शहरातील धान्याचे व्यापारी आनंद गंगवाल हे दूध घेण्यासाठी धारणगाव रस्त्यावरुन मोटारसायकलवर जात असताना टपाल कार्यालयाजवळ एक पतंगाला असलेल्या मांजाने त्यांचा गळा चिरला आहे. सुदैवाने यामध्ये त्यांचे प्राण वाचले.

सध्या अनेक ठिकाणी कायद्याने बंदी असलेला नायलॉन मांज्याची छुप्या पद्धतीने विक्री सुरू आहे. तर काही पतंगप्रेमी शेजारील तालुक्यात जाऊन नायलॉन मांजा घेऊन येत आहेत. मकर संक्रांत सण 1 दिवसावर आला असून मांजा बनवणे, पतंग खरेदीसह नागरिक पतंगोतस्वाच्या तयारीला लागले आहे. नायलॉन मांजामुळे अनेकांचे गळा चिरणे, हात कापणे अशा घटना होत असतात.

नायलॉन मांजावर बंदी असतानाही अनेक पतंग शौकीन खुलेआम याचा वापर करतात. त्यामुळे प्रत्येक वर्षी नागरिक जखमी होण्याच्या घटना मकरसंक्रांतीच्या काळात घडत असतात. मात्र, यावेळी संक्रांत जवळ असताना आता याचा फटका बसू लागला आहे. चोरी छुपे नायलॉन मांजाची खरेदी-विक्री होत आहे. आरोग्यासाठी घातक असलेल्या या मांजावर न्यायालयाने घातलेली बंदी धाब्यावर बसवीत विक्रेते चोरी छुपी मांजा विकत असून पादचारी, दुचाकीस्वार आणि पक्षी या मांजाचे बळी ठरत आहेत.
![]()
सध्या नॉयलॉन मांजावर बंदी असून अनेक दुकानदार चोरून नॉयलॉन मांजाची विक्री करीत आहे. आज मी प्रसंगवधान राखल्यामुळे आणि गळ्यावरून त्वरीत मांजा हटवल्यामुळे माझा जीव वाचला आहे. तरी पोलीस प्रशासनाने या नायलॉन मांजाचा वापर करणार्या पतंगप्रेमी आणि दुकानदारांचा कसून शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी.
– आनंद गंगवाल (जखमी)
